नवीन लेखन...

राष्ट्रप्रेम;व्यक्त करणं आणि दाखवणं-

मन कि बात..

चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जात असताना उभं राहाण्याची गरज नसल्याचा निर्वाळा काल सर्वोच्च न्यायालयाने दिला. असा निर्वाळा देताना सर्वोच्च न्यायालयाने सन २०१६ साली चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवण्याची सक्ती करण्याविषयी स्वत:च दिलेल्या निर्णयातील शब्दरचना बदलण्याची तयारीही दर्शवली. दि. १ डिसेंबर २०१६ साली सर्वोच्च न्यायालयानेच देशातील सर्व चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जावे व त्याप्रसंगी यर्व उपस्थितांनी उभं राहायला हवं असा आदेश दिला होता.

देशाच्या मानचिन्हांचा आदर अवश्य राखला जावा. राष्ट्रध्वज किंवा राष्ट्रगीत यांचा सन्मान देशातील प्रत्येक नागरीकाने राखला पाहिजे, याविषयी दुमत असण्याचं कारण नाही. मातृभुमीविषयी आदर, प्रेम व्यक्त करण्याचा तो एक मार्ग आहे.

परंतू देशाविषयी प्रेम किंवा आदर दाखवण्यासाठी तो एकमेंव मार्ग नव्हे. बहुसंख्य लोक एकाच अर्थाने वापरत असले तरी, ‘व्यक्त’ करणं आणि ‘दाखवणं’ या दोन शब्दप्रयोगात मोठा फरक आहे.. ‘व्यक्त’ करणं म्हणजे, आपल्या मनातील आनंद, खेद, दुःख, प्रेम, मत, विचार इत्यादी किंवा कोणत्याही भावना शब्द अथवा कृतीतून उघड करणे. ‘व्यक्त’ हा शब्द अधिक नैसर्गिक आहे. तर, ‘दाखवणं’ या शब्दात मुळातच एक लबाडीची, जे नाही ते उघड करण्याची झांक आहे. कोणतीही भावना आपण जेंव्हा ‘व्यक्त’ करतो, तेंव्हा ती आपल्या अगदी आतून आलेली, उत्स्फुर्त असते व ती भावना व्यक्त करणारी कृती नकळत घडत असते. तिच भावना आपण जेंव्हा दाखवण्याचा प्रयत्न करतो, तेंव्हा ती भावना आतून आलेली असतेच, असं ठामपणे म्हणता येत नाही. बऱ्याचदा ते, नसलेलं ते ‘दाखवणं’ असू शकतं, विंडो ड्रेसिंग सारखं. आपल्या देशातील बहुसंख्य व्यक्त होण्यापेक्षा दाखवण्याला महत्व देतात. मी असं का म्हणतो, ते पुढं स्पष्ट करतो. आपली गफलत नेमकी या दोन शब्दप्रयोगात होते आणि मग वाद निर्माण होतात.

चित्रपटगृहातच कशाला आपल्या देशाच्या राष्ट्रगीताची धून दुरून कुठूनही कानावर आली, की आपण आपल्याही नकळत स्तब्ध उभं राहाणी, ही देशाविषयी प्रेम ‘व्यक्त’ करणारी भावना झाली. असं आपण करतो का, हा प्रश्न ज्याने त्याने स्वत:लाच विचारावा आणि त्याचं उत्तर प्रामाणिकपणे द्यावं. चित्रपटगृहात राष्ट्रगीताला आपण जे उभं राहातो, ते ‘दाखवणं’ झालं असं मला वाटतं. सर्वांचंच नसेल, परंतू बहुतेकांविषयी असंच म्हणता येईल. मी असं का म्हणतो, ते ही सांगतो. मी चित्रपटगृहात राष्ट्रगीताला उभं राहातात त्यांच्याविषयीच बोलणार आहे. जे उभे राहात नाहीत, त्यांना आपण ‘गद्दार’वैगेरे ठरवून टाकलेलंच असतं, त्यामुळे त्यांच्यावर बोलणं मी सध्या टाळतो.

