आपल्या भारतीय संस्कृतीत काही दिवस ठरलेल्या तिथीला साजरे केले जातात. पण तिथीचे नांव एकच आहे मात्र त्या दिवसाचे वैशिष्ट्य वेगवेगळ्या विचारावर आधारित आहे.
श्रावणात येणारी नागपंचमी. पावसाळ्यात सगळीकडे उत्साह ओसंडून वाहत असतो. आणि लेकींना माहेरची ओढ लागते. पंचमीचा सण येईपर्यंत खूपच वाट पहात असते. माहेरी गेल्यावर तिचे अल्लड वय. झाडांना बांधलेले झोके. त्यावर बसून गाणी म्हणते उंच माझा झोका. पंचमीला आईकडून न्हाऊन घेणे. मैत्रीणीसह नागपुजा करायला वारुळला जाणे. दूध लाह्या वाहणे. असो वा पाटावर नागाची रांगोळी काढून केलेली पुजा. भक्ती भावाने भावाच्या वैभवाची मागणी करते. या दिवशी चिरणे. कापणे. भाजणे तळणे. नांगरणी सगळे बंद असते.विषारी सापाची पुजा? मला वाटते हेच तर आपल्या संस्कृतीतील एक वैशिष्ट्य आहे.
दुसरी पंचमी ती ऋषिपंचमी. या दिवशी बैलांनी केलेल्या कुठल्याही कामाच्या गोष्टी स्विकारल्या जात नाहीत. अंघोळ नदी किंवा विहिरीवर. पाणी देखिल तेच पिण्यासाठी. या आधी कित्येक दिवस घरी बी पेरुन आलेल्या भाज्या. फळे यांचेच अन्न म्हणून खाल्ले जाते. काही ठिकाणी बरेच काही पिकवतात. एकमेकांना देतात. आता बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो. पण या दिवशी मात्र असे का? याचे शास्त्रीय कारण माहीत नाही पण स्वकष्टार्जित असलेल्या वस्तूंची किंमत खरी काय ते कळते. त्या दिवसासाठी एका फळाची वेल लावण्यात काय काय करावे लागते.आयते रोप आणि बी रुजवणे यात खूप फरक आहे. तिथे मिळणारे समाधान. आनंद व अभिमान याचे वर्णन करता येत नाही. दुसऱ्यांच्या कष्टाची जाणीव ठेवणे. यात किती राबावे लागते आणि मुख्य म्हणजे ते वाया गेले की कसे वाटते. हे बैलांच्या दृष्टीकोनातून बघितले की समजते.
पानगळ सुरू झाली की झाडून सगळी जिर्ण पाने आपोआप खाली गळून पडतात. यातून त्यांना हेच सांगायचे असेल का की जबाबदारी संपली की बाजूला व्हावे. आणि नवीन पालवी फुटायला हवी असेल तर हे आवश्यक आहे. झाडी ओकीबोकी होतात. ते पाहून खूप वाईट वाटते. पण नियतीचा नियम आहे तो ते आंनदात स्विकारावा लागतो. वाळलेल्या पानांचा सडा पडलेला असतो त्यावरून चालताना चुर चुर असा आवाज येतो. आणि मनालाही चुरचुरते. पूर्वी अशी सगळी पाने एकत्रीत करून नदीकाठी चकमकीच्या दगडाने पेटवून त्याची राख अंगाला लावून अंघोळ केली जायची. त्यामुळे त्वचारोग जायचे. ती राख पाण्यात मिसळून त्याचा गाळ जो परत झाडांना खत म्हणून मिळतो. झाडांना नवीन पालवी फुटते. थोड्याच दिवसात झाड हिरवे गार होऊ लागते. भूतकाळ संपला.भविष्याकडे लक्ष देऊन वर्तमान काळात रमणे. कर्तव्य पार पाडणे ही शिकवण मिळते. याच झाडावर कोकिळेचे गायन सुरू असते. ते स्वागत गीत असते वसंत पंचमीचे.
आता याच झाडाझुडुपावर अगदी गवतावर सुद्धा रंगीबेरंगी नाजुक. सुगंधीत फुले येतात. काही फुलांचा मोहोर गळून पडतात आणि फळांचा रंग रस याची ओढ लागते. उंच अशा झाडे लाल रंगाच्या. तर काही पिवळ्या रंगाच्या. इतके डवरुन येतात की ती झाडे जणू फुलांचीच आहेत असा भास होतो. हे सगळे न्याहाळत जावे तसे. अबब रंग वेगळे गंध वेगळे. नांवे ही वेगवेगळी. किती रंग. सुवास. डोळ्यात साठवून ठेवता येत नाहीत. हावऱ्या सारखे बघत रहातो. क्षणभर असे वाटते की हे सगळे रंग आपल्या अंगोपांग लावून घ्यावं. रंगसंगतीची ओळख इथेच होते. आणि मला वाटते की या रंगांच्या आकर्षणानेच रंगपंचमीचा सण साजरा केला जात असावा.
या फुला सारखेच रंग तयार करुन पाण्यात मिसळून ते पिचकारीने एकमेकांच्या अंगावर उडवले जात असे. मला आठवते की संध्याकाळी बैलगाडीत रंगाची पिपे ठेवून मिरवत रंगपंचमी खेळली जायची. त्यामुळे जुने कपडे आधिच काढून ठेवले जात असत.
रंग पंचमी म्हटली की राधा कृष्णाची जोडी समोर येते. आज शाम संग खेले होरी. पिचकारी भरी केसरी….
बाळाचा जन्म झाला आणि पहिल्या रंगपंचमीचा पाच पांढऱ्या रंगाची झबली पाच बाळांना देतात. त्यावर केशराचे किंवा हळदीचे सौम्य रंगीत पाणी दोन बोटांनी हळुवार शिंतोडे उडवले जातात. लहान मुलांना रंगीत खेळणी खूप आवडतात. विशेष करून लाल रंगाची. आणि रंग ज्ञान याच वयापासून मिळत असले तरी प्रत्येकाला एकच रंग फार आवडीचा असतो.
तेव्हा या रंगीबेरंगी रंगाचे आकर्षण नुसते कपडे. किंवा इतर गोष्टी पुरतेच मर्यादित न ठेवता आयुष्य देखील अशाच आंनदात घालवायचे ठरवले तर बरेच काही साध्य होईल. चला तर रंगुनी रंगात जाऊया. पण या साठी निसर्गाची जपणूक केली तरच रंगायला मिळेल नाही तर रंगाचे बेरंग कसे होते याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतला आहे कोरोना मुळे. मुलांनी फुला सारखे टवटवीत रहावे असे वाटत असेल तर या रंगपंचमीतून हेच शिकू या की निसर्ग जगवाल तरच आपण जगू शकतो. या साठी रंगपंचमीच्या या रंगाप्रमाणेच आपले नाते घट्ट करु या.
धन्यवाद.
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply