नवीन लेखन...

रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे कितपत योग्य ?

|| हरी ॐ ||

प्रत्येकालाच मुंबईत नोकरी व स्वत:ची जागा असावी असे वाटत असते आणि त्यासाठी देशातील बरीच माणसे मुंबईत पोटापाण्यासाठी नोकरी व राहायला आसरा शोधात असतात. त्यात कित्येक जणांना झटपट श्रीमंत व प्रसिद्धी मिळवायची असते. व्यवसाय व नोकरीत इप्सित साध्य करण्यासाठी मग काही क्लुप्त्या व काळेधंदे करण्यास उद्युक्त होतात.

मुंबई आणि उपनगरांतील चाकरमानी नोकरीसाठी तर काही मजूर पोटापाण्यासाठी घरातून सकाळीच लौकर निघून आणि लांबचा प्रवास करून मुंबईत येतात. त्यातील काहीजण बरोबर जेवणासाठी डब्बा घेऊन येतात पण जे डब्बा आणत नाहीत त्यांची सोय रस्त्यावरील अधिकृत/अनधिकृत फेरीवाल्यांकडून होते.

ठाण्यामध्ये मागील आठवडयात अनधिकृत फेरीवाल्याकडून घडलेल्या किळसवाण्या प्रकाराने रत्यावरील उघडे खाद्यपदार्थ खाणे आरोग्यास कितपत चांगले? अनधिकृत फेरीवाल्यांचे काय? असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील काही नागरिक आर्थिक दृष्ट्या हाल अपेष्टांचे जीवन जगत असतात, त्यांना होटेल किंवा खाणावळीतील जेवण/नाष्टा परवडत नाही आणि म्हणून अश्या व्यवसायांना चालना मिळते. राहण्यासाठी घरे नाहीत म्हणून झोपडपट्टी उदयास येते, पिण्यासाठी पाणी नाही म्हणून पाण्याचे पाईप फोडले जातात, पैसा कमी मिळाल्याने चोरीमारी, दरोडे टाकले जातात, भ्रष्टाचार केला जातो. देशातील नागरिकांना मुलभूत सेवा-सुविधा न मिळाल्याने हे घडत असावे? पण हे सर्व कधी थांबणार?

भ्रष्टाचार कळसाला पोहचला आहे एवढे म्हणून भागणार नाही ! तो थांबविण्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार होणे आवश्यक आहे. पैसे देणारा आहे म्हणून घेणार आहे हे देणार्याने लक्ष्यात ठेवले तर भ्रष्टाचार होणार नाही किंवा कमी होईल हे सगळ्यांना माहीत आहे फक्त कृती होताना दिसत नाही.

दक्षिण मुंबईच्या ऑफिस जवळ, फुटपाथ, गल्ल्यांच्या नाक्यावर आणि रेल्वे स्टेशन समोर राजरोस उघडयावर भेळ, पाणीपुरी, पावभाजी व इतर खाण्याचे पदार्थ अनाधिकृत फेरीवाल्यांकडून विकले जातात. स्वस्त व मस्त मिळतात म्हणून मुंबईकर त्यावर अडवा हात मारत व बोटे चाटत खातात. अर्थात ह्यात व्यक्तिगत आवड, मत, विचार असू शकतात. प्रत्यके व्यक्ती स्वतंत्र आहे, व्यक्तिस्वातंत्र आहे, कर्मस्वातंत्र आहे. मुख्य मुद्दा असा की जे खाद्य पदार्थ रत्यावर बनविले/विकले जातात त्याचा दर्जा काय आहे ? ते कोठे, कसे बनतात? माणसांच्या स्वास्थासाठी चांगले आहेत का ? हायजिनिक आहेत का? याची शहानिशा न करता आपण ते खातो तर कधी अनिवार्य असते म्हणून खातो. खाद्यपदार्थ बनविणारे संसर्गजन्य रोगानेग्रस्त असल्यास नागरिकांत संसर्गजन्य रोग पसरण्यास वेळ लागत नाही. मोठमोठ्या हॉटेल्समध्ये टेबल्स, खुर्च्या, रंगरंगोटी, दर्शनीय भाग खूप चांगला सजवलेला असतो पण खाद्यपदार्थ जेथे बनतात ती जागा स्वच्छ असतेच असे नाही. माश्या घोंघावत असतात, पदार्थ टुकार आणि चव नसलेले असतात असा अनुभव आहे. सर्वच हॉटेल्स अशी असतात असे नाही किंवा हा त्याचा निकष किंवा निष्कर्ष नाही. त्यांचेही मुद्पाकखाने/स्वयंपाकगृहे वेळोवेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार न करिता तपासली पाहिजेत. परंतू एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही की रस्त्यावरील खाद्य पदार्थ खाऊन कळत न कळत आपण अनधिकृत फेरीवाल्यांना व व्यवसायाला मदत करत असतो. याला आपण बेकारी, गरिबी हटविण्यासाठी मदत करतो असे म्हणूया का ? असे असेल तर शासन/पालिकेने त्यांना अधिकृत फेरीवाले म्हणून उघड्यावर खाद्यपदार्थ विकण्यास हरकत नाही असे लायसन्स द्यावे म्हणेजे या वादावर पडदा पडेल. उघड्यावरचे खाद्य पदार्थ खाल्ल्याने मग भले नागरिकांचे काय होयचे ते होवो ! अश्याने हा प्रश्न सुटणार नाही.

मुंबईतीलच नव्हे तर देशातील सर्व शहरांचे हेच वास्तव आहे हे विसरून चालणार नाही. रत्यांवर अनधिकृत व्यवसाय करणारे एक तर आर्थिक दृष्ट्या गरीब व जागेच्या किमती न परवड्ल्याने त्यांचा व्यवसाय करू शकत नाहीत. देशातील बऱ्याच गाव-खेड्यांत व्यवसायाभिमुख उत्पन्नाचे साधन नसल्याने सर्व माणसे शहराकडे मुख्यता (मुंबईत) पोटापाण्यासाठी येताना दिसतात. यात गैर काहीच नाही. परंतू माणसाला लागणाऱ्या दैनंदिन गरजा पुऱ्या पडत नसल्याने शासनावर अतिरिक्त ताण पडतो. मागणी आणि पुरवठ्याचे गणित जुळत नाही. मुंबईत जागा घेऊन छोटेमोठे व्यवसाय करणे कठीण आहे. त्यात हप्तेबाजीला तोंड द्यावे लागते. हे एक न संपणारे दुष्टचक्र आहे. याचा अर्थ असा नाही की विकाणार्याने काहीही व कसेही विकावे.

सध्या अनधिकृत फेरीवाल्यांचे एकूणच मुंबई व परिसरात दिवसेंदिवस हात पाय पसरणे चालले आहे. मुंबईच्या उपनगरांतील रेल्वेस्टेशन समोर असे कित्येक फेरीवाले रस्ता व फुटपाथवर ठेले मांडून बसतात याचा त्रास पदपथावरून चालणाऱ्या नागरिकांना होऊन ट्राफिक जाम होण्यात होतो हे नजरेआड करून चालणार नाही. त्याला पालिका व आपणही तेवढेच जबाबदार आहोत. अभ्यासातील पुस्तकात लिहिलेले असते की रत्यावरील उघडे पदार्थ खाऊ नयेत. पण ते अभ्यासापुरते, भूक लागली की जे समोर येईल ते स्वाहा: असते. आणि काही घडले की आम्ही शासन/पालिका/विकणाऱ्याला दोष देतो. आपणही याची काळजी घेतली तर नक्कीच ते रस्त्यावर उघडे माश्या घोंघावणारे पदार्थ विकरणार नाहीत आणि आपण खाणार नाही. विकत घेणारा आहे म्हणून विकणारा आहे. हे दुष्ट चक्र थांबणारे नाही. आपणच मनाचा निग्रह केला, सकारात्मक इच्छाशक्ती असेल तर सर्वकाही शक्य आहे. पण ठाण्यात घडलेला प्रकार खूपच किळसवाणा आणि आरोग्याच्या दृष्टीने हीन पातळीचा होता अनधिकृत फेरीवाल्याला चांगलीच शिक्षा होणे गरजेचे आहे यात वाद नाही. शासन/पालिका यांनी एकतर फेरीवाल्यांना रत्यावर व्यवसाय करण्यास बंदी करावी किंवा त्यांना तशी इतरत्र भाडे तत्वावर जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच खाद्यान्न विकणाऱ्यांवर काही नियम/निकष/निष्कर्ष भ्रष्टाचार न होता अमलात आणावेत जेणे करून नागरिकांना स्वच्छ, चांगल्या दर्जाचे, सकस व ताजे खाद्य पदार्थ खाण्यास मिळतील आणि ठाण्यात घडलेली घटनेची पुनरावृत्ती होणार नाही.

जगदीश पटवर्धन
वझिरा, बोरिवली (प)

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..