राणी रूपमती आणि बाजबहाद्दर .. अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी.
नुकताच मी इंदूर, उज्जैन भागात जाऊन आलो. तसा मध्यप्रदेश हा सपाटीचा प्रदेश आणि ‘मंद’प्रदेशही. सर्वसाधारण लोक, बिलकुल बढिया, हो जायेगा, देखा जायेगा, उससे क्या फर्क पडता है, इतनी क्या जल्दी है, वगैरे ‘निवांत’ मानसिकतेचे. महाराष्ट्रासारखे तिथे सह्याद्री सातपुड्या सारखे डोंगर पर्वत, हिरवाई, चढउतार, नागमोडी वळणे, वगैरे फार कमीच. अनेक किलोमीटर पर्यंत कंटाळा येईल असे सरळसोट रस्ते.
मला अर्थातच मध्यप्रदेशातील ‘मांडू किल्ला पहायचे खूप आकर्षण होतेच. इंदूर पासून सुमारे शंभर कि.मी.वर आणि सुमारे दोनअडीच हजार फूट उंचीवर असलेला ऐतिहासिक मांडू गड पावसाळ्यात फार हिरवागार आणि निसर्गरम्य दिसत असावा कारण आजही त्याच्या आसपास असलेली हिरवीगार झाडी. किल्ल्याच्या भोवताली अनेक विस्तृत तलाव आहेत, हिरवळ आहे. किल्ल्याच्या आतल्या बाजूला अनेक उंचउंच बांधकामे आहेत, प्रचंड मोठ्या लांबलचक इमारती, हिंडोल महल, जहाज महल, हमामखाने, न संपणा-या ओव-या, गुप्त भुयारे, गुप्त दरवाजे, संपूर्ण गडावर पाणी आणण्याची आणि फिरवण्याची सोय, वगैरे पाहायला मिळतात. किल्ला सुमारे दोन अडीच हजार फूट उंचीवर आहे. गडाशी बाजबहादर आणि रूपमती याच्या प्रेमाची कहाणी जोडली गेली आहे. या गडाभोवती अधू-या प्रेमकथेचे वलय आहे.
दुर्दैवाने आम्हांला मिळालेल्या, तोंडात पानाचा, माव्याचा कीं गुटक्याचा तोबरा भरलेल्या तिथल्या ‘गाईड’चा आपल्या तोंडातल्या ‘रसा’शिवाय गडाविषयी माहिती देण्यात फारसा ‘रस’ नव्हता माहिती देण्यापेक्षां तिथे कुठल्या कुठल्या पिक्चर्सचे शूटिंग झाले, कोणकोण हिरो-हिरॉइन्स होते ते सांगण्यावर जास्त भर होता आणि हौशी पर्यटकही जणूं तिथे आताच शूटिंग सुरूं आहे आणि राजेश खन्ना, हेमामालिनी (किंवा जे कोणी असतील ते) खरोखरच तिथे दिसत आहेत तो गाईड ज्या दिशेला तिथे बोट दाखवेल तिथे अगदी दाटून आलेल्या भक्तिभावनेने आणि आदर भावनेने माना वळवून वळवून पाहत होते आणि तिथे चित्रित झालेली गाणी आठवत होते, (नशीब त्या दिशेला नमस्कार करीत नव्हते )! असो. मी अलगद त्या गाईडला जरा थोडासा ताळ्यावर आणल्यावर त्याने माझ्याकडे ‘न जाने कैसे कैसे लोग आते है’ अशा केविलवाण्या दयार्द्र दृष्टीने पाहून ‘अवंतिका एक्सप्रेस’ च्या वेगाने माहिती सांगायला आणि निरनिराळी ‘स्थळे’ दाखवण्यासाठी आमची फरपट काढायला सुरुवात केली कारण त्याला आम्हांला ‘उरकून’ पुढले गि-हाईक गाठायला जायचे होते. डोक्यावर ऊन्ह रणरणत होते म्हणून आम्हीही निमूटपणे त्याच्या मागून धांवत होतो.
माळवा प्रांतातल्या त्या राजकन्या रूपमतीचा रोज नर्मदेचे दर्शन घेतल्या शिवाय पोटात अन्नाचा एक कणही न घेण्याचा पण होता. राणी रूपमती ही (अर्थातच) कुणाची तरी कन्या, कुणाशी तरी तिचं लग्न झालं पण तिथून नर्मदेचं दर्शन होत नसे. राजकन्या रूपमतीचा तिचा आवाज अतिशय गोड होता आणि गायनकलेवर तिचं प्रचंड प्रेम होतं. तोंडातून पानाची थुंकी उडवत उडवत त्या गाईडने (बाकी गाईडही फारसे कांही वेगळे नव्हते) कांही थोड्या सांगितलेल्या गोष्टींपैकी मला जे समजलं ते थोडक्यात देत आहे.
