ठाणे रंगयात्रा २०१६ मधील शशी करंदीकर यांचा लेख.
काळ बदलतो, अभिरुची बदलते, माध्यम बदलतात. पण बदलत नाही ती कलेची लालसा. 60 साली ठाण्याचे रसिक मो. ह. विद्यालयाच्या पटांगणावर थंडी वाऱ्याची पर्वा न करता कधी पं. भिमसेनजींचं गाणं ऐकायला तर कधी प्रभाकर पणशीकरांचा अभिनय बघायला यायचे. 80च्या दशकात गडकरी रंगायतनच्या मध्यवर्ती, आरामदायी वातानुकूलित रंगमंचावर ठाणेकरांनी नाट्य-संगीत-नृत्याचा आस्वाद घेतला. आता 21व्या शतकात ठाणे शहराने आपले हात-पाय पसरवले. कधी काळी जंगलातून जाणारा घोडबंदर रोड आता भरवस्तीत आला आहे. या वाढत्या ठाण्यातील रसिकांच्या कलातृप्तीसाठी निर्माण झालं डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह! या सगळ्या बदललेल्या परिस्थितीत वाढलेल्या ठाण्यासाठी एक नवे सांस्कृतिक केंद्र निर्माण होणं अपरिहार्य होतं. या अपरिहार्यतेमधून 6 डिसेंबर 2012 रोजी ‘ठाणे आर्ट गिल्ड’ अर्थात TAG या संस्थेची स्थापना झाली. कलेच्या माध्यमातून कलेचा प्रसार हेच ध्येय समोर ठेवून टॅगचा जन्म झाला. अर्थात ‘ठाणे आर्ट गिल्ड’ ही संस्था केवळ कलावंतांची नसून, सर्व रसिकांसाठी आहे.
गेल्या तीन वर्षांमध्ये कलावंतांना प्रोत्साहन देणे, नवीन कलावंतांना ज्येष्ठ, अनुभवी कलाकारांचे मार्गदर्शन मिळवून देणे, रसिकांसाठी वेगळ्या धर्तीचे कार्यक्रम आयोजित करणे, या आपल्या उद्दिष्टांच्या जवळ जाण्यात टॅगने चांगले यश मिळवले आहे. कुसुमाग्रजांना आदरांजली म्हणून अनेक कलांच्या आविष्कारातून ‘मराठी मातीचा टिळा’ हा कार्यक्रम टॅगने सादर केला होता. प्रख्यात सिने दिग्दर्शक रवी जाधव व उमेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनामध्ये ‘शूट अ शॉर्ट’ ही कार्यशाळा घेतली होती. ठाण्यातील नावाजलेले सिने-नाट्य कलावंत व टॅगचे संस्थापक सदस्य उदय सबनीस यांच्या पुढाकाराने ‘नाट्यगंध’ हा उपक्रम आयोजित करण्यात येतो. या उपक्रमाअंतर्गत वेगळ्या वाटेने जाणाऱ्या, नावाजलेल्या उत्तमोत्तम प्रायोगिक नाटकांचे प्रयोग आयोजित केले जातात. नोव्हेंबर 2013 मध्ये सुरू झालेल्या ‘नाट्यगंध’च्या दुसऱ्या पर्वाची सांगता करताना विजू माने लिखित-दिग्दर्शित ‘अंधारवाटा’ हा दीर्घांक सादर करण्यात आला. यामध्ये उदय सबनीस, संतोष जुवेकर, हर्षदा बोरकर आणि मुरलीधर गोडे यांनी अभिनय केला होता. याबरोबरच गाजलेल्या अभारतीय, आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे दर्शन घडवणारा ‘चित्रगंध’, संगीतमय कार्यक्रमांची मेजवानी देणारा ‘स्वरगंध’, नृत्याविष्कारांनी सजलेला ‘नृत्यगंध’, काव्यरसिकांसाठी ‘काव्यगंध’, चित्र साकार करणारा ‘रंगगंध’, असे उपक्रम नियमित होतात.
— शशी करंदीकर.
Leave a Reply