आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा ज्ञातीतलं एक आडनांव. कुडाळ नजिकच्या पिंगुळीच्या ‘राऊळ महाराजां’मुळे सर्वदूर परिचित आडनांव. गुजरातेत आढणारं ‘रावळ’ किॅवा ‘रावल’ आडनांव म्हणजे राऊळचंच गुजराती व्हर्जन..
‘राऊळ’ या शब्दाचा शब्दकोशातला अर्थ, राऊळ म्हणजे राजवंश किंवा राजवाडा किंवा देवाचं घर म्हणजे देऊळ असा आहे. देव म्हणजे राजाच आणि म्हणून देवाचं घर, देऊळ, तो राजवाडा. याच्या उलटही आपण म्हणू शकतो. कधी काळी असा पराक्रमी. प्रजाहितदक्ष राजा होऊन गेला असेल व त्याला नंतर देवत्व प्राप्त झालं, असंही झालं असेल. सांगायचा मुद्दा हा, की ‘राऊळ’चा अर्थ ‘राजवंश’ किंवा ‘राजाशी संबंधीत’ अशी व्यक्ती. हा सुरवातीस घराणंदर्शक शब्द असावा आणि नंतर तो आडनांव म्हणून स्थीर झाला असावा.
राऊळ याचा अर्थ राजा किंवा राजघराण्यातला, मोठी व्यक्ती असा घेतला, तर मग ‘राऊ’, ‘राव’, ‘राय’, राया’ आदी शब्दही त्याच अर्थाशी संबंधीत असावेत असंही लक्षात येतं. कोकणातील, विशेषत: सिंधुदुर्गातील वैभववाडी तालुक्याच्या परिसरातील मराठा ज्ञातीतील आणखी एक आडनांव ‘राणे’च्या मागे ‘राव’ हे विशेषण लावतात, हे त्याच अर्थाने असावं असं मला वाटतं. गम्मत म्हणजे समस्त ‘राणे’ स्वत:ला राणाप्रतापचे वंशज समजतात आणि त्या अर्थानेही ‘राव’ म्हणजे राजदर्शक शब्द होतो.
मला ‘राऊळ’ या अर्थाचा आणखी एक संबंध लावावा वाटतो. हा संबंधं थेट सातासमुद्रापारचा आहे. ‘राऊळ’ या शब्दाचा अर्थ ‘राजा’ किंवा ‘राजघराण्यातला’ असा आहे, तर मग ‘राऊळ’ या शब्दाचा संबंध इंग्लंडातल्या ‘राॅयल’ या शब्दाशी असलाच पाहिजे असं म्हणता येईल. ‘राॅयल’ हा शब्द ‘राजवंश’ किंवा ‘राजघराणं’ याच अर्थानं तिथं आणि जगभरातही वापरला जातो. केवळ अर्थच कशाला, ‘राऊळ’ किंवा गुजराती ‘रावल’ हे शब्द, ‘राॅयल’ या शब्दाशी किती साम्य दाखवणारे आहेत. फक्त ‘ऊ’ किंवा ‘व’ अक्षराच्या ऐवजी, इंग्रजीत ‘य’ अक्षर आलं आहे, हाच काय तो फरक..! बाकी अर्थही तोच आणि अक्षरंही तशीच..
मातृभाषेला पर्याय नसला तरी भाषा-भाषांमधला हाच भगिनीभाव मला मोहवतो..!
— नितीन साळुंखे
9321811091
Raul हा शब्दप्रयोग राज घरण्याविषयी च आहे पूर्वी raul की दिली जात असे त्यात ते घराने तिकड़ील पूर्ण एरियाचा करभार पहात असे व त्यावर त्यांचे नियंत्रण असे व पूर्ण गांव व एरिया चा ते कुटुंब देखभाल करित असे