मुंबई नगरीत अनेक अशाही वास्तू आहेत ज्या ब्रिटीश कालीन असूनही अजूनही तितक्याच ऐटीत आपली पाळंमुळं घट्ट रोवून उभी आहेत. मग त्या कुठल्याही क्षेत्राशी निगडीत इमारती असोत पण त्या त्यांचं अस्तित्व अजूनही टिकवून आहेत. अशीच एक वास्तू मुंबईत आजतागायत मुंबईकरांची मनोरंजनाची भूक भागवत आहे. ती वास्तू म्हणजे “रिगल सिनेमा” होय.
इतिहास :
रिगल सिनेमा ही वास्तू १९३० च्या दशकात बांधण्यात आली होती. हा तो काळ होता जेव्हा चित्रपटक्षेत्र भरभराटीच्या दिशेने प्रवास करत होता. याच काळात मुंंबईत प्लाझा सेंट्रल, न्यू एम्पायर, ब्रॉडवे, इरोस आणि मेट्रो हे देखील उघडले गेले. १९३३ मध्ये उघडलेल्या रिगलची रचना ही १९ व्या शतकातील प्रसिद्ध वास्तूरचनाकार एफ.डब्ल्यू. स्टीव्हन्स यांंचा मुलगा चार्ल्स स्टीव्हन्स यांनी आकृतीबंधीत केलेली होती. आत असलेल्या अवाढव्य आरश्यांची आरास, ही Czech Artist कार्ल स्चारा यांची होती.
हे चित्रपटगृह संपूर्णपणे सिमेंट आणि कॉंक्रीटच्या सहाय्याने बांंधण्यात आले आहे. चित्रपटगृहात चित्रपट पहाण्यासाठी येणार्या रसिकांसाठी त्यांच्या वाहनंं उभारण्याची सोय ही भूमिगत असलेल्या वाहनतळावर करण्यात आलेली आहे.
रिगल सिनेमा या सिनेमा गृहात तिसर्या Film fare Awards Night चं आयोजनही करण्यात आले होते. २०१५ व २०१६ साली झालेल्या मुंबईतील नामांकित असलेले फिल्म फेस्टिव्हल मामी (Mumbai Academy of Moving Image) याचे आयोजनही रिगल सिनेमागृहात करण्यात आले होते.
सध्या या इमारतीत चित्रपटगृहासोबत अनेक दुकानही आहेत.
पत्ता : कुलाबा कॉसव्हे, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या समोर,अपोलो बंदर, कुलाबा – मुंबई – ४००००५
संपर्क : ०२२ २२०२१०१७
— आदित्य दि. संभूस (कलाकार, दिग्दर्शक, लेखक)
Leave a Reply