नवीन लेखन...

अमेरिकेतील धार्मिकता – भाग ५

Religions in America - Part 5

इंग्लंड आणि इतर उत्तर युरोपियन देशांतले लोक, अमेरिकेच्या पूर्व / ईशान्य किनारपट्टीवर (न्यू इंग्लंड) वसाहती स्थापन करण्याच्या प्रयत्नात असताना, सोळाव्या शतकाच्या मध्यापर्यंत, स्पॅनिश मुसाफिरांनी (explorers) अमेरिकेचा बहुतांश दक्षिण आणि नैऋत्य भाग धुंडाळून काढला होता. सोन्या चांदीच्या लालसेने काढलेल्या या मोहीमा हात हलवत परत फिरल्या होत्या. या धाडसी मुसाफिरांनंतर, काही काळातच, स्पॅनिश कॅथलिक मिशनरी अमेरिकेतल्या दक्षिण भागात पोहोचू लागले. अमेरिकेतल्या रेड इंडीयन लोकांच्या टोळ्यांना आपल्या ख्रिश्चन धर्मात ओढण्याचा चंग बांधून, हातात बायबल आणि ओठांवर येशुचा संदेश घेऊन, हे मिशनरी येऊ लागले. अमेरिकेत येऊन त्यांनी आपले मठ (missions) बांधायला सुरुवात केली. त्याकाळी जमिनीवरचा बहुतेक प्रवास पायी चालतच होत असल्यामुळे, साधारणपणे एका दिवसात कापता येईल एवढ्या अंतरावर त्यांनी हे मठ बांधायला सुरुवात केली. सध्या जो भाग फ्लोरिडा म्हणून ओळखला जातो, त्या प्रदेशात सुरू झालेली ही मठांची मालिका, पश्चिमेकडे सरकत सरकत, सध्याच्या टेक्सास, अ‍ॅरीझोना, न्यू मेक्सिको राज्यांपर्यंत पसरली. सन १७६९ मधे, कॅलिफोर्नियामधला पहिला स्पॅनिश कॅथलिक मठ सुरू झाला. त्या मठाच्या ठिकाणी पुढे जे शहर वसलं, ते शहर आजही त्या मठाचं नाव मोठ्या अभिमानाने मिरवत आहे – सॅन डियॅगो.

या सार्‍या मठांचा एक ठरावीक साचा असायचा. मठाच्या आत छोट्या छोट्या इमारती असायच्या. त्यात मिशनरींची त्याच प्रमाणे स्थानिक रेड इंडियन लोकांची देखील रहाण्याची व्यवस्था असायची. मठाच्या आवारात चर्चच्या जोडीलाच शाळा, कार्यशाळा (work shop), दवाखाना देखील असायचे. आवाराच्या भोवती चांगली दगडी भिंत बांधून सुरक्षिततेची व्यवस्था केलेली असायची. मठाच्या प्रांगणाच्या बाहेर रेड इंडियन्स शेती भाती करायचे. मठाच्या आत त्यांना अन्न, वस्त्र, निवार्‍याबरोबरच कॅथलिक पंथाचे बाळकडू मिळायचे. बरेचदा मठांच्या दिमतीला असलेला शस्त्रसज्ज फौजफाटा हे देखील एक आकर्षण असायचे. त्यामुळे मठाच्या आश्रयाला आलेल्या रेड इंडियन लोकांच्या टोळ्यांना, प्रतिस्पर्धी टोळ्यांपासून आपसूकच संरक्षण मिळायचे. अमेरिकेतील रेड इंडियन्स, जुन्या जगातील लोकांच्या कधीच संपर्कात आले नसल्यामुळे, कित्येक रोगांपासूनदेखील ते पूर्णपणे सुरक्षित होते. त्यामुळे युरोपियनांच्या आगमनाबरोबर आलेल्या रोगराईला, रेड इंडियन टोळ्यांकडे काही उत्तर नव्हते. त्यामुळे या युरोपियन रोगराईवर काही वैद्यकीय उतारा मिळावा ही देखील मठाकडून अपेक्षा असायची. परंतु स्पेनची तशी अमेरिकेवर कधीच घट्ट पकड नव्हती. एवढ्या मोठ्या पसरलेल्या प्रदेशाचा ताबा ठेवणे त्यांना कठीण जाऊ लागले. रोगराईला बळी पडणार्‍या रेड इंडियन्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच होती. काही मठांवर आसपासच्या लोकांचे हल्ले वाढू लागले होते. हळू हळू या त्रासामुळे हे मठ बंद पडू लागले आणि एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत बहुतेक सारे मठ बंद झाले होते.

