राष्ट्रीय आणि इंग्रजी ही दोन्ही कॅलेंडर सूर्यावर आधारित आहेत. त्यामुळे त्यात १२ महिने आणि ३६५ दिवस आहेत. प्रत्येक दिवस हा तारखेने दर्शविला जातो आणि तारीख मध्यरात्री बदलते. ऋतूंशी मेळ रहावा म्हणून यामध्ये ४ वर्षातून १ दिवस जास्त घ्यावा लागतो. त्यामुळे या शृंखलेतील चौथे वर्ष हे ३६६ दिवसांचे असते.
या कारणामुळे इंग्रजी कॅलेंडर सुटसुटीत आहे. वरील सर्व गोष्टी राष्ट्रीय कॅलेंडरलाही लागू असल्यामुळे राष्ट्रीय कॅलेंडर ही वापरण्यास सोपे आणि सुटसुटीत आहे. राष्ट्रीय कॅलेंडरचा वेगळेपणा आता पाहू.
१) राष्ट्रीय कॅलेंडरमधील महिन्यांची नावे चैत्र, वैशाख अशी पंचांगातील महिन्यांचीच नावे आहेत. राष्ट्रीय कॅलेंडर मध्ये ‘मार्गशीर्ष’ असे नाव नसून कार्तिक आणि पौष यामध्ये येणाऱ्या महिन्याला ‘अग्रहायण’ म्हणतात. यावरुन एक गोष्ट लक्षात येईल की, राष्ट्रीय महिन्यांची नावे व्यक्तिनिष्ठ नाहीत. ती आकाशातील नक्षत्रांची निगडित आहे.
२) राष्ट्रीय कॅलेंडरचे वर्ष हे शालिवाहन शकाप्रमाणे धरले जाते. चैत्र महिना हा राष्ट्रीय कॅलेंडर चा पहिला महिना असतो.
३) इंग्रजी कॅलेंडरच्या सरावामुळे तुम्हाला प्रश्न पडला असेल की, राष्ट्रीय वर्ष असे २२ मार्चला मधेच कसे सुरु होते. खरं तर २२ मार्चला वर्ष सुरु करण्याचा हेतू वेगळा आहे. २२ मार्चला दिवस आणि रात्र समान कालावधीचे असतात. सूर्य-बरोबर पूर्व दिशेला उगवतो आणि बरोबर पश्चिमेला मावळतो. सूर्याची ही विशिष्ट स्थिती लक्षात घेऊनच हा वर्षारंभ धरला आहे.
४) राष्ट्रीय सौर महिन्यांची सुरुवातही अशीच सूर्याच्या विशिष्ट स्थानांची निगडित आहे. यामुळे, खरंतर राष्ट्रीय कॅलेंडर हेच खरे शास्त्रीय कॅलेंडर आहे.
२२ जून हा दिवस सर्वात मोठा दिवस असतो. त्या दिवशी दक्षिणायन सुरू होते. हा दिवस म्हणजे राष्ट्रीय कॅलेंडरच्या आषाढ महिन्याची सुरुवात, सौर १ आषाढ.
२२ मार्च सारखी परिस्थिती २३ सप्टेंबरलाही असल्यामुळे २३ सप्टेंबर या दिवशी सौर अश्विन महिना सुरू होतो. २२ डिसेंबर या दिवशी उत्तरायण सुरु होत असल्यामुळे ( ह्या घटना सर्व जगासाठी आहेत ) राष्ट्रीय सौर कॅलेंडर त्या दिवसांपासून पौष महिना सुरु करते.
म्हणजे सौर महिन्यांची सुरुवात सूर्याच्या या विशिष्ट स्थितीशी निगडीत केल्यामुळे राष्ट्रीय कॅलेंडरचा वैज्ञानिक दृष्टीकोन सिध्द होतो. इंग्रजी महिन्यांची सुरुवात या घटनांशी संबंध प्रस्थापित करत नसल्यामुळे या घटनांच्या तारखा इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे मध्येच येतात.
५) सूर्याचा उत्तर गोलार्धातील प्रवास ( २२ मार्च ते २३ सप्टेंबर ) हा थोड्या मंदगतीने होतो. त्यामुळे सूर्याचा राशीतील मुक्काम वाढतो. राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये ही बाब लक्षात घेऊन महिन्यांचे दिवस ठरविले आहेत. म्हणून सूर्याच्या उत्तरगोलार्धातील प्रवास काळात होणारे वैशाख ते भाद्रपद हे सलग ५ महिने प्रत्येकी ३१ दिवसांचे घेतले आहेत. इंग्रजी कॅलेंडरमधील एक आड एक महिने ३१ दिवसांचे घेण्यात असा शास्त्रीय विचार नाही. बेरीज ३६५ येण्याशी मतलब एवढाच अर्थ.
६) इंग्रजी म्हणजे ग्रेगरियन कॅलेंडरचा सर्व दूर असलेला वापर लक्षात घेऊन कॅलेंडर कमिटीने लीप वर्ष आणि लीप दिवस घेण्याचाही शास्त्रीयपणा ठेवून समन्वय साधला आहे. जे इंग्रजी वर्ष लीप घेतले जाते, त्याच वर्षी मार्चमध्ये सुरू होणारे राष्ट्रीय वर्ष लीप घ्यावे, असे ठरविले. या व्यवस्थेत राष्ट्रीय लीप वर्षाचा चैत्र महिना २२ तारखेला होता २१ मार्चला सुरू होतो त्या वर्षी चैत्र महिन्याचे ३१ दिवस येतात. यामुळे वर्ष कोणतेही असले (लीप असो किंवा नसो) तरी २१ एप्रिल ते २८ फेब्रुवारी या कालावधीतील इंग्रजी तारखांचा राष्ट्रीय सौर तारखेशी असलेला मेळ अबाधित राहतो. उदा. १५ ऑगस्ट म्हणजे सौर २४ श्रावण, २६ जानेवारी म्हणजे सौर ३ माघ ही सांगड कधीच सुटणार नाही.
— हेमंत मोने
Leave a Reply