नवीन लेखन...

वास्तववादी चित्रकार एस. एम. पंडीत

एक व्यासंगी, अद्भूत व वास्तववादी चित्रकार एस. एम. पंडीत यांचा जन्म २५ मार्च १९१६ रोजी कर्नाटकातील गुलबर्गा येथे झाला.

साबानंद मोनप्पा उर्फ एस.एम.पंडित यांना बालवयापासूनच चित्रकलेकडे ओढा होता. त्यांना घरूनही प्रोत्साहन मिळाले. चेन्नई येथून चित्रकलेचा डिप्लोमा मिळ्वून ते पुढील शिक्षणासाठी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल झाले. आर्ट स्कूलचे प्रिन्सिपॉल सॉलोमन यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाचा लाभ त्यांना झाला आणि ब्रिटिश वास्तववादी चित्रशैलीतील रेखांकन व रेखाटन, मानवाकृतीचे चित्रण व चित्ररचना, तैलरंगाचे रंगलेपन तंत्र, उच्च दर्जाचे व्यक्तिचित्रण अशा विषयांचे ज्ञान त्यांना प्राप्त करता आले. त्यावर पंडित यांनी प्रभुत्व प्राप्त केले.

शिक्षण पूर्ण झाल्यावर १९३८मध्ये त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात चित्रपटांचे पोस्टर करण्यापासून झाली. मेट्रो गोल्डविन मेयर कंपनीची पोस्टरे त्या वेळी अमेरिकेतून येत असत. ही पोस्टरे इथेच तयार करू शकेल अशा भारतीय चित्रकारांच्या शोधात कंपनी होती. त्यासाठी पंडित यांची निवड झाली. या कामासाठी तैलरंगाऐवजी अपारदर्शक जलरंगांचा (पोस्टर कलर) वापर पंडित यांनी सुरू केला. त्यांची कामे ‘मेट्रो’ सिनेमागृहाच्या शोकेसमध्ये झळकू लागली आणि रसिकांचे आकर्षण ठरू लागली. त्यानंतरच भारतामध्ये हिंदी चित्रपटांसाठीची पोस्टर निर्मिती सुरू झाली.

प्रारंभी एस.एम. पंडित हे ‘फिल्म इंडिया’ मासिकाची मुखपृष्ठे करू लागले. १९४४ मध्ये यांनी स्वतःचा स्वतंत्र स्टुडिओ स्थापन केला. याच कालखंडात त्यांचं ‘राम-सीता’ हे चित्र पार्ले कंपनीच्या कॅलेंडरवर छापले गेले आणि ते प्रचंड गाजले. कंपनीने त्याच्या साठ हजार प्रती काढून विक्री केली. त्यानंतर पंडित यांच्या कारकिर्दीतील ‘कॅलेंडर पर्व’ सुरू झाले. त्यांनी चितारलेल्या देवदेवता व पौराणिक विषयांच्या चित्रांना प्रचंड मागणी होती. देशभरातून त्यांच्याकडे कामाचा ओघ सुरू झाला. त्या काळात रोज १५ ते १६ तास बसून पंडित चित्रे साकारत होते. हजारो/लाखोंच्या संख्येनं कॅलेंडरच्या प्रती निघत होत्या. घराघरांत ती चित्रे पोचत होती.

चित्रपटसृष्टी व कॅलेंडरच्या विश्वात एस.एम. पंडित व्यग्र होते तरी त्यांचा पिंड आध्यात्मिक होता. ते काली मातेचे उपासक होते, ज्योतिषाचे अभ्यासक होते. १९६६मध्ये त्यांनी गुलबर्ग्याला काली मातेची व शिवाची प्राणप्रतिष्ठा केली व घर बांधून तेथे आर्ट गॅलरी स्थापन केली. १९६८ मध्ये व्यावसायिक कामातून निवृत्ती स्वीकारून पंडितांनी अतिशय काव्यात्मक वास्तववादाचे दर्शन घडवणारी भव्य तैलचित्रे साकारली. त्यासाठी आपल्या पौराणिक कथांमधील सर्वज्ञात विषय त्यांनी निवडले. त्यांच्या काव्यात्म अभिव्यक्तीला पोषक अशी सामग्री या विषयांद्वारे त्यांना लाभली. त्याच बरोबरीने अतिशय दर्जेदार अशी व्यक्तिचित्रे त्यांनी सातत्याने चितारली. राजा रविवर्मा यांच्यानंतर पंडित यांनीच पौराणिक विषय अतिशय ताकदीने हाताळले. कन्याकुमारीच्या विवेकानंद शिला स्मारकासाठी विवेकानंदांचे तैलचित्र साकारण्याआधी पंडितांनी रामकृष्ण परमहंस व शारदामाता यांची चित्रे काढली, अंतर्मुख होऊन विवेकानंदांच्या व्यक्तिमत्त्वाचे सखोल मनन-चिंतन केले व आध्यात्मिक साधना केली. त्याचे फलस्वरूप त्यांच्या दृष्टीपुढे जे साक्षात्कारी दर्शन झाले, ते त्यांनी भव्य तैलचित्रात उतरवले. हे चित्र म्हणजे व्यक्तिचित्रण कलाप्रकाराला अभिजात कलाकृतीच्या उच्चतम पातळीला नेणारे आदर्श उदाहरण आहे. आज घरांघरांतून स्वामी विवेकानंदांचे हेच एकमेव चित्र पहायला मिळते.

१९७८ मध्ये लंडनला झालेले पंडितांच्या चित्राचे प्रदर्शन खूप गाजले. त्यानंतर १९९१मध्ये आप्तेरष्टांच्या आग्रहाखातर पंडित यांनी मुंबईत जहांगीर कलादालनात आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवले, त्याला रसिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. त्यानंतर पुण्यातही विक्रमी प्रतिसादात हे प्रदर्शन झाले.

एस.एम. पंडित यांचे ३० मार्च १९९३ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..