
रथसप्तमीला संक्रांतीच्या हळदीकुंकूवाच्या कार्यक्रमाची सांगता होते. आज सूर्य रथात बसून जात आहे अशी रांगोळी काढून त्यासमोरील बाजूस गोवरीच्या खांडावर छोट्या मातीच्या सुगड्यात दूध उतू घातले जाते आणि ते पूर्वेकडील बाजूस उतू जाणे शुभ मानले जाते. त्यामुळे आजच्या दिवशीचे औचित्य साधून लेकीने घरसजावटी बरोबरच सूर्य रथाची आरास केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊन असूनही बऱ्याच लोकांना कामावर जावे लागले होते. माझ्या या चिंचवड येथील मुलीला पण जावे लागले होते. घरी सासरे दुर्धर आजाराने त्रस्त होते. आणि जावई लांब अंतरावर असलेल्या एका कंपनीत नोकरी करतात. मुलांची ऑनलाईन शाळा. सासूबाई पण थकलेल्या आहेत. आणि सासरे गेले. म्हणून घरची बाहेरचे सर्व बघावे लागते आणि घरातील सणवार अनेक पंरपंरा आहेत त्या सर्व तिलाच पार पाडाव्या लागतात. आता कुठे भांडी घासायला मावशीबाई येतात. सासुसासऱ्यांचे सगळे नातेवाईक इथेच आसपास राहतात. त्यामुळे प्रत्येक वेळी तिच्या वर अनेक बाबतीत भार पडतो. आणि आता आम्ही जवळ म्हणून आठपंधरा दिवसांनी भेटायला येते येताना आमच्या आवडीचे पदार्थ करुन आणते. खर तर नोकरी वगैरे करणे हा तिचा पिंड नाही. लहानपणापासून माझ्या मागे मागे असायची. हाताखाली काम करायची. म्हणून घरकाम. सणवार. वगैरे याची आवड आहे. तरीही आता ती हे शहरातील जीवन पण उत्तम पद्धतीने हाताळते. भावावर अतिशय जीव आहे तिचा. नोकरी मुळे भावजयीला अनेक प्रसंगी माहेरी जाता आले नव्हते म्हणून आम्ही दोघी मिळून माझ्या सून बाईंचे काही सणवार. मंगळागौरीचे उद्यापन. डोहाळे जेवण अगदी थाटामाटात साजरे केले होते. आज मितीला एकमेकांच्या भाच्यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने भाऊ बहिण भावजय एकत्र येऊन आनंदाने मायेने करतांना पाहून खूप छान वाटते…
मुलगी दोन्ही घरचे नांव राखते म्हणतात अगदी असेच आहे माझ्या या लेकीचे. शिवाय आजुबाजुला कुणी मदतीचा हात मागितला की पहिल्यांदा हीच पुढे. मला केलेल्या मदतीमुळे तिला काही सांगावे लागत नाही. सगळे काही पूर्व नियोजन करुन व्यवस्थित करते आणि खर्चाच्या बाबतीतही तिने माझाच कित्ता गिरवला आहे. वारेमाप खर्च. नाही गरजेचे तेवढेच आणणे. बाहेरच्या खाण्यासाठी पैसा घालवायचा नाही. शक्यतो सगळेच पदार्थ अगदी मसाले मेतकूट. उन्हाळी कामे. सगळेच करते म्हणून तिचे सासरचे नातेवाईक कौतुक करतात हे पाहून मला कृतकृत्य होते. आता हेच बघा ना वाण म्हणून तिने मोठे रुमाल आणले आहेत. विचारले असता म्हणाली की बरेच लोक आहेत जे मास्क वापरत नाहीत कारण परवडत नाहीत म्हणून. त्यामुळे तिने मोठे रुमाल आणले आहेत व त्यातील बरेच रुमाल ती कार्यालयातील व काम करणाऱ्या गरजू बायकांना व पुरुषांना देखिल देणार आहे असे म्हणाली मुलगी असावी तर अशी. तुम्हालाही असेच अनुभव आले आहेत का?
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply