लहानपणी रात्र कशी
अगदी लवकर यायची
थकलेल्या मला कशी
पटकन निजवायची.
कळु लागले तशी
रात्र ही शांत झाली
तिला मला जणु
स्वतःची ओळख मिळाली.
तरूण झालो तेंव्हा
रात्र कशी रोमांचित होई
रातराणीच्या वासानं
ती धुंद होउन गाई.
संसाराच्या धावपळीत
चैन रात्रीची हरपली
काळजीने ग्रस्त रात्र
उशीराने झोपू लागली.
स्वप्नाळु रात्र फार काळ
नाही स्वप्नात रमली
वास्तवाच्या जाणीवेने
दचकून वारंवार उठली.
कोसळण्याऱ्या दूःखानी
रात्र जरी पूरती भिजली
मायेची चादर घेऊन
मला गुरफटून झोपली.
कधी रात्र विनाकारण
माझी चिंता करते
मलाही नाही झोपू देत
आणि स्वतः उगाच जागते.
आजकाल रात्र पूर्वीसारखी
वाटत नाही खुशीत
येत नाही जवळ आणि
घेत नाही मला कुशीत.
माहित आहे मला, रात्र
चिरःकाल टिकणार आहे
केंव्हा तरी कायमच झोपुन
मी तिला मुकणार आहे.
– डॉ.सुभाष कटकदौंड