“ अहो ss .. ही तुमची औषधं, घडयाळ वगैरे या वरच्या खणात ठेवतेय बरं का ss !!” ..
“ हो हो .. चालेल!”.
पुनर्विकास झालेल्या इमारतीत नुकतेच रहायला आलेल्या ज्येष्ठ नागरिक जोडप्याचा संवाद.
“ .. आणि या आतल्या दिवाणावर ही निळी चादर घालू का हो ?
“ अगं .. आता तुला जसं हवं तसं सजव हे नवीन घर. मला तर जिवंतपणी या नवीन घरात रहायला आलो यातच समाधान आहे. जुनं घर सोडलं तेव्हा वाटलं की माझ्या ऐवजी इथल्या भिंतीवर फोटो लागतोय की काय माझा !”
“ अहो काssय हे ? भरल्या घरात काय बोलताय हे असं ?
“ असं नाही गं ! रिडेव्हलपमेन्ट होतंच आहे तर आपल्या हयातीत तरी व्हावं म्हणजे किमान काही वर्ष तरी आनंदाने नवीन वास्तूत राहता येईल इतकीच अपेक्षा. इतकी वर्ष खुराड्यात राहिलो आता वार्धक्यात तरी मोठ्या घराचा उपभोग घेता येईल. पण आज खूप खुश आहे बघ मी. एकदम झकास वाटतंय आता !”
“ हे बाकी खरं आहे तुमचं. आता हळूहळू सगळेच जुने सख्खे शेजारी येतील थोड्या दिवसात रहायला. मग सोसायटी पुन्हा पूर्वीसारखी गजबजेल.
“ हो गं , सगळे कशी आतुरतेने वाट बघत होते. प्रत्येकाला एक तरी खोली वाढीव मिळाली हे फार बरं झालं. रिडेव्हलपमेन्टच्या आधीची दोन वर्ष तर आपण सगळ्यांनी फार त्रासात काढली. म्हणजे ढकललीच म्हणायची. आता वर्षभरात सगळी प्रक्रिया होईल असं वाटून कितीतरी जणांनी घरात डागडुजीची कामं सुद्धा काढली नव्हती. आणि बरोबरच होतं म्हणा ss . आत्ता खर्च केला आणि नेमकी वर्ष सहा महिन्यात गेली बिल्डिंग रिडेव्हलपमेन्टला तर वाया नसता का गेला?. म्हणूनच आपण तरी कुठे रंगकाम काढलं होतं ?”
“ मग काय ? सगळ्यांचे परिवार वाढले, गरजा वाढल्या. त्यामुळे आधीच जागा पुरत नव्हती. त्यात कुणाकडे दरवाजे खिळखिळे झाले होते, कोणाकडे भिंतींचे पोपडे निघाले होते, कोणाकडे वाळवी लागली होती. आपल्या वरच्यांकडे तर छताचं प्लास्टर पडलं होतं . बाप रे !! मला तर बाई ते सगळं आठवलं तरी काटा येतो.
“ होय तर. नंतर बिल्डरनी सुद्धा देतो देतो म्हणत पाच वर्ष लावली. तरी बरं आपली छोटीशी बिल्डिंग होती म्हणून. कॉम्प्लेक्स-बिम्प्लेक्स असतं तर अजून रखडलं असतं. जाऊ देss . आलो बुवा एकदाचे!!”
एकेक करत पुढच्या महिन्याभरांत सगळे जुने रहिवासी नवीन घरात आले अन् प्रत्येक घरांत हे असेच संवाद होऊ लागले. प्रत्येकाचे वयोगट, त्यांची प्राथमिकता, त्यांची परिस्थिती यानुसार थोडेफार फरक असले तरी घरोघरी उत्साह मात्र अगदी एकसारखाच. कोणाच्या मुलांना दहावी-बारावीच्या अभ्यासासाठी स्वतंत्र खोली मिळाली म्हणून आनंद होता. तर कोणी हक्काचं पार्किंग मिळाल्यामुळे नवीन गाडी घेण्याच्या तयारीत होता. कोणी आपल्या आईवडिलांना मोठ्या जागेत आणल्यामुळे समाधानी होतं तर कोणाकडे आपल्या मुलांची लग्न करण्याचे मनसुबे सुरू झाले. एकंदरीत या रिडेव्हलपमेन्टमुळे सोसायटीत एकदम प्रफुल्लित वातावरण होतं. सगळ्यांचंच बऱ्याच वर्षांपासूनचं स्वप्न अखेर पूर्ण झालं होतं.