चित्रपटगृहात राष्ट्रगीत लागल्यावर उभे राहाणारे किती ‘राष्ट्रभक्त’ देशाचे इतर कायदे-नियम जाऊ दे, रस्त्यावरचे ट्राफिकचे साधारण नियम हवालदाराच्या अनुपस्थितीत इमानदारीने पाळतात? नोकरीत लांच खात नाहीत? कामावर वेळेत पोहोचतात? कामासाठी आलेल्या एखाद्या माणसाचं काम टेबलाखालून पैसे न घेता वेळेवर करून देतात? आपलं काम होण्यासाठी लांच देतात? दुसऱ्याचा न्याय्य हक्क मारत नाहीत? एखाद्याकडून काम करुन घेऊन त्याचा योग्य तो मोबदला देतात? करचोरी करत नाहीत? काळाबाजार करत नाहीत? अडचणीत सापडलेल्याचा गैरफायदा घेऊन त्याला लुबाडत नाहीत? जात, पंथ, भाषा, धर्म इत्यादी भेद न पाळता वागतो? हे व असे कितीतरी प्रश्न आहेत, की जे या देशप्रेमी लोकांना विचारता येतील. या देशप्रेमींपैकी कितीजण छातीठोकपणे ‘मी असं वागतो/वागते’ सांगू शकतील? मला वाटतं, हा टक्का खुप म्हणजे खुपच कमी भरेल. प्रामाणिकपणाने, कायद्याने, नितीने आणि सत्याने वागणारे नागरीक खरे देशप्रेमी असतात, कारण ते आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे आणि चोखपणे करून त्यांचं देशप्रेम आणि देशभक्ती ‘व्यक्त’ करत असतात. त्यांना ते आहे असं, ते ही फक्त थेटरात उभं राहून ‘दाखवण्याची’ गरज नसते. थेटर असो की स्मशान, राष्ट्रगीताची धून ऐकू आली, त्याची सन्मानदर्शक कृती त्यांच्याकडून आपोआप घडते. शरीरात असलेल्या प्रामाणिक मनाने, त्यांच्याही नकळत घडवलेली ती प्रतिक्षिप्त क्रिया असते आणि त्या क्रियेला फक्त चित्रपटगृहाच्या काळोखी वातावरणाचं बंधन नसतं. श्वासोश्वासा एवढीच ती कुठेही घडणारी स्वाभाविक आणि नैसर्गीक कृती असते.

राष्ट्रगीताला उभं राहा अथवा राहू नका, त्याने काहीच फरक पडत नाही. अशी सक्ती तर असूच नये. लोकशाहीत अशी सक्ती करताही येत नाही. राष्ट्रगीताला उभे राहाणे, ती ही फक्त थेटरात, हा देशप्रेम किंवा देशाविषयीचा आदर व्यक्त करण्याचा काही एकमेंव मार्ग नव्हे. देशप्रेम दाखवण्याची सक्ती करणं आणि कुणीतरी तसं सर्टीफिकेट देणं, हा तर साफ चुकीचा मार्ग आहे. देशाने केलेल्या कायदे-नियमांचं पालन करणं, भ्रष्टाचार न करणं. प्रामाणिकपणाने आणि सत्याने वागणं, दुसऱ्यावर अन्याय न करणं आणि तसा अन्याय कोणी करत असेल, तर त्याला रोखणं हे व असे कितीतरी मार्ग आहेत, की ज्यायोगे आपण आपल्या देशाविषयी प्रेमादराच्या भावना व्यक्त करू शकतो. हे केलं ना, की मग देषाविषयी आपोआप आदर निर्माण होतो आणि मग देशप्रेम व्यक्त होतं.

