नवीन लेखन...

राष्ट्रीय कीर्तन केसरी गोविंदस्वामी आफळे

राष्ट्रीय कीर्तन केसरी गोविंदस्वामी आफळे यांचा जन्म ११ फेब्रुवारी १९१७ रोजी झाला.

गोविंदस्वामी आफळे हे नाव कानी येताच एक आगळा वेगळा विलक्षण माणूस नजरेसमोर येतो. व्यायामाने कमावलेले धिप्पाड शरीर, उंच-निंच आकृती, काळा-सावळा रंग, राकट उग्र पण तरीही रेखीव रुबाबदार चेहरा, शुभ्र धोतर सदरा, काळा कोट आणि काळी टोपी, कीर्तनाचे वेळी भगव्या रंगाचा ऐटबाज फेटा, शाल या साऱ्या व्यक्तिमत्त्वाला शोभेसा पहाडी खडा आवाज !

सर्वसामान्य माणसापेक्षा अनेक बाबतीत ते निराळे होते. पारंपारिक पठडीतून बाहेर पडून राष्ट्रवीरांच्या, क्रांतिकारकांच्या कथा आणि शुद्ध हिंदुत्वनिष्ठ, विज्ञानवादी दृष्टीकोन ठेऊन, आजच्या ताज्या राजकारणाशी त्याचा योग्य सांधा जोडून ते प्रखरपणे दाखवणारे, अंधश्रद्धेवर कडक टीका करणारे आणि ज्यांच्या कीर्तनाला तरुण-बाल- वृद्धांची अलोट गर्दी खेचणारे असे त्यांच्या काळातले ते एकमेव कीर्तनकार होते असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. सिनेमा, रेडीओ, टी.व्ही. अश्या विविध माध्यमांमुळे कीर्तन हा प्रकार थोडा मागे पडू लागला होता. त्यात आफळे बुवांनी नवचैतन्य निर्माण केले. क्षणात हास्याचा खळखळाट तर क्षणात वीरश्री, गहिवर दाटेल असा करूण रस तर मिश्कील कोट्या अशाप्रकारे नवरसांचा उत्कट अविष्कार त्यांच्या कीर्तनातून होत असे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांनी सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींच्या समाधीवर मंदिर बांधले. त्यात कीर्तनसेवा करण्यासाठी “आफळे” घराण्याला अंगापूर, जैतापूर, भोस, सांगवी, वडगाव, महागाव, माहुली, सोनगाव ह्या ८ गावांची जहांगीर दिली. फळ मिळेपर्यंत सतत प्रयत्न करणारे ते “आफळे” अशी आपल्या आडनावाची उत्पत्ती बुवा सांगत असत. सातारा जिल्ह्यातील क्षेत्र माहुली या कृष्णा काठच्या छोट्या गावात रहाणाऱ्या चिमुताई कडक स्वभावाच्या होत्या. ओळीने सात मुली झाल्या. मुलगा नाही म्हणून त्यांनी समर्थांच्या समाधीवर नवस केला – “मुलगा झाला नाही तर मी जहांगीर परत करीन,भिक्षा मागून नाही तर मी कष्ट करून निर्वाह करेन पण जावई सेवेला पाठवणार नाही. आपली सेवा आजपर्यंत घडली तशी पुढे घडावी अशी आपली इच्छा असेल तर मला मुलगा झाला पाहिजे.” अशा दृढनिश्चयी मातोश्रींच्या नवसाचं फळ म्हणजे गोविंद स्वामी! रामदासस्वामींच्या स्मृतीसाठी नावात “स्वामी” आहे. त्यानंतर बालवयातच तल्लख बुद्धीचं वरदान लाभलं, नकला, पोवाडे करणे, गाणी म्हणणे, कैऱ्या पाडणे, नदीत (मुद्दाम पूर आला असतानाही) पोहणे हे छंद तर आडदांडपणा आणि चक्क माऱ्यामाऱ्या! यामुळे घरी आईकडे वारंवारी तक्रारीही येत. नवसाचा मुलगा लाडामुळे बिघडू नये म्हणून चिमुताई फार दक्ष असत.

