बोल्ड अभिनेत्री रेहाना सुलतान यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९५० रोजी अलाहाबाद येथे झाला. बॉलीवूडमध्ये बहाई समाजाचे अगदी मोजके कलावंत आहेत, त्यातली एक रेहाना सुलतान यांचा जन्म एका सुखवस्तू कुटुंबात झाला. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर रेहाना सुलतान यांनी पुण्यातले एफटीआय मध्ये प्रवेश घेतला. रेहाना सुलतान या पहली नटी होत्या की ज्या FTII हून पास झाल्या व ज्यांना लगेचच चित्रपटात लीड रोल मिळाला होता. तिथे शिकत असतानाच त्यांना ब्रेक मिळाला १९६७ मधल्या विश्वनाथ अयंगारच्या ‘शादी की पहली सालगिरह’ या चित्रपटात बोल्ड सीन मुळे त्या गाजल्या. यावेळी त्यांचे वय फक्त सतरा वर्षाचे होते. १९७० च्या पूर्वार्धात राजिंदरसिंह बेदींना त्यांच्या बोल्ड कथेवर सिनेमा बनवायचा होता आणि त्यांची सहनायिका रेहाना यांच्या रुपात सापडली. याच सुमारास बी.आर.इशारांनी तिला ‘चेतना’त घेतले होते.
‘मैंने इतने नंगे मर्द देखे हैं कि मुझे अब कपड़े पहनने वाले मर्दों से नफरत होने लगी है’
‘चेतना’ चित्रपटातील या डायलॉगमुळे रेहाना सुलतान चर्चेचा विषय ठरल्या होत्या. या सीनमध्ये रेहाना लाल साडीमध्ये बेडवर झोपलेली दाखविण्यात आलेली आहे. हातात व्हिस्कीची बॉटल आहे आणि लाजत ती ग्राहकांना आपल्याकडे येण्यास खुणावत आहे. त्यावेळी चेतना चित्रपटाचे पोस्टरही त्याच्या बोल्डनेसमुळे फार प्रसिद्ध झाले होते.
इशारांनी फक्त अठ्ठावीस दिवसात याचे शुटींग पूर्ण केले. यातलं मुकेशचं ‘मै तो हर मोड पर तुझको दुंगा सदा…’ हे गाणं आजही लोकप्रिय आहे. हे दोन्ही चित्रपट पडले. पण रेहाना सुलतान यांना या दोन चित्रपटांमुळे तसेच रोल ऑफर होऊ लागले.
१९७२ मध्ये आलेल्या एन.एन.सिप्पी यांच्या ‘हारजीत’ या चित्रपटात रेहाना यांच्या बरोबर हिरो अनिल धवन होता. हा सणकून आपटला. १९७३ मध्ये रेहाना वेद राहीच्या ‘प्रेमपर्वत’मध्ये झळकल्या. ‘ये दिल और उनकी निगाहोंके साये’ हे अप्रतिम गोड गाणं यात होतं. हा ही चित्रपट फ्लॉप ठरला. त्यामुळे रेहाना यांना काम मिळणं बंद झाले. पंजाबी चित्रपटातही त्यांनी काम करून पाहिलं; पण तिथेही तिच मागणी होती, तिनं कपडे उतरवण्याची ! १९८४ मधे आपल्यापेक्षा सोळा वर्षांनी मोठ्या असणाऱ्या, आपल्याला ब्रेक देणाऱ्या बी.आर.इशारांशी रेहाना विवाहबद्ध झाल्या. त्यांचा संसार टिकला. मात्र इंडस्ट्रीत तिला टिकता आलं नाही. नाही म्हणायला याच वर्षी विजय आनंदच्या शबाना आझमी अभिनित ‘हम रहे ना रहे’ने त्यांना पुन्हा एकदा मोठी संधी मिळाली पण त्यालाही अपयशाचे तोंड पाहावे लागले. बघता बघता रेहाना यांचे करिअर संपुष्टात आले. तर बी.आर.इशारांनी जवळपास पस्तीस चित्रपटांचे दिग्दर्शन करूनही ब्लॉकबस्टर हिट त्यांच्या वाट्याला आली नाही. २०१२ मध्ये बी.आर.इशारा यांचे निधन झाले आणि रेहाना यांच्या रोजीरोटीचा प्रश्न उद्भवला. पतीच्या निधनानंतर मात्र त्या कोलमडून गेल्या. गाठीला जवळ पैसाअडका नाही, उपजीविकेचे साधन नाही. सुधीर मिश्रा यांनी त्याच्या ‘इन्कार’मध्ये रेहाना यांना घेतलं. गंमत म्हणजे हाही चित्रपट सेक्सुअल हरासमेंटवर आधारित होता पण हाही चित्रपट फ्लॉप ठरला. रेहाना सुलतान यांना ‘दस्तक’ या चित्रपटा साठी बेस्ट एक्ट्रेस कैटेगरी मध्ये नेशनल अवॉर्ड मिळाला होता. सध्या रेहाना यांना सिने एंड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशन (CINTAA) तर्फे प्रत्येक महिन्याला आर्थिक मदत केली जातेय.
रेहाना यांनी मध्यंतरी एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘त्यावेळी ती केवळ टाईप्ड अॅक्ट्रेस बनली होती. दर्शकांना ती केवळ सेक्स सिम्बॉल म्हणूनच पसंत होती. निर्मात्यांना फक्त बाथटब आणि पावसात भिजण्याच्या भूमिका ऑफर केल्याने तिला संताप होत असे’. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या एका चांगल्या अभिनेत्रीचे हे हाल कशामुळे झाले ? पडद्यावर सतत वेश्या साकारल्यामुळे ! लोकांची तिच्याविषयी नेहमीच इच्छा राहिली की तिने नेहमीच चद्दरबदली चित्रपटात कपडे उतरवत राहावेत. इतर नायिका साकारतात तशा सामान्य भूमिका तिने साकारून पहिल्या पण लोकांना त्या रुचल्या नाहीत. भरीस भर तिचा नवराही अशाच विस्कटलेल्या नात्यांवर चित्रपट करत राहिला. त्यामुळे दोन्ही अंगाने या अभिनेत्रीचे नुकसान होत गेले. आता तिचे वय झालेले आहे, या वयात तिला न्यूड पाहावं अशी कोणाची इच्छा असणार नाही. आता कमबॅकच्या प्रतिक्षेत असलेल्या रेहानाला वाटते की, या भूमिका तिने साकारल्या नसत्या तर तिचे करिअर नीट उभे राहिले असते आणि कदाचित तिनेही नाव कमावले असते. रेहाना असेही सांगते की, ‘तिचे नाव रेहाना सुल्ताना होते पण तिच्या Sultana मधील अखेरचा ‘A’ तिने सेन्सॉरला दान करून टाकला जो तिच्या जीवावर उठला. त्यामुळे ती सुलताना न राहता रेहाना सुलतान होऊन राहिली.’ वरवर हा विनोद वाटतो पण यात कारुण्याची झाक आहे जी एका व्यक्तीच्या कारकिर्दीची माती करून गेली. रेहाना सुलतान यांचे इतर चित्रपट ‘हार-जीत’, ‘प्रेम पर्वत’ , ‘किस्सा कुर्सी का’.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / समीर गायकवाड
‘चेतना’ चित्रपट
Leave a Reply