मार्गावरी विद्येच्या, वाहतात शिशु, पुस्तकांचे भारे ।वाटें पालकां, वार्धक्य अपुले, सुखविणार ते सारे ।।खाऊनि खस्ता अनेक, पालक, खाती खुषीत गाजरे ।फूटूनि पंख, उडतांच पाखरे, येती अनुभव बोचरे ।।येती अनुभव बोचरे ।।१।।वेळेस देऊनि, अपुला पाट ही, वाढविती, पाल्याची ऐट ।जपती अपुल्यापरी, न मिळण्यात, यातना तयांना, थेट ।।हातचे न ठेवुनि कांही, देण्यास झटती, तयांना निवारा ।सरतांच सर्वचि, विकलांगी, जाते कठीण, मिळणे सहारा ।।जाते कठीण, मिळणे सहारा ।।२।।सारेच जगीं, सदा, असेच घडते, असे कधीच नसते ।म्हणतात म्हणुनि, पेरावे तसे ते, नेमेचि उगवते ।।परी, असतो, भ्रममनीं, पेरलेले सारेच तरारते ।खडकावरी पेरलेले होते, हमखास करपूनि जाते ।।हमखास करपूनि जाते ।।३।।कुरकुर सारखी, नाही ऐकत, मुले आजकालची ।किरकिरी करिती, पालक, मौज अपुल्याच जीवनाची ।।पाठीं मुलांच्या, लावितां पिरपिर, अपुल्याच विचारांची ।म्हणती मुले, “आतां वेळ तुमची, ज्ञांत, चुप्प बसण्याची ।।ज्ञांत, चुप्प बसण्याची ।।४।।वाढविती सारे, सगळे, “संसार-गुंता” अपुल्या परीने ।“स्वांत्य-सुखाय” होते वाढ गुंत्यात, आपल्याच इच्छेने ।।असतां वाढवित गुंता, मन, आनंद लहरींवरी नाचते ।सोडवविणे अपुलाचि गुंता, जातां कठिण, कां खटकते ।।जातां कठिण, कां खटकते ।।५।।जे जे उगवळे, सारेचि ते ते, मधु-गोड मानूनि घ्यावे ।जीवनीं उरल्या, नसावे शल्य, निसटलेल्या क्षणांचे ।।न वाढतां क्षमता मनाची, गिळूनि मूग, स्वस्थ बसावे ।बसूनि निवांत, करावे रवंथ, अपुल्याच भूतकाळाचे ।।अपुल्याच भूतकाळाचे ।।६।। -गुरुदास / सुरेश नाईक६ फेब्रुवारी २०१२“समर्पण ध्यान शिबीर”पुणे – ३०
“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply