ठाणे जिल्हाप्रमुख आणि आमदार एकनाथ शिंदे यांच्या लग्नाच्या २५व्या वाढदिवसानिमित्त गाण्याचा कार्यक्रम मी सादर केला. दुसऱ्या दिवशी सकाळी संगीतकार चिनार खारकर भेटायला आला. गेल्या वर्षीच्या चित्रपट ‘मानसन्मान’ नंतर आम्ही एकत्र काम केले नव्हते.
“सर आपण नव्या पद्धतीच्या हिंदी गाण्यांचा अल्बम करू या. यात गझल नसतील. तुमच्या नेहमीच्या स्टाईलहून अगदी वेगळ्या रचना असतील.” चिनार म्हणाला. प्रियांकाही ॲकॅडमीत होती. तिने ही कल्पना उचलून धरली आणि आम्ही एका नव्या अल्बमच्या तयारीला लागलो. लवकरच २० एप्रिल २००९ रोजी या अल्बमचे पहिले गाणे माझ्या आवाजात रेकॉर्ड झाले. यानंतर कौस्तुभ सोनाळकर या तरुण संगीतकारासाठी मी एक हिंदी गाणे रेकॉर्ड केले. जून २००९ मध्ये चिनार-महेशने दोन नवी हिंदी गाणी माझ्या आवाजात रेकॉर्ड केली. या रेकॉर्डिंगसाठी बरेच श्रम घ्यावे लागले. कारण ही हिंदी गाण्यांची नवी स्टाईल होती. या पद्धतीने गाणे अजिबात सोपे नव्हते. या सर्व नवीन प्रोजेक्टसमुळे माझी कार्यक्रमांची गती मंदावली.
१५ सप्टेंबर २००९ रोजी जिल्हा परिषद अभियंता संघटनेसाठी अभियंतादिनानिमित्त मी गाण्याचा कार्यक्रम केला. यामुळे मी इंजिनियरसुद्धा असल्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. नंतर ‘रजनीगंधा’ या वैशालीताई सोनाळकरांच्या अल्बमच्या प्रकाशनासाठी गाण्याचा कार्यक्रम आम्ही सादर केला. या कार्यक्रमाला लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर, रवींद्र लाटकर आणि शास्त्रीय गायक उपेंद्र भट यांची उपस्थिती लाभली. मग ‘सुहाना सह्याद्री अंताक्षरी नवरात्री सेलिब्रिटी स्पेशल’मध्ये मी गायलो. माझ्याबरोबर माधुरी करमरकर, आनंद सावंत, योगिता गोडबोले, दिपक चव्हाण हे इतर कलाकार होते. संगीत संयोजन प्रशांत ठाकरे यांचे होते. हा कार्यक्रम रसिकांना फार आवडल्यामुळे या कार्यक्रमाचे निर्माते विद्युत शहा यांनी दिवाळी सेलिब्रिटी स्पेशलसाठीही आम्हा कलाकारांना परत बोलावले. अजून एक रंगतदार एपिसोड आम्ही केला. या कार्यक्रमाचे निवेदक अभिनेते अतुल परचुरे आणि गायिका नेहा राजपाल होते. नंतर माझे मेहुणे आयोजक विनायक पटवर्धन यांच्यासाठी गीत-गझलचा कार्यक्रम पुण्याला केला.
२०१० या वर्षाची सुरुवात ‘अत्रे कट्टा’च्या कोपरी उद्यान, ठाणे येथील कार्यक्रमाने झाली. हा गझलचा कार्यक्रम अतिशय रंगला. रसिक श्रोत्यांची भरघोस उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. अशी जोरदार सुरुवात झाल्याने या वर्षात काहीतरी चांगले होणार असे मला वाटायला लागले आणि नेमके तसेच घडले. अनेक टीव्ही चॅनल्सवर आता संगीताच्या स्पर्धा सुरू झाल्या होत्या. या स्पर्धांमध्ये ऑडिशन देण्यासाठी स्वर-मंच ॲकॅडमीच्या अनेक मुलामुलींना मी घेऊन जाऊ लागलो. त्यात अनेक जणांना यश मिळू लागले अमी शहा या माझ्या विद्यार्थिनीला टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन अशी अनेक बक्षिसे मिळाली. माझी मुलगी शर्वरी ‘रिन मेरा स्टार सुपरस्टार’ या स्टारप्लसच्या संगीतस्पर्धेसाठी मुंबईत वीस हजार मुलांमधून निवडली गेली. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शर्वरी आणि माझी पत्नी प्रियांका एक महिना अंधेरीला रहात होत्या. कोमल करंदीकर, राधिका जोगळेकर आणि दर्शना घळसासी यांनाही अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळाली. या निमित्ताने या स्पर्धांच्या अनेक आयोजकांशी परिचय झाला. माधवी ही यातील एक कुशल आयोजक!
-अनिरुद्ध जोशी
Leave a Reply