मी फावल्या वेळात तू -नळीवर ” इंडियन आयडॉल ” बघत असतो. नुकताच धर्मेंद्र-मुमताजचा एपिसोड बघितला. ” मैं तेरे इश्क़में मर ना जाऊँ कहीं ” या गाण्यातील दृश्य त्यांनी री -क्रिएट केले. मुळात दोघे ५० वर्षांनी एका कार्यक्रमात एकत्र आले होते.
धरम ८७ वगैरे आणि मुमू (तिचे लाडीक नांव) ७४ ची ! या वयात ते जुने दृश्य री-क्रिएट करणे जरा “अति “होते. या “ओघळलेल्या ‘ वयात त्यांनी ती भावनांची जुनी कोवळीक कोठून आणायची?
TRP काहीही म्हणजे अक्षरशः काहीही करायला भाग पाडतो या लीजेंड्सना – पण या थराचे ? त्यांनी चित्रीकरणाच्या गंमती-जंमती सांगाव्यात, त्यांचे नातेबंध कसे होते ते आठवावे, त्या काळातील चित्रीकरणात आलेल्या तांत्रिक अडचणी सांगाव्यात आणि नव्या पिढीला “गोष्टी सांगेन युक्तीच्या चार” एवढा सहभाग मर्यादित ठेवावा. पण त्यादिवशी स्पर्धक-गायिका चक्क त्या विशिष्ट गाण्यात मुमताजने घातलेला (जुन्या फॅशनचा) पोषाख घालून आलेल्या होत्या. हे स्मरणरंजन म्हणून ठीकही मानता येईल.
रिऍलिटी शो हाच मुळात री -क्रिएशनचा आरसा असतो. जुनी गाजलेली सोलो-ड्युएट गाणी नवी मंडळी री-क्रिएट करीत असतात. आणि आपण त्या हुबेहूब “कॉपीला” (लता, किशोर ची कितवी तरी आवृत्ती) दाद देत असतो.
उत्सुकतेपोटी माधुरीचा सहभाग असलेला “इंडियन आयडॉल” एपिसोड बघितला. तिलाही “चोली के पीछे ” री-क्रिएट करायला लावले. माधुरी असल्याने ते दृश्य काहीसे सुसह्य वाटले इतकेच !
नवनिर्मिती अवघडच असते, तिच्यासाठी प्रतिभा, साधना आणि चिकाटी लागते हे मान्य ! पण ते सगळे ओरिजिनल असते. पुनर्निर्मिती त्या मानाने सोप्पी ! सगळी पायवाट आधीच आखलेली असते, तिची फक्त “री “ओढायची. स्वतःचे पाच टक्केही त्यांत भर म्हणून घालायचे नसते. यांतही धनुष्य उचलण्याचा आनंद असतो हे नाकारता येत नाही, पण “स्वत्व” काय? सी रामचंद्रांच्या भाषेत ” गळा म्हणजे कॅसेट प्लेअर ” ! गाणं आत टाकायचं आणि बटन ऑन.
यावरून माझ्या डोक्यात विचार आला- आजचे शाळा-महाविद्यालयांचे स्नेहमेळावे म्हणजेही री -क्रिएशनच ! पूर्वी सवंगड्यांसमवेत जगलेले खट्टे-मीठे क्षण पुन्हा जगणे. तीच शाळा/महाविद्यालय, वर्गखोल्या, प्रयोगशाळा, मित्र-मैत्रिणी ! फक्त काळाने हात फिरवल्यामुळे केसांनी रंग बदललेला . पण त्यांत तो जुना आनंद मिळतो का? मिळणारा अनुभव अस्सल/ओरिजिनल असतो कां ?
मग लेखनही री-क्रिएशनच की – विशेषतः आत्मचरित्र ! मनात हिरवेगार असलेले क्षण विरायच्या आत कागदावर उतरविणे.
फार “री ” च्या मागे लागलो आहोत बुवा आपण, आणि त्या भरात मूळ “क्रिएशन” विसरलो आहोत की काय?
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
We call it is FUSION. Hahaha !!
nav nirmitichya maage konala ja vayas dhadas naahi. je june changale aahe tyache vidrupikaran karun sadarikarn karane aani tyala kiti views milale yatach sagala aanand aahe.aaso kalay tasmainmha. 9403030939