नवीन लेखन...

राष्ट्रव्यापी संपातून घडलेले करियर

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये जोसेफ तुस्कानो यांनी लिहिलेला हा लेख


जगणे सरळधोपट असले की त्यात बेचवपणा येतो. कुतूहल, धाडस, उत्कटता, ईर्षा यातून बरेवाईट निर्णय घेऊन आपण जगतो. ठेचकळत, अडखळत अपयशावर मात करत यश संपादन करतो त्याची चव काही औरच असते. आयुष्यातील विविध टप्प्यात उत्कृष्ठतेचा ध्यास अवश्य मनी असावा, पण तिच्या प्राप्तीचा हट्ट नसावा. ‘देवाची इच्छा’ ही एक पळवाट असते. आपल्या चुकीसाठी वा कमतरतेसाठी आपण त्या दयाधनाला दोष देतो. नियतीने आपल्या वाटेला जे वाढले ते स्वीकारण्याचे मनोधैर्य आपण आपल्याठायी रुजविले पाहिजे. तो आपल्या संस्काराचा भाग बनला पाहिजे. तसेच, अपयश हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अपयश म्हणजे आपला मार्ग चुकल्याचे दर्शक असते. त्यावेळी मार्ग दलण्याचा सूज्ञपणा आपण दाखवला पाहिजे. कारण, खाचखळगे आणि चढउतार प्रत्येकाच्या जीवनात येतात व जो तो आपआपल्या केमिस्ट्रीनुसार ते हाताळत असतो. त्यात, मी तर मुळात रसायनाचा विद्यार्थी. अणू-परमाणू, मूलद्रव्ये, संयुगे, रसायनिक क्रिया यांच्या जंजाळात गुरफटत करियर करत होतो.

तशी, बालपणापासून लष्करात सैनिक होण्याचे स्वप्न उरी बाळगून होतो. अंगावर थरार आणणारे शिवाजी महाराजांचे पोवाडे आणि भारत-चीन युद्धातील शूरवीरांच्या कथा त्यामागची प्रेरणा होती. छातीचा कोट करून देशाच्या सीमेवर लढण्याचे खुपसे मनसुबे रचले होते. पण, यकिंचित देहयष्टीमुळे ते काही शक्य झाले नाही. इंटरसायन्स परीक्षा पार पडली तेव्हा एक आशेचा अंधुक किरण दिसला व तो म्हणजे लष्करात मेडिकल ऑफिसर व्हायचे नि देशाची सेवा करायची. ८ मे १९७३ हा दिवस होता आणि पुण्याला प्रवेशपरीक्षा देण्यासाठी मी दादर स्टेशनला पोहचलो होतो. तेव्हा समजले की जॉर्ज
फर्नांडीस या कामगार नेत्याने रेल्वेचा देशव्यापी संप पुकारला आहे. रेल्वेचा चक्का जाम झाला होता व माझे उरले सुरले स्वप्न डी-रेल झाले होते.