बाजबहाद्दर हा गाण्याचा शौकीन. बाजबहाद्दर हा मोठमोठे जनानखाने बाळगणा-या मोंगल बादशहांसारखा नुसताच (मराठीतल्या अर्थाने) केवळ ‘बाज’बहादर नव्हता तर पराकोटीचा गानरसिक होता. तो तिच्या सुमधुर आवाजावर फिदा झाला आणि ‘तेरे लिये कुछ भी’ किंवा ‘प्रेमासाठी कांहीही’ या न्यायाने लावण्यवती असण्यापेक्षांही एक सुंदर गायिका असलेल्या रूपमतीला मांडू गडावर आणले (कसे ते माहीत नाही आणि तीही स्वखुशीने आली कीं तिला उचलून आणले तेही समजले नाही) आणि (तिला त्यावेळच्या प्रथेप्रमाणे नुसतेच न ‘ठेवतां’) तिच्याशी रीतसर आंतरधर्मीय विवाह करून तिला राणी बनविले कारण त्याचं तिच्यावर जिवापाड प्रेम बसलं होतं.
झालं, इकडे ‘जिल्हे इलाही’ शहेनशहा अकबराच्या कानावर राणी रूपमतीच्या लावण्याची आणि बाजबहाद्दराच्या ‘पराक्रमाची’ तारीफ आली आणि (भला उसकी कमीज मे कमीज से सफेद क्यूं ? या न्यायाने) त्याची वक्रदृष्टी तिच्यावर पडली. अकबराला ‘गाण्याचं’ वगैरे कांही होतं कीं नाही ते माहीत नाही. त्याने बाजबहाद्दर याला रूपमतीला दिल्लीच्या महालात पाठविण्याचा ‘आदेश’ दिला. बाजबहाद्दर अर्थातच कमालीचा चिडला आणि त्याने अकबराला उलट ‘तुझीच राणी इकडे पाठव’ असा उर्मट निरोप त्याच्याकडे पाठवला (आपण मानला त्याला !). मग झालेल्या प्रचंड अपमानामुळे अंगाचा तिळपापड झालेल्या अकबराने मांडूवर हल्ला चढविण्यासाठी अधमखान याला सैन्यासह रवाना केले. त्याने बाजबहाद्दरचा युद्धात पराभव करून त्याला ठार केले. राणी रुपमतीने अकबराकडे तीन दिवसाची मुदत मागितली आणि हिऱ्याचे चूर्ण खाऊन प्राण दिला. त्यामुळे ही प्रेमकहाणी अधुरी राहिली…. आणि आमचा गाईड दिलेले पैसे अत्यंत अपमानास्पद रीतीने रपकन् खिशात कोंबत आणि बाजूला एक जोरदार पिचकारी मारून दुसरं ‘गिऱ्हाइक’ शोधण्यासाठी तांतडीने गडावरून पायउतार झाला.
येतांना माझ्या मनांत एकच दु:खद विचार सारखा सारखा त्रास देत होता. मी मध्यप्रदेश, उत्तर हिंदुस्तान, गुजरात, मेवाड, मारवाड, राजस्थान, वगैरे प्रांतातले आणि दक्षिणेकडलेही, आधी आपल्या देशातल्या राजांचे आणि नंतर ते बळकावलेल्या मोंगल वगैरे आक्रमकांचे अतिभव्य, उबग यावा अशी अतिश्रीमंती दाखवणारे राजवाडे, किल्ले पहिले. पण आपल्या परमआदरणीय जाणत्या छत्रपती शिवाजी राजांचं मात्र दाखवण्यासारखं एक साजेसं ‘घर’ही नसावं ना आपल्या आख्ख्या महाराष्ट्रात त्या उध्वस्त गडकोट किल्यांशिवाय ? कुणी घर देतां कां घर आमच्या या महापराक्रमी राजाला, कीं नुसतेच महाप्रचंड पुतळे उभारणार ?
मी तिथे अनेक फोटो काढले पण त्यातले कांही निवडक फोटोच इथे देत आहे.
– सुभाष जोशी, ठाणे
Leave a Reply