रविवार माझा आवडीचा होता. शनिवार पर्यंत दगदग. वेळ आणि काम यांची सांगड घालताना दमछाक व्हायची. कॅलेंडर मधील लाल रंगाचा रविवार कधी येणार असे व्हायचे. सगळ्यांनाच सुट्टी म्हणून आनंद व्हायचा. रोज सकाळी लवकर उठायची सवय असल्याने त्या दिवशीही लवकर जाग आली की अरे आज धावपळ नाही झोपू या आणखी थोडा वेळ. पण नाही जमलं कधी. रोजची कामे सुरू. मुलेही फार फार तर अर्धा तास लोळत असायची. आता मी पाहते ऐकते की रविवारी मुले किती वाजता उठतात? शाळेला सुट्टी पण पोटाला नाही ना. मग काय ज्यादा कामे. मुलींना न्हाऊ घालणे,चादरी पडदे किंवा इतर काही धुणे. घराची साफसफाई. दळण करणे. कोरड्या चटण्या करणे. कपाट आवरणे. जेवणात आणि दुपारच्या खाण्यात त्यांच्या आवडीचे पदार्थ करणे. एखाद्या धार्मिक कार्यक्रमांचे. हळदीकुंकूवाचा. परिचितांना बोलावणे चहा पाणी.असे ठरविले जायचे. पुढे नातवंड झाली तेंव्हा घरातील जबाबदारी कमी झाली सुट्टीला जोडून रविवार आला की मुलीकडे जाऊन नातवंडाशी खेळणे. बोलणे धमाल मजा करुन परत येताना जड अंतःकरणाने प्रवास करताना डोळे भरून यायचे. एक सुट्टीचा रविवार कामात बदल पण आनंदाने जायचा….
आताही रविवार येतात पण आवडत नाही कारण या दिवशी आईबाबा मुलांना घेऊन एक तर फिरायला म्हणजे गावाला जाणे. किंवा जे सकाळी जातात ते रात्रीचे जेवण करूनच येतात. घरात कामे नसतात. मुलगी जर जवळपास असेल तर तिच्या कडे पण हेच असेल कदाचित. थोडा फार फरक असेल पण रविवारी येत नाहीत. वाटते काहीतरी कराव तेवढंच समाधान व वेळ जाईल आणि असली तरी ती वयानुसार करता येत नाहीत. आणि केलीच तर ती आवडत नाहीत म्हणून आहो कशाला करायची ही कामे आराम करायचा ना? उद्या मावशी बाई करतीलच. त्यामुळे लाल रंगाचा तो रविवार माझ्या साठी न आवडीचा. तुमचे रविवार बदल काय मत आहे?
— सौ कुमुद ढवळेकर.
aapale lekh khup chhan asatat mala aavadtat dhanyawad