ओल्या कचऱ्याचा संपूर्ण पुनर्वापर आपल्याला करता येईल. प्रत्येकाने आपल्या घरातल्या कचऱ्याचे सुरीने कापून त्याचे बारीक तुकडे केले अथवा पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक चटणी केली आणि ती घराच्या बाल्कनीत ठेवलेल्या कुंड्यात टाकली तर कुंड्यांतील रोपे भराभर वाढतात. या रोपांना वेगळे खत घालावे लागत नाही. आजवर आपण कुंड्यांत फक्त फुलझाडे लावत आलो. पण बाल्कनीत चार-पाच तास पुरेसे ऊन येत असेल तर कुंड्या, फुटक्या बादल्या, फुटके माठ, खतांच्या/सिमेंटच्या पिशव्या वापरून त्यात आपल्याला अनेक प्रकारच्या भाज्या आणि फळे घेता येतात. या कुंड्या/पिशव्या/माठ यात अर्धी तपेली एवढेच पाणी पुरेसे असते. (लोक कुंड्यांना एरवी अंघोळ घातल्यासारखे पाणी घालतात.) हे पाणीसुद्धा तांदूळ धुतलेले, भाज्या धुतलेले, देवपुजा केलेले असे कोणतेही असले तरी ते वापरता येईल. फक्त धुण्या-भांडयाचे पाणी वापरू नये. कारण त्यात साबणाचे पाणी असते.
अनुभव असा आहे की, बाल्कनी किंवा गच्चीवर अशा प्रकारच्या भाज्या आणि फळे उत्तम रीतीने येतात. यातील एक धाडसी विचार असाही आहे की सोसायट्यांनी ठरवले तर तीन-चार सोसायट्यांमागे एक माळी नेमावा. प्रत्येक सोसायटीने आपल्या टेरेसवर अशा प्रकारची बाग करावी. त्यात सोसायटीतील प्रत्येक फ्लॅटमधील ओला कचरा जमा करून त्याची वर म्हटल्याप्रमाणे चटणी करुन ती या प्रत्येक रोपांभोवती पसरावी. एका माळयाला दोन तास पडेल एवढेच काम प्रत्येक सोसायटीत असेल. यातून सोसायटीतील प्रत्येक फ्लॅटधारकाला रोजची ३००-३५० ग्रॅम भाजी मिळू शकेल, एवढी क्षमता या बागेत मिळवता येते.
या पद्धतीने बाहेरची महागडी भाजी विकत घेण्यापेक्षा आपल्या नजरेखाली झालेली भाजी खाता येईल. प्रत्येक फ्लॅटमधील ओला कचरा, कचरा कुंडीत जाण्याऐवजी त्याचे पुनर्चक्रिकरण होईल आणि एक माळी तीन-चार सोसायट्यांत त्याच्या आठ तासात काम करू शकेल. खर्चाच्या दृष्टीने पाहता, माळ्याचा पगार तीन-चार सोसायट्यांत विभागला जाईल.
Leave a Reply