देशप्रेम म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी, प्रथम देश म्हणजे काय, हे समजबन घेणं आवश्यक आहे. देश म्हणजे चार दिशा असलेला केवळ एक जमिनिचा तुकडा, plot of land नव्हे. तर देश म्हणजे ज्या मातीत प्रत्येक माणसाच्या भाव, भावना, इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा आदी गोष्टींना मूर्त स्वरुप देण्यासाठी आवश्यक आणि आश्वासक वातावरण निर्माण करून दिलं जातं, तो विशाल भुभाग. याकरता योग्य ती ‘सिस्टीम’ त्याच देशातील जनतेने निर्माण केलेली असते. ही जी काही सिस्टीम असते ना, त्या सिस्टीमच्या प्रामाणिकपणाने राबण्यावर त्या देशाविषयी देशवासीयांच्या मनात आपोआप प्रेम निर्माण होत असते. कारण प्रेम हे जबरदस्तीने होत नसतं हे हिन्दी चित्रपट पाहून तरी आपल्याला माहित असेल. जबरदस्तीने होतो, तो बलात्कार, प्रेम नव्हे. सिस्टीम जेवढं प्राणिकपणे काम करेल, तेवढं देशाविषयीचं प्रेम वाढत असतं. देशाविषयीची माझी व्याख्या ही आहे. तशी ती प्रत्येकाची व्याख्या वेगळी असू शकते, परंतू त्याचं सार मात्र थोड्याफार फरकाने मी या परिचिछेदात म्हटलंय तसंच असेल यात शंका नाही.

या पार्श्वभुमीवर आपल्याकडे काय चित्र दिसतं, हे प्रत्येकाने प्रामाणिकपणाने ठरवावं. आपली सिस्टीम म्हणजे शासन आणि प्रशासन. या दोघांचे आपण अविभाज्य घटक असल्याने आपणही. या दोन्ही गोष्टींचं वागणं खरंच प्रत्येकाच्या मनात देशाविषयी प्रेम निर्माण करणारं आहे का हो? खरंच हे दोन जण सर्वांना समान संधी उत्पन्न करून देतात का? राष्ट्रध्वज सकाळ संध्याकाळ अभिमानाने अंगाखांद्यावर मिरवणाऱ्या या दोन बाजूंकडून, राष्ट्रध्वजाचा सन्मान वाढवणाऱ्या कृती खरंच होत असतात? आपण जेंव्हा देशावर प्रेम करतो म्हणतो, तेंव्हा या सिस्टीमवर प्रेम करतो आणि जेंव्हा देशाविषयी चिड व्यक्त करतो, ती या सिस्टीमविषयीची चिड असते. प्रेम विश्वासात फुलतं. आपल्या देशातली सिस्टीम खरंच असा विश्वास आपल्याला देते का हो, जिथे प्रेम फुलेल? माझ्या मते आणि अनुभवानेही या व अशा प्रश्नांची उत्तर नकारार्थीच आहेत. अशा नकारातच मग सक्ती जन्म घेते आणि प्रेमाचं व्यक्त होण्यापेक्षा दाखवणं गरजेचं बनतं. व्यक्त करणं हे एखाद्या साध्या हुंकारातच असतं, मोठमोठ्या भाषणात होत असतो, तो बलात्कार किंवा जबरदस्ती किंवा सक्ती.

एका ट्रकच्या मागे लिहिलेलं ‘दस में से नौ बेईमान, फिर भी मेरा भारत महान’ हे वाक्य देशप्रेमाविषयी बरंच काही सांगून जातं. एका सामान्य ट्रक ड्रायव्हरने देशाच्या महानतेविषयी इतक्या थोडक्या शब्दांत व्यक्त केलेली इतकी चपखल भावना, माझ्या पाहाण्यात इतरत्र आलेली नाही.. सर्वच सामान्य माणसाचं देशाविषयीचं मत त्यानं समर्थपणे व्यक्त केलंय असं मला वाटतं..हे चित्र जेंव्हा ‘दस में से कोई भी ना बेईमान, इसी लिये मेरा भारत महान’ होईल, तेंव्हा सर्वच लोक राष्ट्रगीतासाठी आपणहून उभे राहातील, सक्तीची गरजच उरणार नाही.

-नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..