यशवंत आरामखुर्चीत रेलले होते. चंदू लॅपटॅापवर काहींतरी पहात होता. आत्याबाई चहाचा ट्रे घेऊन आल्या आणि दरवाजाची बेल वाजली. आत्याबाईंनी दार उघडले. बाहेर एक बुरखाधारी स्त्री उभी होती. “मला डिटेक्टीव्ह यशवंतना भेटायचं आहे.” ती स्वच्छ मराठीत म्हणाली. आत्याबाई म्हणाल्या, “या, आंत येऊन बसा. साहेब येतील आता. तुम्ही चहा घेणार कां?” ती स्त्री सोफ्यावर ऐटीत बसली. “नको. मला लवकर यशवंत धुरंधरांची भेट घ्यायची आहे. माझ्याकडे जास्त वेळ नाही.” आत्याबाई म्हणाल्या, “मी सांगते तसं!” त्या स्त्रीने चेहऱ्यावरील बुरखा दूर करत सर्वत्र नजर फिरवली. यशवंतांच्या नीटनेटक्या दिवाणखान्यात एका कपाटांत यशवंताना चहात्यानी दिलेल्या दुर्मिळ भेटवस्तू होत्या. प्रत्येक भेटवस्तूमागे यशवंतानी उलगडलेलं एक रहस्य होतं. तिच्या दर्दी नजरेला त्या वस्तूंची बाजारांतील किंमत ठाऊक होती. आपण योग्य ठीकाणी आलो आहोत, हा विचार तिच्या मनात आला व तिने नि:श्वास सोडला.
२.
यशवंतानी हॅालमधे येताच तिला हात जोडून नमस्कार केला व म्हणाले “राणीसाहेब, आपलं स्वागत आहे.” आपले काळेभोर टपोरे डोळे त्यांच्यावर रोखत राणीसाहेबांनी विचारलं, “मिस्टर धुरंधर, आपण मला कसं ओळखलंत? ते सुध्दा या वेशांत?” यशवंत म्हणाले, “राणीसाहेब, आपण एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होता. तेव्हा वर्तमानपत्रांत आलेला फोटो मी पाहिला होता.” राणीसाहेब आश्चर्य व्यक्त करत म्हणाल्या, “दीड-दोन वर्षांपूर्वी पेपरांत पाहिलेला चेहरा लक्षांत ठेवून त्या व्यक्तीला आजही ओळखू शकता तर मी माझा प्रॅाब्लेम योग्य व्यक्तीकडे घेऊन आलेय, म्हणायचे.” यशवंतानी नम्र स्मित केलं आणि ते म्हणाले, “बोला राणीसाहेब, काय झालं आहे?” राणीसाहेब म्हणाल्या, “तुम्ही पाहिलेला फोटो चांगल्या कारणाने पेपरमध्ये आला होता तरी महाराज रागावले होते. मग माझा दुसऱ्या व्यक्तीबरोबर जवळीक दाखवणारा फोटो त्यांनी पाहिला तर मला राजवाडा तर सोडावा लागेलच पण आणखीही कांही शिक्षा देतील.” यशवंत म्हणाले, “कोणी तुम्हांला एखाद्या फोटोमुळे ब्लॅकमेल करत आहे कां?”
३.
राणीसाहेब म्हणाल्या, “लग्नाआधी मी पुण्यातील कॅालेजात होते. मला बॅडमिंटन खेळण्याची खूप आवड होती. कॅालेज व क्लब दोन्ही ठीकाणी चंद्रकांत सरंजामे माझा कोच होता. उंच, उमदा, बॅडमिंटनपटू चंद्रकांत उत्तम कोच होता. तो वयाने चाळीशीहून मोठा होता. विवाहित होता. एका इंटर-युनिव्हर्सिटी स्पर्धेला आम्ही मुलं-मुली आणि कोच पाटण्याला गेलो होतो. आमचा संघ जिंकला. शेवटच्या दिवशी मला खूप ताप आला. हॅास्पिटलला ॲडमिट व्हावं लागलं. त्याच दिवसाची परतीची तिकीटे होती. चंद्रकांतने सर्वांना गाडीत बसवून पाठवून दिलं. तो माझ्या मदतीसाठी मागे राहिला. आमची तिकीटे आठ दिवस पुढे ढकलली. तो दोन दिवस माझ्या उशाशी बसून होता. तिसऱ्या दिवशी माझा ताप उतरला. अशक्तपणाने मला त्याचा आधार घ्यावा लागत होता. दोनच दिवसांत मी ताजी तवानी झाले. तरी आणखी दोन दिवस तिथे रहाणं भाग होतं. तिकीटं दोन दिवसांनंतरची होती. त्याने माझी केलेली सेवा पाहून मी त्याच्यावर लुब्ध झाले होते. मी अल्लडच होते. तो तयार नसतांनाही मीच त्याला भरीला पाडले व दोन दिवस आम्ही मर्यादा ओलांडल्या. आम्ही एकमेकांचे खूप फोटो काढले. कॅमेऱ्याला टायमर लावून आम्ही दोघांचे एकत्र फोटोही काढले. मी धुंदीतच पुण्याला त्याच्याबरोबर परत आले.