आता बिल्डरनी दिलेल्या तात्पुरत्या सुविधा संपुष्टात येणार असल्यामुळे पुढचे कायमस्वरूपी निर्णय घेण्यासाठी सोसायटीतले सभासद भेटू लागले. त्यापैकी दूधवाला, पेपरवाला वगैरे प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार धरले. काही पूर्वीचे तर काही नवीन होते. सफाई कामगाराची सुद्धा व्यवस्था लगेच झाली. वॉचमन नेमण्यासाठी एका खाजगी कंत्राटदारला सांगितलं होतं. आजूबाजूच्या काही सोसायटीत त्याच सिक्युरिटी एजन्सीची माणसं असल्यामुळे विश्वासार्हता लक्षात घेत त्यालाच जबाबदारी दिली होती. पण त्याच्याकडून काही उत्तर येत नव्हतं. शेवटी एक दिवस त्याला सगळ्या सभासदांनी बोलावून जाब विचारला.
“ ओ साहेब .. दोन शिफ्ट पैकी एकाची सोय होतेय. सध्या बरीच माणसं गावाला गेलीयेत. नवीन माणसं नाहीयेत हो. जी मिळाली ती माझ्या आधीच्या साईटवर हायेत !”.
“ अरे पण दुसऱ्याची सुद्धा कर काहीतरी व्यवस्था !!”.. सेक्रेटरींची विनंती
“ हम्म .. एक गरजू पोरगा आहे. आत्ताच गावावरून आलाय. वॉचमनच्या नोकरीसाठी सारखा मागं लागलाय माझ्या. बरा दिसतोय पण त्याचे थोडे प्रॉब्लेम हायेत. बघा तुम्हाला जमतंय का ते !”.
“ काय प्रॉब्लेम आहेत असे. काही भलते सलते असतील तर नको रे बाबाss !!” – एका काकांची शंका
“ नाय साहेब तसला काय नाय. फक्त तो शिक्युरिटी म्हणून ठेवायला तसा लहान पोरगा आहे. पंचविशीच्या आतला. दुसरं म्हंजी त्याला तीन चार महिन्यांसाठीच नोकरी धरायची आहे. आणि लफडा असा आहे की त्याला रहायला घर नाय !” .
“ अरे बापरे ! इतका लहान .. उडाणटप्पू वगैरे असेल तर ?? आपल्या सोसायटीत लहान मुलं आहेत. तरुण पोरी बाळी आहेत !” … एका आजोबांची काळजी
“ अहो नाय. तसा कायच नाय होणार. ती जिम्मेदारी आपली. मी काय म्हणतो २-३ महिन्यांचा प्रश्न आहे. नंतर तो जाणार आणि तोपर्यंत माझी जुनी माणसं पण येतील. मग लावतो तुमच्या इकडे मस्त तगडे गडी. एकदम पिळदार मिशावाले शिक्युरिटी उभे करू आपण गेटवर !!”
“ मग त्याच्या राहण्याचं काय ?”
“ इथं मागच्या साईडला वॉचमनची मोठी केबिन आहे तिथं तो राहील. दूसरा घरी जाऊन-येऊन करेल. ज्याची ड्यूटी असेल तो इथं गेटपाशी असलेल्या छोट्या केबिन मध्ये बसेल. एकेक महिना आलटून पालटून सकाळ-रात्र करतील!!”.
अखेर त्याच्या शब्दावर विश्वास ठेवत आणि त्यातल्या त्यात हाच पर्याय बरा असल्यामुळे त्या मुलाची तात्पुरती नियुक्ती केली. दुसऱ्याच दिवशी तो मुलगा आपली वळकटी आणि पिशवीभर सामान घेऊन आला आणि त्या केबिन मध्ये आपलं बस्तान बसवलं. तूर्तास तरी सोसायटीसाठी सुरक्षा रक्षक हा विषय संपला होता. तसा हा मुलगा निरुपद्रवी होता. आपलं काम अगदी नेटाने करायचा. सांगितलेलं व्यवस्थित ऐकायचा. पण तरीही नवीन असल्यामुळे सोसायटीतले सभासद थोडं अंतर ठेवून वागा-बोलायचे त्याच्याशी.
साधारण महिना झाला असेल. एके दिवशी सकाळी हा मुलगा सेक्रेटरींनी सांगितलेलं कुठलसं काम करण्यासाठी गच्चीवर गेला होता. १५-२० मिनिटं लागणार होती म्हणून जाताना मुख्य फाटक बंद करून गेला. नेमकं तेव्हाच एक आजोबा बाहेर जायला निघाले. गेट बंद म्हणून त्याला शोधत त्या मागच्या केबिन मध्ये गेले. आतमध्ये गेले तर तिथल्या छोट्या स्टूलावर काही अभ्यासाची पुस्तकं पडली होती. कुतुहलाने आजोबांनी ती जरा चाळली आणि इतक्यात त्या केबिनच्या दरवाज्याच्या मागच्या एका कोनाड्यात त्यांना काहीतरी दिसलं आणि ते थबकलेच. त्यांनी ताबडतोब फोन करून ५-६ जणांना बोलावून घेतलं. सगळ्यांना त्या कोपऱ्यात सापडलेला फोटो दाखवला. सगळे एकदम ओरडलेच. “ बाळू ???????? . आणि याचा फोटो इथे कसा?”
“ कोणाचा फोटो आहे हा ?” गर्दी बघून खाली आलेल्या एका नवीन भाडेकरुचा प्रश्न.
“ अहो हा बाळू. आमचा जुन्या सोसायटीचा म्हणजे रिडेव्हलपमेन्ट व्हायच्या आधीच्या बिल्डिंगचा वॉचमन. बरेच वर्ष होता आमच्याकडे. एकदम सज्जन माणूस. कसलं व्यसन नाही. उलट बोलणं नाही. कधी दांडी मारली नाही. दांड्या मारायला मुळात तो कधी कुठे जायचाच नाही. एकटा होता. घरचं कुणीच नव्हतं त्याला. म्हणून इथेच पंपरूमच्या मागच्या बाजूला राहायचा बिचारा. क्वचित कधी गेला तर २-४ दिवसांसाठी गावाला जाऊन यायचा!”.
हे सगळं सुरू असताना तो मुलगा काम संपवून गच्चीवरून खाली आला आणि आल्याआल्या सगळ्या जुन्या मंडळींनी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
“ काय रे ? या बाळूचा फोटो तुझ्याकडे कसा ? तू त्याचा कोण? बाळू आहे कुठे सध्या ? “ वगैरे वगैरे
“ ते आता या जगात नाहीत. गेल्या वर्षी वारले.”
“ अरे काय सांगतोस काय ??? आणि तुझा त्याचा काय संबंध?”
“ मी त्यांचा भाचा. ते माझा मामा!”.
“ पण त्याला तर जवळचं कुणीच नव्हतं म्हणायचा तो!”.
“ सख्खी नाही काका . माझी आई त्यांची मानलेली बहीण होती!”.
“ अरे हां .. मागे एकदा तो फोनवर कुणाशी तरी बराच वेळ बोलत होता तेव्हा विचारलं तर मानसभगिनी म्हणल्यासारखं ओझरतं आठवतंय आत्ता. पण पुढे तो विषय तिथेच राहिला” . – एक जुने सभासद म्हणाले.
“ आणि तू नेमका याच सोसायटीत यावास आणि तेही वॉचमन म्हणून. विलक्षण योगायोग आहे हा !!”
“ योगायोग नाही आजोबा !”
“ म्हणजे ?? आता हे काय आणखी नवीन ?? तू सगळं काय ते सविस्तर सांग बाबा पटापट!” . सगळ्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोचली होती.