ख्रिश्चन धर्मातल्या अनेक पंथांपैकी एक म्हणजे मॉरमन्स. जोसेफ स्मिथ नावाच्या एकोणीसाव्या शतकातल्या एका गुरुचे हे अनुयायी. सुरवातीच्या काळात यांच्यात असलेल्या बहूपत्नीकत्वाच्या चालीमुळे, या लोकांना समाजात थारा मिळेनासा झाला. त्यामुळे आपल्या अनुयायांना घेऊन जोसेफ स्मिथ भटकत भटकत युटाह राज्यातल्या सॉल्टलेक सिटीला पोहोचला. तिथे त्यांना विशेष त्रास झाला नाही आणि मग हा पंथ तेथेच विसावला. आज देखील तेच त्यांचे प्रमुख वसतिस्थान आहे.

आम्ही सू सेंटरला रहायला आल्यावर काही दिवसातच आमची जीम आणि क्रिस्तीन व्हाईट नावाच्या अमेरिकन कुटुंबाशी ओळख झाली. त्यांचं आणि आमचं थोड्या दिवसांतच चांगलं जमलं. त्यांची तीन मुलं आणि सिद्धार्थ एकाच वयोगटातले असल्यामुळे, आमचं एकमेकांकडे बरच जाणं येणं व्हायचं. हे कुटुंब आयोवातल्याच दुसर्‍या एका गावाहून सू सेंटरला आले असल्यामुळे, त्यांची देखील गावात फारशी कुणाशी ओळख नव्हती. त्यामुळे हा समसमा संयोग झाला असावा अशी आमची समजूत होती. क्रिस्तीनने एकदोनदा सुरवातीलाच “आम्ही मॉरमन्स आहोत”, असं सांगून सूतोवाच केलं होतं. आम्हाला काहीच माहिती नसल्यामुळे आम्हाला काहीच फरक पडत नव्हता. त्यांची मैत्री हीच आमच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट होती. पण पुढे पुढे हे कुटुंब इतर अमेरिकन लोकांच्या फारसं जवळ जात नाही, असं आमच्या लक्षात आलं. कधी तरी ऑफिसमधे बोलताना, त्यांचा उल्लेख करताना, मी ते मॉरमन्स आहेत असं म्हणालो. आजूबाजूंच्या लोकांचे चेहरे लगेच बदलले. शेवटी शारलेटने जणू सगळ्यांच्या भावनांना शब्द दिले, “मॉरमन लोकांची सावली देखील आम्ही आमच्या दरवाज्यात पडू देत नाही”. हे ऐकून मी तर सर्दच झालो. हे मॉरमन्स म्हणजे अमेरिकेतले अस्पृश्य वगैरे आहेत की काय, असा मला प्रश्न पडला. आता अर्थातच त्यांच्यात बहूपत्नीकत्वाची चाल खूपच कमी झाली आहे.

पुढे मग २००८ साली, टेक्सास राज्यातल्या अशाच एका पंथाची टी.व्ही.वर खूपच मोठी बातमी आली होती. या पंथात देखील बहुपत्नीकत्वाची चाल होती आणि चौदा पंधरा वर्षांच्या लहान मुलींचं मोठमोठ्या माणसांशी लग्न लावलं जायचं. या पंथाच्या तथाकथित गुरुची आपल्या अनुयायांवर जबरदस्त जरब होती. सारा समुदाय एखाद्या मेंढ्यांच्या कळपासारखा एका बंदिस्त आवारात जगत होता आणि बाहेरच्या जगाशी त्यांचा संबंध येणार नाही, याची काळजी घेतली जायची.

— डॉ. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..