४.
सर्व फोटो माझ्याकडेच होते. दोघांचा एक जवळीक दाखवणारा फोटो मात्र त्याने आमची आठवण म्हणून घेतला. त्यानंतर गोष्टी वेगाने घडल्या. वडिलांनी मला घरी बोलावून घेतले आणि मला xxxxx संस्थानच्या तरूण महाराजांनी मागणी घातल्याचे व माझी संमती गृहीत धरून होकार दिल्याचे सांगितले. मी लवकरच संस्थानची महाराणी म्हणून ओळखली जाऊ लागले. देखण्या आदित्यराजनी माझ्या सुखात कोणतीही कमतरता ठेवली नाही. आम्हाला एक पुत्र आणि एक कन्याही झाली. महाराजांचे प्रेम कडवे आहे. माझा कुणी फोटो काढलेला सुध्दा त्यांना चालत नाही. मला ते सार्वजनिक कामांपासून दूर ठेवत. मी माझ्या दासी, माझे वेगवेगळे महाल, ह्यांतच मला रमावे लागे. मी खानदानाचे रितीरिवाज आत्मसात केले. आमच्या विवाहाला पुढल्या वर्षी वीस वर्षे होतील. पण कदाचित त्याआधीच… !” यशवंतनी विचारले, “त्याच फोटोवरून कुणी तुम्हाला ब्लॅकमेल करतयं कां?” राणीसाहेब म्हणाल्या, “हो, चंद्रकांत दोन वर्षांपूर्वी मरण पावला. आमच्यात संपर्क नव्हताच. आमचे सर्व फोटोही मी नष्ट केले होते. तीन महिन्यांपूर्वी मला एक फोन आला. आवाजावरून तरूण वाटला. “महाराणी, XXXXX !” मी फोन कट केला. लगेच त्याचाच पुन्हा फोन आला. आता थोड्या करड्या भाषेंत तो म्हणाला, “तुमच्या हिताची गोष्ट आहे. सरंजामे कोच आठवतात कां? त्यांच्याबरोबर काढलेला फोटो आठवतो कां?” मग मात्र मी चमकले. मी विचारलं, “कोण बोलतंय?” “कोणी कां असेना! तो फोटो आता माझ्याकडे आहे, हे महत्वाचं! खात्री पटवायसाठी कॅापी पाठवू?” तो म्हणाला. मी गप्प राहिल्याचे पाहून तो म्हणाला, ‘महाराजांकडे कॅापी न पाठवण्याचे दोन लाख रूपये लगेच पाठवा. मी सांगतो त्या दोन नंबरना एक एक लाख जीपे करा.’
५.
“मी भीतीपोटी ते पाठवले. दोनदा असं झाल्यावर आता तो म्हणतोय की तो पन्नास लाख रूपयांना तो फोटो कायमचा मला परत द्यायला तयार आहे.” राणीसाहेब थांबल्या. यशवंत म्हणाले, “प्रथमच तुम्ही त्याला कांहीच द्यायला नको होतं. आतां तो धीट झाला. त्याने मागणी एकदम वाढवली आणि खात्री काय की तो त्या फोटोच्या कॅापीज काढून ठेवणार नाही?” राणीसाहेब म्हणाल्या, “मला समजतय पण काय करू? कोण आहे, तेंही कळत नाही. पुन्हा मी हे अगदी खास माणसांशीही बोलू शकत नाही. रक्कमही इतकी मोठी मागितली आहे की ती देणे सुध्दा सहज शक्य नाही. म्हणून तर तुमच्याकडे आले आहे. माझे गुपित कायम राहिलं पाहिजे नाही तर माझे आयुष्य बरबाद होईल.” यशवंत धीर देत म्हणाले, “तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला ज्या ज्या नंबरवरून फोन आले, ते नंबर आहेत कां? जी पे केलेत ते नंबरही सांगा.” राणीसाहेब म्हणाल्या, “आहेत. प्रत्येक वेळी वेगळा नंबर आहे.” यशवंत म्हणाले, “सरंजामेंचा जुना/नवा पत्ता आठवत असेल तर तो सांगा. माझा भाचा व मदतनीस चंदू लिहून घेईल.” राणीसाहेब म्हणाल्या, “सरंजामेंचा जुना वाडा पुण्यात होता.” यशवंतनी विचारले, “पन्नास लाख रूपये कसे द्यायचे आहेत?” राणीसाहेब म्हणाल्या, “मी हो म्हटल्यावर तो मला एक बॅंक अकाउंट नंबर पाठवणार होता. त्यानंतर बारा तासांत पैसे क्रेडीट झाले नाही तर फोटोची प्रत महाराजांना पाठवणार.”