शिक्षणासाठी घर सोडून प्रथम हायस्कूलसाठी सातारा, नंतर मॅट्रीकसाठी पुणे येथे गोविंदस्वामी आफळे आले. पितृछत्र हरपलं होतं. धाकटी भावंडे होती. घरून मदत होण्यासारखी नव्हती तरी शिक्षणाच्या अदम्य इच्छेमुळे पडेल ते काम करून (झाड-लोट करणे, स्वयंपाक करणे, लोखंडी पत्रे कापणे, धुणी-भांडी, हमाली, मुले सांभाळणे, मंगळागौर जागवणे, चैत्रगौर मांडणे, टांगा हाकणे, म्हशी राखणे, इत्यादी), माधुकरी मागून, वार लावून, शिक्षण घेतले. त्याचवेळी कुस्तीही शिकले. पोवाडे, नाटक, मेळे यात काम करणे, उतबत्त्या विकणे कितीतरी छोटी-मोठी कामे केली. आणि १९४५ला बी.ए. ऑनर्स झाले. पुण्यात हिंदुमहासभेने “केसरी” मधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर पोवाडे स्पर्धा घेतल्या. महाराष्ट्रातून शेकडो पोवाडे आले, त्यात गोविंदस्वामींच्या पोवाड्याचा प्रथम क्रमांक आला. नंतर दादरला सावरकरांच्या घरी त्यांचे समोर त्यांचा पोवाडा विजयादशमीच्या दिवशी ऐकवावा हे भाग्य त्यांना लाभले. तसेच केसरीच्या कचेरीत सेनापती बापट यांच्या उपस्थितीत सुभाषबाबुंवरील पोवाडा सुभाषबाबुंसमोर सादर केला. साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी प्रस्तावना लिहून तो प्रसिद्धही केली. गावोगाव त्यांचे कार्यक्रम गाजले आणि “शाहीर आफळे” या नावाने महाराष्ट्र त्यांना ओळखू लागला. त्यांनी ११ चित्रपटांतून कामे केली, अनेक नाटकांतून काम केले. प्रभात चित्रपट संस्थेत “शेजारी” चित्रपटात ‘नईम’ची भूमिका त्यांना मिळाली होती पण आईने त्यांना त्या क्षेत्रातून बाहेर खेचले. हातात चिपळी दिली आणि “नभी जैसी तारांगणे तैसे लोक तुझ्या कीर्तनाला येतील” ह्या आशीर्वादासह कीर्तन करण्याची आज्ञा दिली. मातोश्रींचा आशीर्वाद फळला. पहिले राष्ट्रीय कीर्तनकार दत्तोपंत पटवर्धन हे त्यांचे गुरु. श्री गोविंद बुवा देव यांचेकडे कीर्तन प्राथमिक शिक्षण-झांजा धरली. पुण्यात हरिकीर्तनोत्तेज सभेने आयोजिलेल्या “हिंसा-अहिंसा विवेक” या विषयावरील कीर्तन स्पर्धेत आफळे बुवांचा प्रथम क्रमांक आला. त्या संस्थेत ते पुढे बिनीचे कार्यकर्ते झाले. त्यांनी परिश्रमाने संस्था वाढविली.

बुवांच्या कीर्तनाला हजारोंनी गर्दी होई, रस्ते बंद होत. भावगीतांच्या काही रेकॉर्डसही त्यांच्या आवाजात निघाल्या. “सागरा प्राण तळमळला” हे सावरकर रचित गीत सर्वप्रथम HMV ने १९४८-४९ साली त्यांच्याच आवाजात ध्वनिमुद्रित केलेले आहे. विविध मासिकात, दैनिकात त्यांचे वेगवेगळ्या विषयांवर लेख प्रसिद्ध होत. १५ नाटके, २ कवितासंग्रह, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनकार्यावर आधारित “सावरकर गाथा” हे महाकाव्य त्यांनी रचले. त्याचे काव्यगायनाचे १०० प्रयोगही त्यांनी केले. संपूर्ण महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेरची असंख्य गावं इतकच नव्हे तर अमेरिकेतही ते ३ महिने राहून कीर्तने गाजवून आले.

गोविंदस्वामी आफळे यांचे १ नोव्हेंबर १९८८ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..