अमेरिकेचं आधुनिक, शहरी, चंगळवादी रूप डोळ्यांसमोर आणलं की त्यात धार्मिकतेला फारसा वाव असेल असं वाटत नाही. झगमगते शॉपिंग मॉल्स, अत्याधुनिक गाड्या, हॉलिवूड आणि वॉलस्ट्रीट, फास्ट फूड आणि जंक फूड, टीन प्रेग्ननसीज आणि सर्रास होणारे घटस्फोट, शस्त्रबळावर जगभर चाललेली पुंडगिरी या सगळ्यात येशु ख्रिस्ताला कुठे जागा असेल का असा प्रश्न मनात येतो.
अमेरिकेत येईपर्यंत ख्रिश्चन धर्माबद्दल आणि त्यातल्या विविध पंथ / प्रवाहांबद्दल माझं सामान्यज्ञान यथातथाच होतं. भारतात असताना कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट अशा दोन ढोबळ नावांखाली सारा ख्रिश्चन धर्म विभागला जायचा. खाली केरळात, सिरियन ख्रिश्चन असा काही प्रकार असल्याचं ऐकून माहीत होतं. अमेरिकेत बहुतांश लोक ख्रिश्चन असतील एवढीच कल्पना होती आणि अत्याधुनिकता आणि प्रागतिकतेच्या शिखरावर असलेल्या या देशात, येशु ख्रिस्तापुढे गुडघे टेकायला लोकांना फारशी फुरसद मिळत असेल, असं वाटलं नव्हतं. किंबहुना व्हॅलेंटाईन डे, इस्टर आणि हॅलोवीन सारख्या पूर्णपणे व्यापारी (बाजारू) पद्धतीने साजर्या होणार्या दिवसांप्रमाणे, ख्रिसमसचे देखील सॅंटाक्लॉज हेच मुख्य आकर्षण असेल आणि येशु आपला नावापुरता हजेरी लावून जात असेल, अशी माझी समजूत होती.
अमेरिकेत आलो आणि कनेक्टिकटच्या हार्टफोर्ड शहरातून बस पकडून, स्टोर्स या निमग्रामीण भागातल्या, छोट्याश्या गावातल्या, युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकटच्या कॅंपसमधे जाऊन पोहोचलो. बसमधून उतरताच पहिली गोष्ट नजरेत पडली ती म्हणजे कॅंपस्च्या मधेच असलेलं पांढरं शुभ्र चर्च. स्टोर्स हे कनेक्टिकटच्या साधारण मध्यवर्ती भागातलं एक युनिव्हर्सिटी टाऊन. लॅंड ग्रॅंट युनिव्हर्सिटी (Land Grant University) असल्यामुळे, सरकार कडून मिळालेली ग्रामीण भागातली भरपूर जमीन. त्यावर १८८७ साली सुरू झालेल्या एका छोट्या शेतकी कॉलेजचे वाढत वाढत आज एक मोठे अद्ययावत विद्यापीठ झाले आहे. स्टोर्स गावाची वस्ती २५-३० हजार. बहुतेक सगळे विद्यापीठातील विद्यार्थी, प्रोफेसर्स किंवा इतर कर्मचारी वर्ग. कॅंपसच्या मधून जाणारा यु.एस. १९५ हा मोठा वहाता रस्ता. त्याच्या एका बाजूस मुख्य कॅंपस आणि बहुतेक सारी डिपार्टमेंट्स. रस्त्याच्या दुसर्या बाजूला आमचं शेतकी कॉलेज. शेती, पशुपालन, नैसर्गिक साधन संपत्ती वगैरे विषयांचा समावेष असल्यामुळे शेतकी कॉलेजला, विद्यापीठातील इतर कॉलेजेस पासून थोडं वेगळं आणि दूरच ठेवलं होतं. त्यात जनावरांचे फार्मस्, शेती अवजारांच्या शेड्स, ग्रीन हाऊसेस, घोडेस्वारीसाठी राखीव मैदान वगैरे गोष्टींमुळे एका बाजूचा थोडासा टेकड्यांचा आणि झाडाझुडपांनी आच्छादलेला, असा मोठा विभाग शेतकी कॉलेजच्या वाट्याला आला होता.
शेतकी कॉलेजच्या पुढ्यातूनच यु.एस. १९५ हा मोठा रस्ता जायचा आणि कॉलेजच्या कोपर्यावरच हे जुनं पण सुंदरसं चर्च होतं. दिवसभरात कधीतरी त्याचा गंभीर घंटानाद ऐकू यायचा आणि शनिवार, रविवारी लॅबमधे किंवा फार्मवर जाताना, ऑर्गनचे सूर कानावर पडायचे. रविवारी सकाळी विद्यापीठाच्या पोलीस दलातील एखादा पोलीस ऑफिसर चर्चच्या समोर आपली लाल निळ्या दिव्यांची गाडी लावून उभा रहायचा आणि येणार्या जाणार्या गाड्या हाताने थांबवून, चर्चमधे जाणार्या लोकांना रस्ता ओलांडायला मदत करायचा. आमच्या कॉलेजच्या मागच्या टेकडीवर गायांना चरायला सोडायचे. त्या टेकडीवर जाऊन बसलं की सारा कॅंपस दिसायचा. त्यात जुन्या व्हिक्टोरियन शैलीमधल्या सुबक आणि देखण्या बैठ्या इमारतींमधे दूरवरचा गॅम्पेल पॅव्हेलियन (UCONN चं Indoor Basketball Stadium) आणि पुढयातला चर्चचा पांढरा शुभ्र कळस उठून दिसायचे.
युनिव्हर्सिटीच्या कॅंपसमधलं पांढरं देखणं चर्च हे न्यू इंग्लंडमधल्या चर्चेसचा एक नमुना होतं. न्यू इंग्लंडमधील (अमेरिकेच्या ईशान्य भागातली राज्ये) बरीचशी, विशेषत: छोट्या गावांतील चर्चेस एका विशिष्ट धाटणीची होती. पांढरा स्वच्छ रंग, निमुळतं होत जाणारं शिखर, एखाद्या ग्रीक शैलीतल्या इमारतीसारखे चर्चच्या प्रवेशद्वारापाशी असणारे पांढरे उंचच उंच खांब, एखादा छोटासा बेल टॉवर आणि त्यात असणारी घंटा. ही सारी चर्चेस तशी छोटीशीच. लहान गावातल्या आणि आसपासच्या वस्त्यांवरच्या थोड्याफार लोकांना पुरतील अशी.
— डॉ. संजीव चौबळ
Leave a Reply