६.
राणीसाहेब जाता जाता म्हणाल्या, “मी इथे आले होते, हे कुणाला कळू नये म्हणून हा वेश घेतला आहे. अगदी गरज वाटेल तेव्हांच ह्या नंबरवर एसएमएस पाठवा.” त्यांनी पुन्हा चेहरा झांकला व त्या दरवाजांतून वेगाने निघून गेल्या. यशवंतानी चंदूला सांगितले, “चंदू, तात्काळ पुण्याला जाऊन सरंजामेंचा वाडा, त्याचे वारस, वगैरेची सर्व माहिती काढायची.” चंदू कारने चार तासांत पुण्याला पोहोंचला. पुण्याच्या मतदारांच्या यादींत अठरा सरंजामे होते. त्या अठरांतील वीस ते चाळीसमधील दहा जणांची माहिती काढायला हवी होती. यशवंताशी त्याचा सतत संपर्क होता. यशवंतानी त्याला सरंजामे ज्या क्लबमधे कोच होते तिथल्या एखाद्या जुन्या मेंबरला भेटायला सांगितले. संध्याकाळी चंदू आपल्या मुंबईच्या क्लबचा रेफरन्स देऊन त्या क्लबवर गेला. तिथे त्याला एक सत्तरीतील गृहस्थ भेटले. गप्पा मारतां मारता विषय सरंजामेंवर येऊन पोहोचला. ते गृहस्थ म्हणाले, “उमदा माणूस. माझ्याहून थोडा मोठा.” चंदूने विचारलं, “त्याची मुलं मेंबर नाहीत कां ह्या क्लबची?” ते गृहस्थ म्हणाले, “नाहीत. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी. मुलाने आपलं आडनांव बदललय. मुलीचं लग्नामुळे आपोआप बदललय.” चंदूने मनातल्या मनात त्या गृहस्थाचे आभार मानले. दहा जणांची चौकशी करण्याचे टळले होते. आडनाव बदल तो रेकॅार्डवरून सहज शोधू शकला असता.
७.
दुसऱ्या दिवशी चंदूला सरंजामेंच्या मुलाची माहिती मिळाली. त्याचे नांव आता बिपिन अधिकारी होते. बिपिन एका बॅंकेत मॅनेजर होता. मुलीचं लग्न पुण्यातीलच राजीव कुळकर्णीशी झालं होतं. त्याचे एक दुकान होते. यशवंतनी तोपर्यंत फोनचे तपशील मिळवले होते. सर्व फोन पुण्यातूनच केलेले होते. त्याअर्थी राणीसाहेबांच्या संस्थानमधील कोणाचा त्या प्रकरणाशी संबंध नसावा. म्हणजे संशयाची सुई बिपिन आणि राजीव ह्यांच्याकडेच वळत होती. यशवंतांनी राजीवच्या दुकानाची माहिती काढायला सांगितले. चंदुने तोपर्यंत दुकानाला भेट दिलीही होती. ते दुकान इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे होते. विविध कंपन्यांचे मोबाईल तिथे विक्रीला होते. चंदू यशवंताना म्हणाला, “मामा, बहुतेक हा राजीवच आपल्याला हवा असणारा माणूस असावा.” यशवंत म्हणाले, “ठोस पुरावा नसतांना आपण त्याच्याशी बोलू शकत नाही. कांही तरी ठोस पुरावा हवा. त्याचा फोन नंबर मिळाला कां?” चंदू म्हणाला, “त्याचा फोन नंबर मी तुम्हाला आताच पाठवलाय.” यशवंत थोडं थांबून म्हणाले, “पाहिला. हा आणखीच वेगळा नंबर आहे. त्याचे दुकान आणि घर कुठे आहे? राणीसाहेबांना आलेल्या एका फोनचे लोकेशन कर्वे रोडवर आहे. बाकीच्या फोनचे नेमके लोकेशन नाही मिळाले. तू बिपीन आणि राजीव दोघांवरही नजर ठेव. ते कुठे भेटतात कां, ह्यावर नजर ठेव. मी तुला उद्या सकाळी पुण्यात भेटतो. तू कर्वे रोडवरील नेहेमीच्या हॅाटेलांत रहा.”
८.