“ सांगतो सांगतो …. खरं तर गावाला ते आमच्या बाजूच्या खोलीत राहायचे. पण माझ्या आईचे आई-वडील तिच्या तरुणपणीच गेले तेव्हा या बाळूमामा आणि मामीनीच तिला आधार दिला. धाकट्या बहिणीसारखा सांभाळ केला. तिचं लग्न, बाळंतपण सगळं केलं. मी लहान असताना, साधारण १५ एक वर्षांपूर्वी मामी वारली. मग बाळूमामानी त्यांची खोली माझ्या आईच्या नावावर केली आणि सगळं सोडून इकडे शहरात आले नोकरीला. त्यानंतर सुरवातीची एक दोन वर्ष इकडे तिकडे करून कुणाच्या तरी ओळखीने ते या बिल्डिंगचे वॉचमन म्हणून लागले आणि तुमची सोसायटी रिडेव्हलपमेन्टला जाईपर्यंत इथेच होते. आम्हाला एकमेकांचा खूप लळा. आमचं नेहमी बोलणं व्हायचं. कधीतरी दोनेक वर्षांनी गावी यायचे. पण प्रत्येक वेळेस या सोसायटीविषयी अगदी भरभरून बोलायचे. इथल्या तुम्हा सगळ्यांचं खूप कौतुक करायचे. त्यांच्यासाठी ही सोसायटी कुटुंबच झाली होती. तुम्ही त्यांना दसरा-दिवाळीला प्रेमाने काही ना काही द्यायचात. घरी काही गोडाधोडाचे पदार्थ केले की आवर्जून एक वाटी बाळूसाठी म्हणून काढून ठेवायचात. आजारपणात डॉक्टरकडे न्यायचात. सगळं सगळं सांगायचे मला मामा !!”
“ हो रे बाळा .. खरं आहे. प्रत्येकाच्या अगदी परिवाराचा भाग झाला होता बघ तो. त्यानी सुद्धा खूप केलं आहे सोसायटीसाठी. ही आमची मुलं बाळूकाका-बाळूकाका म्हणत त्याला क्रिकेट खेळायला लावायची. दिवाळीत किल्ला करणं असो नाहीतर होळी पेटवायला लाकडं आणणं असो या मुलांचं बाळूकाका शिवाय पान हलायचं नाही!”.
“हो होss . सांगायचे ना गमतीजमती मला. ते नेहमी ‘आमची सोसायटी’ असाच उल्लेख करायचे. इतकं की ते राहायचे त्या पंपरूमलाच आपलं घर मानायचे. नंतर नंतर तर त्या खोलीची अवस्था खूप वाईट झाली होती. पावसाळ्यात गळायचं तिथे. उंदीर, घूशी, पाली त्रास द्यायच्या. आम्ही किती वेळा सांगितलं की आता नोकरी सोडून पुन्हा गावाला या. इथेच राहू एकत्र. तर म्हणायचे …”नाही नाही . आता आमची बिल्डिंग रिडेव्हलपमेन्टला जाणार. त्यात वॉचमन केबिन असणार म्हणजे मला सुद्धा नवीन घर मिळणार. ही जीर्ण सोसायटी दिमाखात उभी राहणार आणि मग मी त्या नव्या कोऱ्या बिल्डिंगचा वॉचमन होणार. तेव्हा बिल्डिंग पाडायला घेतली की येईन गावाला २-३ वर्षांसाठी आणि बांधून झाली की नव्या घरी परत !!”…. रिडेव्हलपमेन्ट होणार समजल्यापासून खूप उत्साह संचारला होता त्यांच्यात. तुम्ही सगळे जसे आपपलं घर मोठं आणि छान होणार म्हणून आनंदी होतात ना तसेच तेही चकाचक केबिन मिळणार म्हणून वाट बघत होते. दुर्दैवाने गेल्यावर्षी आजारी पडले. तीन महीने अंथरूणाला खिळले होते आणि शेवटी प्राण सोडला. त्यांच्या दोनच इच्छा होत्या. अगदी शेवटपर्यंत तेच सांगायचे मला. पहिली हीच की या रिडेव्हलप झालेल्या बिल्डिंगचा वॉचमन व्हावं आणि थोडे दिवस तरी या केबिन मध्ये रहावं. दुसरी म्हणजे मी एमपीएससी परीक्षा देऊन सरकारी नोकरीत जावं. त्याचा अभ्यास तर मी सुरू केला आहे. त्यासाठी ३-४ महिन्यात मला ही नोकरी सोडून जावं लागेल. पण त्यांनी इथे पुन्हा येण्याची इच्छा मात्र अपुरीच राहिली आणि ती मी पूर्ण करायचं ठरवलं. शेजारच्या बिल्डिंगमधला वॉचमन मामांचा मित्र. त्याचा नंबर होता माझ्याकडे. त्याला सांगून ठेवलं होतं की या सोसायटीचं रिडेव्हलपमेन्ट होऊन माणसं रहायला यायला लागली की मला कळव आणि काहीही करून तुमच्या एजन्सीतर्फे मला याच सोसायटीत नोकरी मिळवून दे. मामा तर येऊ शकणार नाहीत पण त्यांचा फोटो आणि अस्थी घेऊन मी जर इथे राहिलो तर त्यांच्या आत्म्याला नक्कीच बरं वाटेल.!” .. मामांचा फोटो अलगद आपल्या हातात घेत भावूक होत तो म्हणाला
“ अरे मग थेट आम्हाला येऊन भेटून का नाही सांगितलंस??”.. एक सभासदाने विचारणा केली
“ तो पण विचार केला होता मी काका पण .. ….!!!!
“ पण काय ??
“ गावाला आम्ही आणि इकडे तुम्ही वगळता त्यांचं कुणीच नव्हतं. घरदार,पैसाअडका सगळं आमच्या नावावर केलं. मामा नेहमी म्हणायचे की “बिल्डिंग बांधून झाल्यावर मला नक्की फोन करतील बघ!”. पण तुमच्यापैकी कोणाचाच फोन नाही आला. म्हणून वाटलं की कदाचित त्यांच्या वाढलेल्या वयामुळे तुम्हाला त्यांना आता कामावर ठेवायचं नसेल किंवा आता सोसायटी मोठी झाली तर खाजगी एजन्सीतर्फे सिक्युरिटी ठेवायची असेल. म्हणून नाही आलो. पण मामाची शेवटची इच्छा पूर्ण करायचीच होती मला म्हणून हा खटाटोप!”.
“ हो रे … अगदी खरं आहे . राहून गेलं बघ आमच्याकडून. अरे त्याला बोलवायचं नव्हतं वगैरे असं काही नाही रे. बिल्डिंग पडल्यावर वर्षभराने आम्ही सगळे सभासद एकदा भेटलो तेव्हा बाळूचा विषय निघाला होता. तेव्हा तो गावाला गेल्याचंही समजलं होतं. पण गेल्या ४-५ वर्षांत इतक्या घडामोडी घडल्या, इतके बदल झालेत. त्यातच हे बरेच वर्ष रखडलेलं रिडेव्हलपमेन्ट झालं आणि त्या नादात अनावधानाने बाळू विस्मृतीत गेला.. मुळात आमच्या घरांसारखं त्याच्या त्या छोट्या खोलीचंही रिडेव्हलपमेन्ट असू शकतं, आमच्यासारखी तोही रिडेव्हलपमेन्टची वाट बघत असू शकतो , त्यालाही नवीन वास्तूचं अप्रूप असू शकतं या सगळ्या गोष्टी लक्षातच आल्या नाहीत बघ आमच्या. असो … कारणं देऊन काही उपयोग नाही आता. पण तू मात्र रहा इथे बिनधास्त.
बाळूसारखंच सचोटीने काम कर आणि जोडीला भरपूर अभ्यास सुद्धा कर. खूप मोठा हो. हीच बाळूला खरी श्रद्धांजली ठरेल आणि कदाचित आमचं प्रायश्चित्त !!
बाळूप्रमाणेच हा मुलगादेखील अल्पावधीतच त्या सभासदांच्या कुटुंबातला घटक झाला. मामांच्या नवीन जागेतल्या ३-४ महिन्यांच्या वास्तव्यानंतर तो निघाला. अस्थी विसर्जन केलं आणि परीक्षेसाठी मार्गस्थ झाला. अचानक घडलेल्या या सगळ्या डेव्हलपमेन्टमुळे सगळ्यांचंच “रिडेव्हलपमेन्टचं” स्वप्न मात्र आज खऱ्या अर्थाने पूर्ण झालं होतं.
— क्षितिज दाते,
ठाणे
आवडल्यास text शेअर/फॉरवर्ड करायला माझी काहीच हरकत नाही …
Leave a Reply