नवीन लेखन...

रंगमहर्षी एम. आर. आचरेकर…

१९५१ साली राज कपूरचा ‘आवारा’ प्रदर्शित झाला. त्यातील ‘घर आया, मेरा परदेसी..’ या स्वप्नगीताला रसिकांनी डोक्यावर घेतले. त्या गाण्यासाठी मोठमोठ्या मूर्ती, मनोरे, मुखवटे, एलिफंटा येथील त्रिमूर्तीचे सेट्स उभे केले होते. कृत्रिम धुराच्या सहाय्याने सेटवर स्वर्गीय वातावरण निर्मिती केलेली होती. जेव्हा हे गाणं संपतं तेव्हा त्या मूर्तीं पडतात असे दाखविले होते. हे कलादिग्दर्शन केलं होतं, राजकपूरचे सर्वाधिक चित्रपटांचे कलादिग्दर्शन करणारे महाराष्ट्राचे महान चित्रकार मुरलीधर रामचंद्र आचरेकर यांनी!

रायगड जिल्ह्यात पनवेल जवळील आपटे नावाच्या गावात आचरेकरांचा जन्म १९०७ साली झाला. लहानपणापासून मुरलीधरला चित्रकलेची आवड होती. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्याने केतकर आर्ट इन्स्टिट्युट मधून कलेचे धडे गिरविण्यास सुरुवात केली. तिथे सात वर्षे शिकून झाल्यावर झालेली प्रगती पाहून जे.जे. मध्ये वरच्या वर्गात प्रवेश त्याला मिळाला. मात्र ऐन परीक्षेच्या वेळी आजारपणामुळे त्याला परीक्षा देता आली नाही.

‘चित्रमय जगत’ या सुप्रसिद्ध नियतकालिकात वयाच्या सोळाव्या वर्षी त्याचं चित्र छापले होते. १९२३ मध्ये त्यानं छायाचित्र कलेचा व लिथो प्रेसचा अभ्यास केला व लिथो प्रेसची मशिनरी उभी करुन स्वतःचे मुद्रण सुरू केले. १९२९ पासून आचरेकरांच्या चित्रांना पुरस्कार मिळू लागले. त्यांचे पहिले पुरस्कारप्राप्त चित्र ‘शृंगार’ हे आजही जे. जे. स्कूल आॅफ आर्टच्या संग्रही आहे. १९२८ साली आचरेकरांनी महाराष्ट्र सरकारचा पेंटिंगचा डिप्लोमा प्राप्त केला.

१९३२ ते ३४ दरम्यान लंडनमधील राॅयल काॅलेजमध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतले. १९३५ मध्ये त्यांना पंचम जाॅर्जच्या राज्यरोहणाची चित्रं काढण्यासाठी दिल्लीच्या गव्हर्नरने लंडनला पाठविले होते. याच दरम्यान त्यांनी ‘गोलमेज परिषद’ हे सुप्रसिद्ध चित्र काढले.

१९३७ ते ३९ पर्यंत आचरेकर जे. जे. चे उपसंचालक होते. ही जबाबदारी असताना त्यांना कलेसाठी वेळ देणे अशक्य होऊ लागले, म्हणून पेंटींग्ज करणे सुरु केले. आधी त्यांनी दिल्लीत व नंतर मुंबईत स्वतःचा स्टुडिओ उभा केला. १९३५ साली त्यांनी दिल्ली येथे आपल्या कलाकृतींचे पहिले चित्र प्रदर्शन भरविले. याच ठिकाणी त्यांची चित्रपट दिग्दर्शक करदार यांच्याशी भेट झाली आणि १९४६ पासून चित्रपट कलादिग्दर्शनास आचरेकरांनी प्रारंभ केला. त्यांचा पहिला चित्रपट होता, ‘शहाजहान’. १९५१ पासून ते राज कपूरच्या बॅनरखाली काम करु लागले. ‘आवारा’ सुपरडुपर हिट झाला. देशात परदेशात कौतुक झाले. तेव्हापासून राज कपूरच्या प्रत्येक चित्रपटासाठी त्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली.

