नवीन लेखन...

रंग अवकाशाचा मुक्तयात्री – अशोक साठे

प्रा. विजय जोशी यांचा ठाणे रंगयात्रा २०१६ मधील लेख.


अशोक,

तुला जाऊनही आता १३-१४ वर्षे झाली आहेत. मला स्मरण आणि स्मरणरंजन यातला फरक नक्की समजतो. त्या प्रांतातील कर्तृत्व संपलं की लोक भूतकाळाचा रवंथ करीत मेणचट मधाळ गुंगीत हरखून जातात. रिकामटेकडेपणी करण्याचा चावट चाळा. मला तो आवडत नाही. तुलाही रुचणार नाही.

पण अशोक,

आमच्या मेंदूच्या एका कप्यात चक्रावर्तासारखा तू का भिरभिरत असतोस? काही निमित्तांनी (आता नाट्यसंमेलन) अंधारानंतर सायक्लोरामावर पडलेल्या लख्ख पहाट प्रकाशासारखा का आठवत राहतोस? जसाच्या तसा! तुझ्याबरोबर घालवलेला प्रत्यक्ष क्षण तळहातावर स्वातीच्या थेंबाचा मोती ठेवावा, तसा मनचक्षूसमोर सजीव होऊन उलगडत राहतोस (हे जरा शब्दबंबाळ वाटतंय ना?) नाटकाची संहिता वाचताना हळूहळू अस्पष्ट, पण मग साकार दिसणाऱ्या पात्रासारखा, प्रसंगासारखा (हे तुला जवळचं वाटेल).

अशोक,

तुला आठवतं आम्ही गुरुपौर्णिमेला तुला गुलाबाचं फूल देत असू. भाविकपणे. पण तुला आम्ही गुरूबिरू समजत असू, असा गैरसमज अजिबात करून घेऊ नकोस. ‘स्वयंमेव मृगेंद्रता’ हा तुझाच संदेश. गडकरीच्या कट्ट्यावर तुझ्या नाटकांवर, नाट्यविषयक भूमिकांवर यथेच्छ टीकेचे फड रंगले असायचे. आम्हा कलासरगमियांची खासियत म्हणजे कितीही चांगलं नाटक झालं असलं तरी चुकांची चिकित्सक चिरफाड करायची.

अशोक,

तसा तू मित्रसहयोगचा सर्वेसर्वा. पण प्रथमच वसंत कामतांचं ‘अंधारयात्रा’ कलासरगमबरोबर करायचा निर्णय तू घेतला आणि केवढा आनंद झाला होता आम्हाला. त्यानंतर ‘तालमां’नंतर (हा तुझा खास शब्द!) बबनच्या गाडीवर आम्लेट-पाव झोडताना आणि कटिंगमागून कटिंग रिचवताना गप्पा रंगायच्या त्या पहाटेच्या पहिल्या प्रहरापर्यंत. कधी कधी तालमीपेक्षा गप्पाच जास्त रंगायच्या आणि त्यात कुठल्याही विषयाचं वावडं नव्हतं.

आता प्रश्न पडतोय तू आमच्यापेक्षा १५-२० वर्षांनी मोठा तरीही तुला एकेरी ‘अशोक’ असं म्हणत असू आम्ही. हा आमचा आगाऊपणा की तुझा मोठेपणा? पण नाटकाची पताका खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याशी तुझा असाच मुक्त संवाद किंवा विसंवाद होता, तो तुला सहोदर वाटायचा. असो.

अशोक,

तशी तुझी नाट्य व्यवहाराविषयीची मतं स्पष्ट, आग्रही अट्टहासी; कधी कधी टोकाची होती. ती कोणत्याही व्यासपीठावर परखडपणे मांडण्यास तू कधीच कचरला नाहीस. पण दुसऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामाचं तोंडभरून कौतुक करण्याचं मोठं मन तू कुठून आणलंस?

आमच्या पिढीची केवढी गोची करून ठेवलीस तू. तुझं ते फेमस विधान, ‘नाटकाची गरज असेल तर रंगमंचावर हस्तमैथुनसुद्धा दाखवीन…’ धड डिफेंड करता येईना आणि धड खोडूनही काढता येईना.