मुंबई युनिव्हर्सिटीत पदव्युत्तर शिक्षण (इंस्टीट्यूट ऑफ सायन्स, मुंबई) घेत असताना, दादरनजीक माटुंगास्थित ‘कॉटन टेक्नॉलॉजी रिसर्च लॅबोरेटरी (CTRL) या संशोधनसंस्थेत प्रथम करियरची संधी मिळाली. शिक्षण घेत असताना स्वतःच्या पायावर उभे राहावे व घरच्यांवर भार पडू नये म्हणून वसईतल्या गास गावानजीकच्या सोपारा येथे ट्यूशन क्लासेस चालवीत होतो. त्याच वेळी, सी.टी.आर.एल. मध्ये नोकरी मिळाली. तेव्हा, एम. एस्सी. चा अभ्यास, एस.एस.सी. नि ज्युनियर कॉलेजचे क्लासेस आणि नोकरी असा तिहेरी भार पडला होता. रात्री बारा ते सकाळी पाच एवढुशी रात्र झोपण्यासाठी वाटेला यायची. पण, जीवनात काहीतरी वेगळे करायची जिद्द मनात प्रबळ झाली होती व त्या प्रेरणेने कार्यमग्नता सावलीसारखी सोबत करत होती. .सी.टी.आर.एल. (आता, त्या संस्थेचे नाव CIRCOT म्हणजेच सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ रिसर्च ऑन कॉटन असे आहे.) मध्ये तर, कौटुंबिक वात्सल्याच वातावरण होते. वडीलधारी वैज्ञानिक मंडळीत माझ्यासारख्या तेव्हाच्या पोरगेल्या उमेदवाराचे खूप लाड झाले होते. डॉ. इंदिरा भट, सिताराम शृंगारपुरे ( त्यांना आम्ही पुरे नावाने पुकारत असू), वत्सला अय्यर आणि समवयस्क नयना अशा त्या ग्रुपमध्ये काम करताना जाम मजा यायची. मी. एम.एस्सी. पूर्ण करण्यासाठी त्या साऱ्या ज्येष्ठांनी मला प्रोत्साहन दिले व मीही त्या संधीचा फायदा उठवत नोकरी करत असतानाच बायोकेमिस्ट्री विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. देशातल्या वस्त्रोद्योगाची या ठिकाणी मला मूलभूत ओळख झाली. वस्त्राचे रसायन, भौतिक व गणित इथे समजून आले. कापड झळझळीत व्हावे म्हणून करावी लागणारी मर्सीरायजेशन प्रक्रिया, तंतूची ताकद वाढविण्यासाठीची गॅमा-प्रारण प्रक्रिया, वस्त्रांची अग्निरोधकता इ. नावीन्यपूर्ण प्रकल्पावर काम करायला मिळाले. तिथे तीन वर्षे संशोधन सहाय्यक म्हणून काम केल्यानंतर, ‘बेटर प्रोस्पेक्ट्स’साठी नोकरी बदलली.

घाटकोपरच्या बॉम्बे टेक्सटाइल रिसर्च असोसिएशन (BTRA) मधला गजबजलेला पायलट प्लांट संशोधनकार्याला प्रेरणा देणारा ठरला. १९८०-८३ चा तो काळ कसोटीचा ठरला। ‘बिट्रा’मध्ये संशोधन करत होतो अन नेमका त्याचवेळी तेव्हाचे कामगारनेते दत्ता सामंतप्रणीत संघटनेतर्फे मुंबईतील सूतगिरण्यातील कामगारांचा बेमुदत संप सुरू झाला. कपड्याचे फोम, प्रिंटिंग, अग्निरोधन प्रक्रिया, तागासारख्या नैसर्गिक तंतूची जलशोषकता; यासारख्या विविध प्रकल्पात गढलो असताना खाडकन जाग आली. संस्थेच्या कणा असलेल्या सूतगिरण्या धडाधड बंद पडू लागल्या. संशोधनासाठी लागणारी रसायने, उपकरणे इ. च्या रतीब अचानक थांबला. संशोधन कामाला अडसर आला. काम पुरते मंदावले. ऐन कारकिर्दीत, मनात नैराश्य घोंगावू लागले. नुकतंच लग्न झाले होते. संसाराची जबाबदारी शिरावर येऊन पडली होती. तेव्हाच्या त्या अस्वस्थ मनस्थितीत बिट्राच्या भल्यामोठ्या तंत्र-विज्ञान लायब्ररीने साद घातली. तिथले एकेक ग्रंथ वाचून काढण्याचा सपाटा लावला. तिथेच, मग विज्ञानलिखाण करण्याचे बीज मनात रुजले. पुण्यातून प्रकाशित होणाऱ्या ‘विज्ञानयुग’ मासिकाचे संपादक गजाभाऊ क्षीरसागर यांनी पाठविलेले एक पोस्टकार्ड निमित्त ठरले नि दोन रु. च्या मानधनावर विज्ञानयुगमध्ये पहिला लेख (‘प्रकाश संश्लेषणाची किमया’) प्रकाशित झाला. गजाभाऊची पाठीवरली कौतुकाची थाप अस्वस्थतेची खुमखुमी ठरली. त्यातूनच मग, तंतुपासून कापडापर्यन्त निर्मिती होणाऱ्या वस्त्राचा इतिहास ‘वस्त्रायन’ या नावाने मालिकेच्या रूपात त्यांच्या दिवाळी अंकात (१९८१) प्रकाशित झाला. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळाने तो इतिहास पुण्याच्या प्रपंच प्रकाशनातर्फे ग्रंथरूपाने १९८४ साली प्रसिद्ध केला. माझ्या विज्ञान लिखाणाचा तो श्रीगणेशा ठरला. आज अस्मादिकांच्या खात्यावर छोटी-मोठी अशी इंग्रजी-मराठीतून राज्यभरातील विविध प्रकाशन संस्थांकडून प्रसिद्ध झालेली पन्नासेक निव्वळ विज्ञानपुस्तके (विज्ञान कथा, विज्ञानग्रंथ, ललित विज्ञान, लेखसंग्रह इ.) जमा आहेत. माझ्यावर सिद्धहस्त विज्ञान लेखक असा शिक्का बसला आहे. कालांतराने, विज्ञान प्रचार नि प्रसार जीवनातले मिशन बनून गेले.

