शास्त्रीय गायन व वादन पुर्वापार चालत आलेल्या कला विशेषतः भारतात घराण्यांवरून ओळखल्या जाणार्या शैली आहेत. त्यात रागधारी हा शास्त्रीय गायन वादनाचा गाभा आहे. चांगलं गाणं किंवा गीताचा कुठलाही प्रकार उदा. भाव भक्ती व नाटयगीत तसेच कविता जुनीगाणी पोवाडा व लावणी यांच्या शब्दरचना गोड व मधुर सुर ताल
व लयीत ऐकायला मिळाल्या तर मनावरील ताण आटोक्यात आणण्यासाठीचे औषध आहे.
भारतातील काही जाणकारांचे मत आहे की सतारीवर काही विशिष्ट राग ऐकले तर बर्याच व्याधींवर काही प्रमाणात उपचार करता येतो. पाश्च्यात वैज्ञानिकांचे मत आहे की दुभत्या जनावरांचे दुध काढताना त्यांना संगीत ऐकवले तर ते दुध जास्त देतात. तसेच काही वनस्पतीना संगीत ऐकवील्याने त्यांच्या फुलं व फळांच्या वाढीवर चांगला परिणाम झाल्याचे निदर्शनास आले. चांगले गायन व वादन ऐकावे किंवा शिकण्याचा प्रयत्न करावा ज्याने मन चांगल्या गोष्टीत गुंतून राहाते सबब मन व बुद्धीला तजेला व टवटवीतपणा आल्याने मन हलके होते व ताण कमी होण्यास मदत होते. काही जणांचे मानसीक संतुलन बिघडल्याने त्यांच्या वागण्यात विक्षिप्तपणा येतो किंवा व्यसनाधीन होतात त्यांनी वरील गोष्टींचा नक्कीच विचार करावा.
आजच्या घडीला बर्याच चॅनल्सवर गाण्याच्या स्पर्धा सुरू आहेत. त्यात अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण त्यात हिरीरीने भाग घेताना दिसतात. यात खरोखरच काही गैर नाही उलट हिन्दुस्थानी शास्त्रीय व सुगम संगीत गायन कलेचा वारसा सर्व स्थरावर चांगल्या रीतीने जपला जात आहे हीच गायन कलेबद्दलच्या आवडीची पोच पावती आहे. मुद्दा असा आहे की स्पर्धकाच गाण झालं की परीक्षक त्यांची मतं मांडतात. उदा. “गाताना शडज्य कमी लागला” “वरचा गंधार नीट लागला नाही” “समेवर येताना आवाज कंप पावत होता” “मिंड मुक्यार् पलटे व रेला” या सारखे शब्द ऐकले की जरा डोक्यावरून जातात. याने एकंदरच गायन कलेबद्दल श्रोत्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो मग ते गायन शास्त्रीय किंवा सुगम असो. मला सांगा ज्याला गाण्याचा ओ का ठो माहीत नाही त्यांना त्यात काय मजा येणार? मला गाणं आवडलं बस्स. मला त्यातल्या तांत्रिक गोष्टी समजत नाहीत. अनेक प्रकारच्या गायन व वादनाची सर्वसामान्य श्रोता व कानसेनांत गोडी उत्पन्न व्हावी आणि गायनाचा निखळ आनंद व आस्वाद घेता यावा हीच प्रेमळ इच्छा आहे. त्याचा प्रचार व प्रसार सर्व दुर व्हावा हीच सदिच्छा. शास्त्रीयगायन व वादन हे गणित विषयासारखे आहे. विषय नीट कळला नाहीत तर तो रटाळ कंटाळवाणा व कठीण वाटतो.
यासाठी सर्व रसिक प्रेक्षकांच्यावतीने गायन वादनाचे स्पर्धात्मक कार्यक्रम करणार्या आपल्या सारख्या सर्व जेष्ठ व श्रेष्ठ निर्मात्यांना विनंती करावीशी वाटते की त्यांनी शास्त्रीय किंवा सुगम संगीताचा असा कार्यक्रम सादर करावा की ज्यात एकुणच गायन व संगीतकलेचा वारसा व त्याचा इतिहास तपशीलासहीत प्रेक्षकांना समजेल. कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात वेगवेगळया घराण्यांच्या बुजुर्ग कलकारांना त्यांच्या गायकीचे प्रात्यक्षिकासहीत वैशिष्ट्य थोडक्यात वर्णन करण्यास सांगावे. तोच राग भाव-भक्ति-नाट्य व सुगंमसंगीतात कसा उपयोगात आणता येतो हेही नीट कळेल. गीत किंवा कवितेची चाल लावताना किंवा संगीत देताना रागाचा व संगिताचा कसा चपकल व योग्या वापर करता येतो हे समजेल. मुख्य म्हणजे गीत व कवीतेचे सौंदर्य व माधुर्य वाढवीण्यास कशी मदत होते हे कळून येईल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रोत्यांचे गायन व वादन कलेबद्दलचे अज्ञान तर दुर होईलच पण रटाळ व कंटाळवाणा वाटणारा शास्त्रीय रागदारीच्या गायन आणि वादनाचा कार्यक्रम प्रेक्षक आवडीने बघतील. रसिक श्रोते व प्रेक्षकांना गायन वादन कलेची नीट ओळख झाल्याने व थोडेबहुत साक्षर झाल्याने आपल्या हातून कळत नकळत समाज सेवेचं बहुमुल्य कार्य आपोआप होणार आहे. मुख्य म्हणजे शास्त्रीय उपशास्त्रीय व सुगम गायन क्षेत्रात आणि संगीत दिगदर्शनामध्ये करीअर करणार्या बर्याच उदयनोमुख कलाकारांना त्यांच्या भावी आयुष्याच्या वाटचालीत मदत केल्याचे निर्माते व आयोजकांना समाधानही मिळणार आहे.
जगदीश पटवर्धनवझिरा बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply