सांगलीत अभियांत्रिकी शिक्षणासाठी चार वर्षे होतो,पण रंगभूमी दिनाबद्दल (५ नोव्हेंबर) काहीच माहिती नव्हते.कदाचित तो त्यानंतर साजरा करायला सुरुवात झाली असावी.
पण सांगलीतील जनता नाट्यगृहात अरुण सरनाईक ची सही घ्यायला गेलो असता,” तुम्ही नशीबवान आहात, महाराष्ट्रच्या आद्य रंगमंचावर (सांगलीतील भावे नाट्यगृह) तुम्हाला अभिनय करता आलाय. माझ्या वाट्याला ते भाग्य अद्याप नाही” असं तो म्हणाला होता.
आज ते सगळे क्षण मोजू लागलो आणि श्रीमंतीची ढेकर आली.
“सिंहासन” चित्रपटातील सर्वांना (लागू,भट,नाना,श्रीकांत,रीमा,अरुण,निळूभाऊ,जयराम हर्डीकर ) मी प्रसंगोपात्त भेटलोय, त्यांच्या सह्या माझ्याकडे आहेत. आजवर किती नाटकं पाहिलीत याची गणती नाही. माझा मित्र (जयंत असनारे ला) सगळे पाहिलेले चित्रपट/नाटके यांची डायरीत नोंद करायची सवय आहे. म्हणून सक्काळी सक्काळी त्याला फोनलो. तो थोड्या वेळाने सांगतो म्हणालाय.
जळगांवच्या बालगंधर्व ओट्यापासून सुरुवात झाली, मग गांवोगांवची रंगमंदीरे आश्रयस्थाने झाली. आयुष्यातील सगळ्यात जास्त नाटके पाहिली ठाण्याच्या “गडकरी”ला ! चार वर्षे, बऱ्यापैकी एकट्याने काढली, रात्रीचे जेवण करून आठ वाजताच्या प्रयोगाला जायचे आणि अकरा वाजता मठीत ! बहुधा साठेक नाटके नक्कीच पाहिली तिथे !
एकांकिका स्पर्धा झाल्या,राज्यनाट्य झाल्या, एकपात्री प्रयोग झाले,परीक्षण करून झाले, काही प्रयोगाआधी ” रंगदेवतेला आणि सुजाण नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सहर्ष सादर करीत आहे, या नांदी नंतर – लेखक,दिग्दर्शक,प्रमुख भूमिका- नितीन देशपांडे ! ” अशी उद्घोषणाही ऐकली.
आजवर बारा एकांकिका लिहून झाल्या (त्यांत राज्यपातळीवरील एकांकिका लेखन स्पर्धांमधील प्रथम पारितोषिक प्राप्त सहा एकांकिकांचा समावेश आहे). साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदानांतर्गत तीन एकांकिकांचा “माणूस नांवाचे निगेटीव्ह वर्तुळ” हा संग्रह १९९३ साली प्रकाशित झाला. महाविद्यालयात आणि नंतरही तीन अंकी नाटकांची धमाल करून झाली.
चार अंकी (गुंतता हृदय, गारंबीचा बापू) वरून तीन अंकी,मग दोन अंकी, दीर्घांक अशा स्थित्यंतराला साक्षी राहता आलं आहे.
आयुष्य उजळून टाकणारे अगणित क्षण या रंगमंचावरील प्रकाशयोजनेने दिले.
जगण्यातलं असणं आणि नसणं शोधण्याचं भान दिलं.
आता हा शोध एकतर्फी सुरु आहे-
नाटकं करत नाही,फक्त पाहतो.
आता लिहीत नाही,फक्त वाचतो.
शक्य असेल तेव्हा मनात आलेल्या प्रत्येक विचाराला लेखणी लावून पाहतो.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply