1.लिपिक म्हणून काम करत असताना मला एकदा या रोखपालाच्या पिंजऱ्यात (तात्पुरते – एकदोन दिवसांसाठी) शिरावे लागले. रोखपाल म्हणून हा पहिलाच अनुभव.
त्याकाळी व्यापारी मंडळी त्यांच्याजवळील भली मोठी रक्कम बँकेत आणून भरत. रोखपालाकडे गर्दी असेल तर नोटांची पिशवी व चलन रोखपालाकडे ठेवून जात. गर्दी ओसरली की सवडीने, रोखपाल ती पिशवी उघडे आणि रोकड मोजून घेई. समोर संबधित दुकानदार नसेच! सारी काम विश्वासावर! ही नेहमीचीच प्रथा!
इथेही त्या दिवशी नेहमीचा एक व्यापारी अशीच थैली ठेवून गेला. माझ्या सवडीने मी ती उघडली व रक्कम मोजू लागलो. भरणा चलनात सांगितलेली रक्कम आणि प्रत्यक्षातील रक्कम यात अंतर होते. रु. 5000 ने रक्कम कमी होती. माझे धाबे दणाणले. (ही कथा आहे, 1970-71 ची!) मी तीन-तीनदा रक्कम मोजली. घाबरलो. शाखा व्यवस्थापकांना सांगितले. त्यांनीही स्वतः ती मोजली. रक्कम कमीच होती!शाखा व्यवस्थापक चतुर, सहृदयी, अनुभवी होते. ते तत्काळ संबधित व्यापाऱ्याच्या दुकानी गेले व त्याला जाब विचारला. व्यापाऱ्याने त्याचा गल्ला तपासला. तोही प्रामाणिक होता. त्याने मान्य केले; रक्कम गल्ल्यातच राहिली होती!
माझा जीव भांड्यात पडला.
शाखा व्यवस्थापक संतापलेच होते. ते व्यापाऱ्याला म्हणाले, ‘तुमच्या या दुर्लक्षामुळे त्याची बिचाऱ्याची नोकरी गेली असतीना! व्यापाऱ्याने क्षमा मागितली व विषय संपला.’
- त्याच दिवशी आणखी एक झटका बसला. शिल्लक रोकड आणि पुस्तकी रोकड जमेना! केवळ पन्नास पैशांचा फरक येत होता. पुन्हापुन्हा मोजूनही फरक सापडेना.
पुनश्च शाखा व्यवस्थापकच सहाय्यास धावले. आता उलगडा झाला. मी एक पन्नास पैशांचे नाणे रुपया समजत होतो!!
3.मध्य प्रदेशातील एका छोट्याशा गावात श्रीरंगची शाखाव्यवस्थापक म्हणून नेमणूक झाली. आदिवासी विभागातले हे गाव. नव्या शाखेचा श्रीरंग हा पहिलाच शाखा व्यवस्थापक. आणि हो! श्रीरंगसाठीसुद्धा हा व्यवस्थापक पदाचा पहिलाच अनुभव! सारेच पहिलटपण!
आदिवासींनी बँक कुठली पाहिलेली? वाड्यांवस्त्यांतून जाऊन त्यांना बँकिंग समजावून सांगताना श्रीरंगच्या नाकी-नऊ यायचे.
बँकेत आल्यावरसुद्धा हे आदिवासी जिज्ञासू नजरेने इकडे-तिकडे पहात तासभर थांबायचे!
एक दिवस असाच एक आदिवासी – आपण त्याला भैरू म्हणू! – बँकेत आला. त्याला खात्यात एक हजार रुपये भरायचे होते. कर्मचाऱ्यांनी आवश्यक ते चलन भरून घेतले; रोखपालाने हजार रुपये मोजून घेतले. भैरुला पावती दिली. भैरू पुढे काय होते, हे पहात तेथेच रेंगाळला. रोखपालापुढे पुढले काम होते – दुसऱ्या कोणाचे तरी पैसे देण्याचे. तेही नेमके हजारच रुपये होते. रोखपालाने आताच हाताशी आलेले एक हजार रुपये संबंधित ग्राहकास देऊन टाकले. रोखपालाच्या दृष्टीने हा अगदी सामान्य व्यवहार होता.
पण हे सर्व निरखून पाहणाऱ्या भैरुला ते काही पटले नाही.
तो तडक शाखा व्यवस्थापकांच्या खोलीत तणतणत घुसला. आणि जोरजोरात सांगू लागला, ‘साहब, कॅशियर बाबू ने मेरे पैसे दुसरों को दे दिये!’
सर्व तपशील ऐकून घेतल्यावर श्रीरंगच्या ध्यानात आले, काय घोटाळा झाला आहे.
भैरुला बँकिंग, चलन व्यवस्था … इत्यादी गोष्टी समजावून सांगण्यात अर्थ नव्हता. आणि त्याची समजूत तर काढायला हवी होती.
मग श्रीरंग भैरूला घेऊन रोखपालाच्या पिंजऱ्यामागे गेला. आतील बाजूने त्याने नोटांच्या थप्प्या भैरूस दाखवल्या. आणि म्हणाला, ‘भैरू, देखो! तुम्हारे पैसे यहीं हैं! कॅशियर बाबू ने जो पैसे दिये वे इन नोटों के बंडलों में से दिये हैं! तुम्हारे नहीं!’
आता भैरूला ते पटले; तो सुखावला; आणि समाधानाने घरी परतला.
जर श्रीरंगने अशा रीतीने त्याचा विश्वास कमावला नसता तर, भैरू हेच सर्वांना सांगत सुटला असता. आणि एकदा का बँकेवरील विश्वास उडाला असता, तर मग बँक चालवणे कठीणच बनले असते.
पण श्रीरंगने हे सर्व चातुर्याने टाळले होते.
- एका शाखेतील एक रोखपाल! तिरसटच! ग्राहकांशी नीट वागणे नाही. सारखी हिडीसफिडीस! ग्राहकसेवेची यत्किंचितही चिंता नाही. त्यामुळे ग्राहकही त्रासलेलेच! अशा वेळी ग्राहकही संधीची वाट पहात असतात.
एकदा एका व्यापाऱ्याने काही रक्कम ड्राफ्ट खरेदीसाठी भरली. नेहमीचा व्यापारी; रक्कम मोठी; म्हणून रोखपालाने ती बाजूला ठेवली; छोटया छोट्या रकमांचे व्यवहार पूर्ण करून मग ती थैली मोजण्यास घेतली. आता व्यापारी समोर नव्हता. रोखपालाच्या लक्षात आले, शंभर रुपये कमी आहेत. त्याने तत्काळ शिपायास व्यापाऱ्याच्या दुकानी पाठवले. पण दुकान बंद होते. व्यापारी जेवायला गेला होता.
नेहमीचाच ग्राहक; भरेल पैसे; असा विचार करत रोखपालाने चलन बाहेर पाठवले. रीतसर ड्राफ्ट निघाला; व्यापाऱ्याचा नोकर येऊन ड्राफ्ट घेऊनही गेला.
संध्याकाळी पुनश्च रोखपालाने शिपायास व्यापाऱ्याच्या दुकानात पाठवले, व शंभर रुपये कमी असल्याचे सांगितले!
व्यापारी आला तो रागातच! आता एक्का त्याच्या हातात होता.
त्याने म्हटले, मी सर्व रक्कम व्यवस्थित भरली आहे; म्हणून तर मला ड्राफ्ट मिळाला! जर रक्कम कमी असती तर ड्राफ्ट दिला गेलाच नसता! या रोखपालानेच काही गडबड केली आहे; मी आता पोलिसांत तक्रार नोंदवतो!
प्रकरण चांगलेच पेटले. त्या रोखपालाची पाचावर धारण बसली. शाखा व्यवस्थापकांच्या मध्यस्थीने काही तडजोड झाली व प्रश्न सुटला.
या सर्व प्रकारास संबंधित रोखपालाची आजवरची वर्तणूक कारणीभूत होती. आज त्याचा स्फोट झाला इतकेच!
- एकदा मी सुरक्षा रक्षकांचा प्रशिक्षण वर्ग घेत होतो. सुरक्षा रक्षकाने कोणकोणती आणि कशी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, हे सांगण्यात मी व्यग्र होतो.
याच दरम्यान एक रक्षकाने आपला एक अनुभव सांगितला. तो त्याच्याच शब्दांत –
मी नेहमी रोकड वाहतूक करणाऱ्या गाडी सोबत असतो. जिल्ह्यातील सर्व शाखांना रोकड पुरवणे, त्यांच्याकडील अधिकची रोकड गोळा करणे हे आमचे काम. तसे जोखामीचे. मी बंदूक घेऊनच सज्ज असतो.
एकदा आम्ही असेच रोकड घेऊन प्रवास करीत असताना ध्यानात आले की, एक मोटर सायकल आमचा पाठलाग करते आहे. मी सावध झालो. गाडीतील अन्य सहकाऱ्यांनाही सावध केले.
… आणि अपेक्षे प्रमाणे मोटर सायकालवरील त्या दोघांनी आमचे वाहन ओलांडून ते रोखले. मी बंदुकीच्या घोड्यावर हात ठेवीतच खाली उतरलो.
त्या दोघांनी तावातावाने भांडायला आरंभ केला.
गोष्ट वेगळीच होती. आमच्याच गाडीतील एकाने तंबाखूने भरलेले तोंड खिडकीतून रिकामे केले होते. व ती घाण त्या दोघांच्या अंगावर पडल्याने ते चिडले होते. क्षमा मागून प्रश्न निकाली निघाला.
पण या सुमारास मी मात्र घामाने चिंब झालो. माझ्या हातून चुकून जरी गोळी सुटली असती, तर … केवळ विचारानेही मी थिजलो!
‘अशावेळी मी काय करणे अपेक्षित होते?’ असे तुम्ही विचाराल.
प्रसंग खरोखरीच रोमहर्षक होता. मी उत्तरलो – प्रसंग निःसंशय बाका होता. तुमच्या हातातील बंदूक हे खेळणे नव्हे! त्याचा सुयोग्य, विवेकी वापर आवश्यकच! त्या त्या प्रसंगात जशी बुद्धी सुचेल, तसे करणे क्रमप्राप्त! सदसद्विवेक बुद्धीने काम करत असलात, तर तुम्हाला कोणी दोषी ठरवणार नाही!
-श्रीकांत जोशी
(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
Leave a Reply