‘बिट्रा’त नोकरी करत असताना पीएच.डी. करण्याची योजना मनीमानसी होती, पण परिस्थिती अनुकूल नव्हती. कारकीर्द डळमळीत झाली होती. पुढ्यात पेच होता. त्याचवेळी दोन संधी चालून आल्या. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या तेव्हाच्या ‘सायन्स टूडे’ मासिक आणि दुसरी, भारत पेट्रोलियम या तेलकंपनीत लिखाणाची खुमखुमी वाढली होती व मला मनापासून ‘सायन्स टूडे’ खुणावत होते. त्यावेळी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये रुजू असलेले वसईचे ज्येष्ठ पत्रकार जोसेफ नरोन्हा यांचा सल्ला घेतला. ‘सायन्स टूडे’त बांधिलकी पाळावी लागेल. त्यापेक्षा बी. पी. सी. एल. मध्ये नोकरी करून फ्री लान्सिंग करता येईल, हा मोलाचा सल्ला त्यांच्याकडून मिळाला.

ज्या क्षेत्रात आपण करियर करायचे तिथले ‘प्रॉडक्ट नॉलेज’ परिपूर्ण असले पाहिजे ही धारणा एव्हाना मनात दृढ झाली होती. लगोलग, तेव्हा मुंबईस्थित असलेल्या ‘ब्रिटिश इंस्टिस्ट्यूट’ यासंस्थेत पेट्रोलियम टेक्नॉलॉजी या विषयाचा डिप्लोमा करायला घेतला आणि वर्षभरात (१९८६) पूर्ण केला. सुमारे ७५०० जीवनोपयोगी पदार्थाच्या निर्मितीचा स्त्रोत असलेल्या काळ्या खनिज तेलाची माहिती विस्मयकारक होती, कारण तेव्हा शाळा-कॉलेजात हा विषय शिकविला जात नव्हता.

भारत पेट्रोलियम ही देशभर पसरलेली महाकाय कॉपोरेट कंपनी १९८४ च्या डिसेंबरला, मी मुंबईतल्या गुणवत्ता आश्वासन प्रयोगशाळेत मी रुजू झालो. मुंबईतल्या प्रॉडक्शन प्लान्टमध्ये वर्षभर काम केल्यानंतर माझी रवानगी थेट दिल्लीला झाली. त्यावेळी, कंपनीचे ध्येय-उदिष्ट होते. people above oil. मी पडलो टेक्निकल माणूस. मला प्रारंभी ते घोषवाक्य कळलेच नाही. माणसाची घनता तेलापेक्षा जास्त, मग तो तेलावर (तरंगणार) कसा? या प्रश्नाने बराच वेळ तेव्हा खाल्ला. नंतर, एका सीनियरकडून समजावून घेतले, ते असे: तेव्हा हा व्यवसायाचा भाग आहे, पण ग्राहक असलेला माणूस (समाज) त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. व्वा! क्या बात है! ते माझ्या कंपनीच्या सामाजिक बांधिलकेचे द्योतक होते. पुढे, energizing people at work place/be-yond work place हे कंपनीचे धोरण बनले. त्या जनस्फूर्तीप्रणाली अंतर्गत माझ्या विज्ञानप्रसाराच्या कार्यासाठी दोनदा (२००८/ २०१०) पुरस्कार देऊन कंपनीने राष्ट्रीय पातळीवर माझा सन्मान केला होता. Earning while learning या माझ्या घोषवाक्याने देखील स्पर्धेत बक्षीस मिळवले होते. ही कंपनी माझ्या होतकरू तरूणासाठी एक learning organization ठरली होती. कंपनीच्या हाऊस जर्नलमधून माझ्या लिखाण नि समाजकार्याची यथोचित नोंद व्हायची. एकदा तर त्यांनी माझा A scientist by day and a writer by night असा गौरवदेखील केला होता. या सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेतून स्फूर्ती घेऊन इंधनातील प्रदूषक घटकावर आळा घालता यावा म्हणून त्यांच्या तपासणीसाठी महागड्या उपकरणाची योजना केली होती. कंपनीच्या कामानिमित्त देशभर भटकंती व्हायची नि त्याद्वारे अनुभव, ज्ञान, शहाणपण यात भर पडत होती. राष्ट्रीय पातळीवर सभा-परिषदाना हजेरी लावत होतो. देशातील पेट्रोलियमशी निगडीत प्रमाण-संस्थाच्या कामकाजात भाग घेऊ शकलो होतो. देशातल्या पेट्रोलियम प्रयोगशाळांचा दर्जा-परीक्षक बनलो होतो… तरीही, आपलं ज्ञान हे समुद्रातील थेंबाइतके देखील नाही याची जाणीव अनुभवत होतो:

