लेखक – माधव भोकरीकर, औरंगाबाद
दहा-बारा दिवसांपूर्वी माझा डावा हात, दुखायला लागला जबरदस्त ! तसा अजूनही, दुखतोय पण कमी ! मग सरळ मोठ्या नेहमीच्या डाॅक्टरकडे गेलो.
माझा ‘डावा हात’ दुखतोय, म्हटल्याबरोबर, त्यांनी माझी पहिले रवानगी केली ती ‘ईसीजी’साठी ! वास्तविक माझ्या मनांत माझ्या बालपणीच्या मित्राचे (डाॅक्टर असलेल्या), आमच्या ‘हार्टबद्दलचे मत’ आलं, ‘तुमच्या समस्या ऐकून समोरच्याला ‘हार्ट अटॅक’ येईल, तुम्हाला काहीही होणार नाही.’ वास्तविक या अशा ह्रदयशून्य’ माणसांचे ‘ईसीजी’ कशाला विनाकारण काढतात ? तसेच झाले. बायकोने पैसे भरले. अन् ‘ईसीजी’ अगदी सुतासारखा सरळ आला.
हे पुन्हा, मानेचा फोटो ! मनांत म्हटलं ‘अरे पैसे जाताय ! हात दुखतोय, अन् मानेचा फोटो ? आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी !’ पण मोठ्यानं बोललो नाही. बायकोने ऐकले नाही, पैसे भरले. तो पण फोटो काढून आला. त्यांत आपल्या मानेत बऱ्याच हाडांची गुंतवण असते, हे शाळेत शिकलेले फोटोत दिसले, बाकी काही उमजलं नाही.
त्यांना डाॅक्टरांना, म्हटलं ‘मला कशी या डाव्या हाताची ताकद, जरा कमी झाल्यासारखी वाटतेय !’ त्यांनी माझी बोटे दाबून ओढून, जोर देवून, जोर द्यायला लावून, ‘काही नाही, व्यवस्थित आहे, पण ‘शंका आहे, तर एम् आर आय’ करून घ्या’ म्हणून सांगीतले.
करणार काय, शंका विचारायची सवय, ही अशी नडली ! मुकाट याचे पण पैसे भरले, बायकोने ! पैसे जायला लागले, की माझा जीव खालीवर होते, हे तिला माहितीय ! बायकोच्या हातात, खरं पैसे द्यायलाच नको, कारण मग तीच खर्च करते, अन् स्वाभाविकच तिच्या हातचा खर्च जास्त दिसतो. हे खरेखुरे तिला, बोलल्यावर पण ‘मुकाट ऐकून घ्यावं ना ? नाही. खर्च ती करते, अन् वर मलाच बोलणे बसतात, ते जाऊ द्या ! पण पैसे गेले ! तिथं ‘एम् आर आय’ वाल्याने दुसऱ्या दिवशीची ‘अपाॅइंटमेंट’ दिली. दवाखान्यात आलेला माणूस गॅसवर कसा चढवावा, हे पण ट्रेनिंग असते म्हणे त्यांना !
दुसरे दिवशी गेलो दवाखान्यात मुकाट्याने ! नंबर लावला, लागला ! अन् त्याचवेळी त्या तिथल्या पोराने, त्या मशीनच्या आवाजाची मला लय, म्हंजे लयच भिती घातली.
‘अरे, आवाजा बिवाजाला घाबरणारी मानसं, नाय आमी.’ असं त्याला म्हणस्तवंर त्यांनं, मला शर्ट काढायला लावून, मला त्या मशीनमधी घातलं. अगोदर हा प्रकार कधी पाह्यला नव्हता ! कधीकाळी एखाद्या इंजेक्शनपर्यंत आमची मजल !
‘हं ! लक्षात ठेवा. आतमधं मशिनमधे अजिबात, म्हअजिबात हालू नगा. हाल्ले की गेले.’ ही सूचना होती, की धमकी होती, ते मला समजेना ! पण त्याने घातलेल्या या सूचनावजा भितीने, मात्र मी हाल्लो.
‘म्हटलं, हे काही खरं नाही ! आता ‘भीमरूपी’ म्हणा अन् हनुमानाला बोलवा ! अन् तो बी कमी पडतो, की काय, तर त्याच्या जोडीला मुकाट, त्याच्या मालकाला ‘रामाला’ बोलवा ! ‘भीमरूपी’ अन् ‘रामरक्षेनेने’ बोलवा, तेव्हा काहीतरी ढंग लागेल !’ दोन्हीची बी तयारी होतीच !
‘शंका नको’ म्हणून मुकाट पैसे भरून, ‘एम् आर आय’ काय असतं, ते पण ‘गुडू्र्रर्रर्रऽऽ किच्च्याॅंऽऽग, गुडू्र्रर्रर्रऽऽ किच्च्याॅंऽऽग, शु्क्क’ असे आवाज ऐकत ते पण झालं. अर्धा पाऊन तास आवाज ऐकत होतो, पण मग मला लयच सापडली ! त्यांत तबल्यातील लग्ग्या, तोडे, परन आणि चक्करदार दिसू लागल्यावर, ‘भीमरूपी’ व ‘रामरक्षा’ केव्हाच मागे पडले. शेवटी ‘गुर्रर्रऽऽऽ खुटूर्रर्रऽऽ कुच्याॅंऽऽग’ असा आवाज होत मी मशीनच्या बाहेर आलो. आंतमधे ‘एसी’ फुल असल्याने घाम बिम काही फुटला नाही. बाहेर आल्या आल्या पहिला प्रश्न त्या मानसाला केला,
‘हाल्लं की काय व्हतं ?’ यांवर त्यानं काय उत्तर द्यावं ?
‘फिल्लम वाया जाते, अन् वेळ लागतो !’
‘आरं हात तिच्या ! हे केव्हा बोलणार ?’ रिपोर्ट दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मिळणार हे सांगीतले.
दुसऱ्या दिवशी रिपोर्ट घेऊन डाॅक्टरकडे हजर ! पहिले ‘ईसीजी’ पाहिला, ‘काही नाही’ म्हणाले, ते तर मला माहिती होते. ‘मानेचा फोटो’ पाह्यला अन् ‘गाडी चालवणं कमी करा’ सांगीतलं.
‘आॅं ! गाडीच नाही चालवत !’ मी बोल्लो ! ‘फक्त गावाला गेलो, तरी टॅक्सीने जातो. मोटारसायकलवर अजिबात नाही.’ मी !
‘कोणत्या गांवाला ?’ डाॅक्टरांचा प्रश्न !
‘औरंगाबाद जळगांव आणि परत !’ मी बोल्लो बुवा !
‘रोज जाता ?’ डाॅक्टर. ते मला हात जोडतात की काय असे वाटत होते.
‘आठवड्यातून एकदा !’ मी घाबरत बोललो.
‘एकदा जरी गेलं त्या रस्त्यानं, तरी हे असं होईल ! तुम्ही दर आठवड्याला जाताय ? म्हणून झालंय, ते हात दुखणं ! चाळीसगांवमार्गे जळगांव जा ! रस्ता मस्त आहे !’ हे बोलत, ते सर्व ‘एम् आर आय’ पाहिले, आणि ‘काही नाही’ म्हणत गोळ्या लिहून देत रवाना केले.
औरंगाबाद जळगांव रस्ता खराब आहे, हे समजायला मोठ्या हाॅस्पीटलमधे जाऊन पैसे खर्च करून घ्यावे लागतात, ही झालेली प्रगती काय कमी आहे ?
— माधव भोकरीकर
औरंगाबाद
(आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपमधून)
Leave a Reply