अशोक,

काय रे तुझ्या तालमा? १५-१६ तास सलग ‘तालमा’ करताना त्या कलाकारांची तुला दयामाया नाही वाटायची? कशासाठी एवढी मेहनत? का त्यांचं प्रेम तू गृहीत धरलं होतंस? ‘अंधारयात्रा’मध्ये नोव्हेंबर-डिसेंबरच्या भर थंडीत आमच्या गच्चीवर तालमी चालायच्या. तू जेलर तर मी क्रांतिकारी. तेव्हा दरवेळी सीनमध्ये बादलीभर थंड पाणी माझ्या उघड्या अंगावर ओतायचास. आम्हाला तशीच सवय होती. पण अधिक दृढ झाली. मी पहाटेपासून रात्री तीनपर्यंत रिहर्सल झाल्यावर कलाकारांवर उपकार केल्यासारखी दोन तासांची विश्रांती घ्यायचो. पहाटे पाचपासून ऑफिसला/कॉलेजला जाईपर्यंत परत रिहर्सल. मरमरून डिटेलिंग. या राक्षसी तालमी. एकदा तर तीन दिवस सलग रिहर्सल करण्याचा विक्रम आम्ही केलाय. रिहर्सलची झिंग आमच्या मनात का रुजवलीस?

अशोक,

तू दिग्दर्शक होतास, अभिनेता होतास की प्रकाशयोजनाकार? की गरज अपरिहार्यता म्हणून सबकुछ? तू जास्त कशात रमायचास? तू फक्त एकाच गोष्टीवर फोकस का केलं नाहीस?

अशोक,

तुझं सगळंच उफराट. सगळे प्रकाशयोजनाकार सीनमध्ये रंगांची उधळण करायचे कलाकारांवर, अगदी इस्टमन कलर. तेव्हा तुझा आग्रह स्वच्छ पांढऱ्या प्रकाशावर. एवढे स्पॉट (चुकलो ‘दिवे’) तुला का रे लागायचे? आम्ही म्हणायचो ५६ स्पॉट तरी ‘अंधारयात्रा’. पण प्रोसेनियमच्या अवकाशात काळ्या पांढऱया रंगांची रांगोळी तू अशी सजवायचास प्रत्येक सीनमध्ये की प्रेक्षक-नाट्यानुभव गहिरा व्हायचा.

अशोक,

तुझे लेखक वसंत कामत, श्रीहरी जोशी, नंदू नाईक. आधी श्याम फडके. नंतरच्या काळात विक्रम भागवत. बरेचसे भाषांतरकार. पण नाटकाचं व्याकरण पक्कं असलेला स्वतच्या ग्रुपचा सिद्धहस्त संपूर्ण नाटककार आपण का घडवू शकलो नाही? विक्रम होता किंवा एखाद्या मातब्बर नाटककाराने नवी कोरी संहिता आपल्याला का देऊ केली नाही? सांगशील.

अशोक,

तुझं ते सिग्रेटी पिणं. सिगरेटवरनं आठवलं ‘अंधारयात्रा’मध्ये रवींद्रच्या फायनलच्या प्रयोगात तू अनावधानाने आवेशात जळता चिरूट चिरडलास त्याचा डाग आजही माझ्या पाठीवर आहे. त्याही पेक्षा त्यानंतरची अनेक दिवसांची तुझी हळहळ अजूनही ताजी आहे माझ्या मनात.

अशोक,

तरुणांचं तुला एवढं कौतुक का वाटायचं? माझ्या बाबतीत म्हणशील तर मला राज्य नाटÎस्पर्धेत अनेक पारितोषिके मिळाली. अभिनयाची पाच पदकं. दिग्दर्शनाची अनेक. आज ती कुठे आहेत माहीत नाही. पण ‘अंधारयात्रा’नंतर आणि पागलखान्याचं केलेलं ‘असायलम्’ पाहिल्यानंतर आठवतं. तू लिहिलेली पत्र मी अजून जपून ठेवलीयत. माझं पहिलं व्यावसायिक नाटक ‘जन्मगाठ’. माझी प्राध्यापकी याचंही तुला अतोनात अप्रूप. ‘जन्मगाठ’नंतर माधव मनोहरांनी लिहिलेलं परीक्षण वाचून माझ्यापेक्षा तुलाच आनंद झाला होता. पण सगळ्या तरुण मित्रांनी केलेल्या हटके प्रयोगांना तू तोंडभरून दाद द्यायचास. किती आश्वासक वाटायचं, याची तुला कल्पनाही नसेल. गोऱ्यासाहेबाचं आणि उर्दू रसिकांचे हे appreciation चं अंग कधी आणि कुठून अवगत केलंस?

अशोक,

वरून तू खूप कणखर वाटायचास. दिसायचास. पण फार हळवा होतास. ‘मंतरलेली चैत्रवेल’च्या गाडीला अपघात झाला. आपण तीन मोहरे गमावले. तेव्हा तू कोलमडलास. तुझं भावविश्व ढवळून निघालं. त्यातून तुला सावरायला खूप महिने लागले.

अशोक,

मराठी नाटकातील मैलाचा दगड ठरलेल्या ‘गिधाडे’ या नाटकाचा नायक रजनीनाथ तू केलास. तोही डॉ. लागूंसमोर. त्याची सर्वत्र स्तुती झाली. उंचीपुरी शरीरयष्टी, भरदार आवाज, स्पष्ट उच्चार, निसर्गाने नटाला आवश्यक असलेले सर्व काही तुला भरभरून दिले होते. तुझ्या मेहनतीने तू ते कमावलेही होतेस. श्रीराम लागूंपासून विजयाबाईंपर्यंत आणि दुब्यांपासून तेंडुलकरांपर्यंत तुझी ऊठबस. ‘गोवा हिंदू असोसिएशन’ तुझ्या जवळची. दूरदर्शनच्या चासकरांपासून विनय आपटेंपर्यंतचे निर्माते तुझे मित्र. विश्वास मेहेंदळे तर मित्रसहयोगमध्ये सामील झालेले. वहिनींची साथ होती. मग तू आर्थिक सुरक्षिततेसाठी नोकरीचं जोखड का स्वीकारलंस? त्या इटालॅब असोसिएशनच्या चौकोनी काचेच्या केबिनमध्ये तुझी प्रतिभा चिणून का घेतलीस?

मला माहीत आहे तुझ्या गोंडस मुलांवर चौकोनी कुटुंबावर तुझा अतोनात जीव होता. नाट्यव्यवहारात पूर्णपणे झोकून द्यायला तुला असुरक्षित वाटायचं का? की या कंपूशाहीत मायावी बेगडी निसर्गाने तुझ्यावर गुणांची उधळण केली खरी, पण नियतीने यशाचे माप तुझ्या पदरात हातचं राखूनच टाकलं, याची हळहळ वाटते. बाजारात आपला आतला आवाज हरवून बसू अशी भीती वाटायची. तुला तडजोडी नको वाटायच्या, की तुला तुझ्या कर्तृत्वाविषयी आत्मविश्वास नव्हता? सांग, आता तरी सांग. तेव्हा या प्रश्नांवर हसून गुळमुळीत उत्तरे द्यायचास. बरं रिटायर्ड झाल्यावर अनेक गोष्टी करण्याचे तुझे मनसुबे होते. पण पट्कन एक्झिट घेतलीस. काळाच्या पडद्याआड जाण्यापूर्वी तुझ्या हातून देदीप्यमान अभिजात निर्मिती व्हायला हवी होती अशोक. महाराष्ट्राचे रसिक मुकले त्याला.

अशोक,

तू कुठे कुठे असशील? मित्रांच्या संग्रही फोटो अल्बममध्ये. छायाचित्रात. ‘आभाळमाया’च्या चित्रफितीत. तुझा आवाज असेल रवींद्रमधील दादांच्या आठवणीत निपचित पडलेला.

पण अम्लान गुलबकावलीच्या फुलासारखा असंख्य नाट्यकर्मी/नाट्यरसिकांच्या मनात तू अद्याप आहेस. त्या फुलाची भूल कधीच संपू नये. (हे थोडं व्हर्बीज् झालं ना?) असो!

प्राचार्य विजय जोशी – ९९३०१७९९२०

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..