पण, १९८५ मधील तो मे महिना मी कसा विसरू? कंपनीने माझी तडकाफडकी दिल्लीला बदली केली होती. त्या आणीबाणीच्या घटनेला कारणदेखील तसेच घडले होते. हिंदुस्तान पेट्रोलियम या दुसऱ्या देशव्यापी तेलकंपनीच्या मँगलोर तेल शुद्धीकरण कारखान्यात एक हादसा घडला होता. तिथे घरगुती वाटपासाठी उत्पादित केलेल्या केरोसिन या इंधनात नॅफ्थासारख्या ज्वालाग्राही पदार्थाची भेसळ झाली होती व स्टोव्हमध्ये ते इंधन पम्प करताना २२ जण दगावले होते. त्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी नेमलेल्या जगन्नाथ समितीने देशभरातील तेलडेपोत मिनी-लॅब स्थापन करण्याचा फतवा काढला होता. त्याद्वारे बाजारात जाणाऱ्या घासलेट तेलाची ज्वालाग्राहकतेची तपासणी होऊ शकणार होती. त्यासाठी माझी रवानगी दिल्लीतल्या मुख्यालयात केली गेली होती व तेथून उत्तर विभागातील डेपोत छोट्या प्रयोगशाळा उभारण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती… पण, मी वसई-मुंबईबाहेर कधी गेलो नव्हतो. शाळेत सातवीत पुण्याला शाळेच्या पिकनिकसोबत गेलो होतो, तेवढाच. कंपनीने भल्यापहाटे मुंबईमार्गे पॅरिसला जाणाऱ्या महाकाय जंबो विमानाचे तिकीट हाती देऊन ‘ताबडतोब नीघ’ म्हटले होते. घरी सगळे नाराज झाले होते. माझ्या छकुल्याचा पहिला वाढदिवस दोन-तीन दिवसावर येऊन ठेपला होता. जिवाची भावनिक घालमेल झाली होती… प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर चाचपडावे लागले होते. भर समुद्रात गटांगळ्या खाणाऱ्या हतबल माणसासारखी माझी अवस्था झाली होती. पण, मनाचा हिय्या केला. जीवनात काहीतरी वेगळे करायचे आहे, हे आधीच ठरले होते… मग, तेही दिवस निघून गेले… पाच वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा मुंबईला परतलो होतो. बी.पी.सी.एल.च्या संशोधन आणि विकास, तसेच गुणवत्ता प्रबंधन विभागात काम करत असताना, विविध इंधनांची पारख करायला शिकलो, भिन्न प्रकारची वंगणे विकसित करण्याचे ज्ञान प्राप्त केले, पाच वर्षापूर्वी निवृत्त झालो तेव्हा कंपनीच्या पश्चिम विभागाचा . गुणवत्ता आश्वासन-प्रबंधक होतो.

आज आमंत्रणावरून मी समाजाच्या विविध व्यासपीठावरून नि शाळा-कॉलेजात पेट्रोलियम पदार्थ, पर्यावरण, बदलते हवामान, ऊर्जाबाबत, शिक्षण इ. विषयावर व्याख्याने देत असतो. अनुभव आणि ज्ञान यांची देवघेव व्हावी हा हेतू असतो. विशेष म्हणजे, कुतुहलपूर्ण जिज्ञासू पोरं पुढ्यात बसून टक लावून ऐकतात तेव्हा मन आनंद व समाधानाने भरून येते. कारण लहान मुलांच्या मनाची पाटी कोरी असते व त्यावर गिरवलेली अक्षरे त्यांच्यासाठी संस्कार ठरतात.

-जोसेफ तुस्कानो
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..