यशवंत मुंबई -पुणे प्रवासांत विचार करत होते. राजीव की बिपीन? की तिसऱ्याच कुणाच्या हाती तो फोटो लागला होता? कोणीहीकडून तें वदवून कसं घ्यायचं? एकाला प्रश्न विचारले आणि तो ह्या प्रकरणात नसला तर त्याला उगीच माहिती व्हायची आणि मग राणीसाहेबांच गुपित फोडल्याचा आरोप आपल्यावरच येईल. राजीवला विविध फोन वापरणे सोपे होते तर बिपीनला बॅंक अकाउंट मॅनेज करणे शक्य होते. शिवाय बिपिनने आडनांव कां बदलले? त्यांनी लगेच राणीसाहेबांच्या खास मोबाईलवर एसएमएस पाठवला. “होकार द्या व अकाउंट नंबर मिळताच मला पाठवा.” यशवंत पुण्याला पोंचण्याआधीच त्यांच्याकडे अकाउंट नंबर आणि इतर तपशील आला. ही तीच बॅंक होती. जिथे बिपिन ब्रॅंच मॅनेजर होता. अकाउंट होल्डरचे नांव होते “चंद्रकांत सरंजामे”. यशवंतनी चंदूला फोन करून बिपिन बॅंकेच्या ज्या शाखेचा मॅनेजर होता, तिथे बोलावून घेतले. हातांत एक बॅग घेऊन दोघे बिपिनच्या केबीनमध्येच गेले. यशवंत बिपिनला म्हणाले, “आम्ही पन्नास लाखाची रोकड घेऊन आलोत.” बिपीन गडबडला पण सांवरून घेत म्हणाला, “तुम्ही अकाउंट उघडले आहे कां?” यशवंत म्हणाले, “नाही. आम्हाला ते चंद्रकांत सरंजामे ह्यांच्या अकाउंटला जमा करायचे आहेत.” बिपीन पुन्हा स्वत:ला सांवरत म्हणाला, “तुम्ही तसे एक पत्र लिहून द्या आणि करा क्रेडीट.” यशवंत म्हणाले, “माझं नांव, यशवंत धुरंधर. मी एक खाजगी डिटेक्टीव्ह आहे. मिस्टर अधिकारी, चंद्रकांत सरंजामें मृत असतांना त्यांचे अकाउंट कसे?” बिपिन ओरडला, “नन ॲाफ युवर बिझनेस!” यशवंत शांतपणे म्हणाले, “मिस्टर अधिकारी, हा तुम्ही गुपचूप उघडलेला खोटा अकाउंट आहे. पैसे जमा होताच तुम्ही ते काढून घेऊन अकाउंट बंद करणार आहांत. हो ना? असे आणखी किती अकाउंट उघडलेत?”
९.
बिपिन अधिकारी एकाएकी रडकुंडीला आला. “धुरंधर साहेब, नको ते पैसे मला. बाबा गेल्यावर तो फोटो मी पाहिला. दोघांनी कमरेभोवती हात घातलेले आणि बाबा तिचे चुंबन घेत आहेत, असे दृश्य पाहून मला माझ्या बाबांचा आणि त्या स्त्रीचा खूप राग आला. बाबा तर गेलेच होते पण जिच्यामुळे बाबांनी माझ्या आईशी प्रतारणा केली तिला धडा शिकवलाच पाहिजे असे माझ्या मनाने घेतले. मी मनांत कुढत होतो. मी रागाने माझे आडनांव बदलले, सर्व माहिती मिळवली आणि शेवटी हे दु:साहस केले. मला क्षमा करा.” फोटोचा तपशील ऐकून यशवंत बिपिनचा राग समजू शकले. वरकरणी कठोर स्वरांत यशवंत म्हणाले, “तू दोन गुन्हे केले आहेस. ब्लॅकमेल करणे आणि खोटे अकाउंट उघडणे. हे दोन्ही मी सिध्द करू शकतो.” बिपिन म्हणाला, “माझं जीवन उध्वस्त करू नका. मी ही गोष्ट कुठेच सांगणार नाही आणि हा घ्या तो फोटो. मला तो डोळ्यांसमोर नकोच आहे. माझ्याकडे त्याची एकही प्रत नाही, अगदी मोबाईलवरही. पूर्वीचे चार लाखही घेऊन जा.” त्याने जुना झालेला तो फोटो खणांतून काढून यशवंतांच्या हाती दिला.
लवकरच राजा रविवर्मांचे एका पेंटींगची सुंदर प्रतिकृती यशवंताच्या हॅालच्या भिंतीवर दिसू लागली. त्यावर सही होती महाराणी कामिनी पण ती केवळ यशवंतानाच वाचतां येत होती.
अरविंद खानोलकर
Leave a Reply