१९५२ साली आचरेकर भारतातर्फे सिने आर्ट डायरेक्टर असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून अमेरिकेला गेले होते.
‘आन’, ‘बुटपाॅलीश’, ‘श्री ४२०’, ‘जागते रहो’, ‘अनाडी’, ‘जिस देश में गंगा बहती है’, ‘संगम’, ‘मेरा नाम जोकर’ पर्यंत त्यांनी बेमिसाल काम केले. ‘मेरा नाम जोकर’ अपयशी ठरल्यावर त्यांनी राज कपूरसाठी काम करणे थांबवले. ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ चे त्यांनी फक्त प्राॅडक्शन डिझाईन करुन दिलं. या आर. के. च्या कारकिर्दीतील ‘प्यार हुआ, इकरार हुआ…’ या गाण्यातील पावसातील दिसणारा रस्ता व मागचे लाईटचे खांब हे सेट नसून तशी भासनिर्मिती केलेली आहे. ‘जागते रहो’ मधील मोठी भिंत आठवण म्हणून गेल्या दोन वर्षांपर्यंत आर. के. स्टुडिओत जपून ठेवलेली होती. ‘जिस देश में..’ बरोबरच ‘परदेस’ व ‘कागज के फूल’ च्या कलादिग्दर्शनासाठी त्यांना एकूण तीन वेळा फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला होता. १९६८ साली भारत सरकारने ‘पद्मश्री’ पदवी देऊन त्यांचा बहुमान केला होता.

आचरेकरांनी राज कपूर सोडून केलेले इतर चित्रपट माईलस्टोन ठरलेले आहेत. गुरुदत्तचा ‘कागज के फूल’, ‘सूरज’, ‘राजकुमार’, ‘आम्रपाली’ यांनी इतिहास रचला आहे. ‘आम्रपाली’ हा चित्रपट पौराणिक कथेवर आधारित होता, त्यांतील साकारलेले राजवाड्यांचे भव्य सेट्स पाहून डोळ्यांचे पारणे फिटते.

आचरेकरांचे रेखाटन, जलरंग व तैलरंग या तिन्ही माध्यमांवर प्रभुत्व होते. त्यांचा विशेष भर हा रेखाटनावर होता. ते देशात परदेशात कुठेही गेले तरी त्यांच्या हाताशी स्केचबुक असायचंच. बसल्या बसल्या ते रेखाटनाचा रियाज करीत रहायचे. परिणामी त्यांनी केलेली व्यक्तीचित्रे अजरामर ठरलेली आहेत. त्यांनी लता मंगेशकर, वहिदा रेहमान, गुरुदत्त, मीना कुमारी यांना समोर बसवून त्यांची व्यक्तीचित्रे काढलेली आहेत.

रेखा पब्लिकेशन या स्वतःच्या प्रकाशन संस्थेद्वारे त्यांनी काही कलेविषयी पुस्तके लिहून प्रकाशित केली आहेत. ‘रूपदर्शिनी’, ‘फिमेल न्यूड’, ‘फ्लाईंग गंधर्वाज’ आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर आधारित चित्रमय ‘शांतिदूत’ या पुस्तकाला राष्ट्रपती पुरस्कार (राष्ट्रपती ताम्रपट) मिळालेला आहे.

१९७९ साली राष्ट्रपती संजीव रेड्डी यांचे तैलचित्र काढण्यासाठी आचरेकरांना दिल्लीला बोलाविले होते. मुंबईहून ते तयारीनिशी दिल्लीला रवाना झाले. दिल्ली स्थानकावरतीच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. आज त्यांना जाऊन एकेचाळीस वर्षे लोटलेली आहेत…

तरी देखील जेव्हा कधी राज कपूरच्या ‘आवारा’ चित्रपटातील ‘घर आया, मेरा परदेसी…’ गाणं टीव्हीवर दिसतं तेव्हा आदरणीय रंगमहर्षी एम. आर. आचरेकर यांची प्रकर्षाने आठवण होते….

-सुरेश नावडकर 
मोबाईल ९७३००३४२८४

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..