रविबिंबाला निरोप देण्या
संध्या अवतरली
त्याच वेळी त्या कवेत घेण्या,
रजनी आतुरली II
रजनी, उषा, अन संध्याराणी
असती त्या भगिनी
परी रवीवर प्रेम तिघींचे
शुद्ध नी आरसपाणी
रवीमिलनाला तिघींची ही त्या
हृदये आतुर झाली
त्याच वेळी त्या कवेत घेण्या
रजनी आतुरली II
गौरवर्ण ती उषा म्हणाली
माझे स्थान पहीले
ब्राह्ममुहूर्ती मलाच रवीने
सर्व प्रथम पाहिले
आमुच्या मिलने रोज रोज ती
सोनसकाळ सजली
त्याच वेळी त्या कवेत घेण्या
रजनी आतुरली II
संध्याराणी असे सावळी
शांत सोज्वळ असे
आमुचे मीलन होवो जेव्हा
भास्कर दमत प्रवासे
आमुच्या मिलना जन म्हणतील हो
तिन्हीसांज ती झाली
त्याच वेळी त्या कवेत घेण्या
रजनी आतुरली II
अनेक नावे त्या रजनीची
निशाही म्हणती तिला
काळी कुट्ट परी स्वभाव शीतल
शुक्र तारा वेणीला
मम सदनी रवी निद्रा घेईल
लाज लाजून म्हणाली
त्याच वेळी त्या कवेत घेण्या
रजनी आतुरली II
जनहो ही तर कवी कल्पना
तिघीही एक स्वरूपं
अवनी अन सूर्याच्या भ्रमणे
विविध भासती रूपं
संध्या रजनी उषानेच ती
दिनचर्या ठरविली
त्याच वेळी त्या कवेत घेण्या
रजनी आतुरली II
काव्यरचना -©प्रमोद जोशी
जळगाव
9422775554
Leave a Reply