पेनसिल्व्हेनियामधे आमिश लोक दिसायचे. पेनसिल्व्हेनियाच्या दक्षिण भागात या लोकांची मोठी संख्या आहे. या पंथातले लोक आधुनिकतेला शक्यतो दूर ठेवणारे. हे लोक आपल्या फार्मवर राहून, अगदी जुन्या काळासारखं, घोड्यांना नांगर लावून शेती करणारे. आधुनिक तंत्रज्ञानाशी त्यांचे वाकडे. त्यामुळे ट्रॅक्टर वगैरे वापरणे दूरच, गाड्यादेखील वापरायच्या नाहीत. हे वापरणार घोड्यांच्या बग्ग्या.
या भागातून जाताना हायवेवर देखील या आमीश लोकांच्या बग्ग्यांची चित्रे लावलेले सूचनाफलक दिसतात. रस्त्यावरून जाणार्या काळ्या रंगांच्या या घोड्यांच्या बग्ग्या बघून, मोटारी आपला वेग कमी करून बाजूने निघून जातात. यांच्या घरात देखील अद्ययावत उपकरणे सापडायची नाहीत. घरात ना रेडिओ ना टेलीव्हीजन ना कंप्युटर. त्यामुळे बाहेरच्या जगाशी संपर्क नाही. स्वयंपाक करणार तो जुन्या पुराण्या भांड्यांमधे. यांची गावं जवळ जवळ पूर्णपणे स्वयंपूर्ण असतात. फर्निचर गावातच बनवलं जातं. कपडे गावातच शिवले जातात. कुणाचं घर किंवा गोठा बांधायचा असला की गावातले बाप्ये एकत्र येऊन सारं काही हातानं बांधणार. यांची मुलं शाळेत जाणार ती देखील गावातल्या शाळेतच – जिथे त्यांना फक्त त्यांच्या पंथाविषयीच शिक्षण मिळणार.
बाहेरच्या जगाबद्दल, आधुनिक सुधारणांबद्दल या मुलांच्या मनात एक प्रचंड मोठ्ठा बागुलबुवा निर्माण केला जातो. मग ही मुलं सोळा, सतरा वर्षांची झाली की त्यांना काही ठरावीक काळापुरतं बाहेरच्या जगात जायला दिलं जातं. आयुष्यात कधी फारसा बाहेरच्या जगाचा वारा न लागलेली ही मुलं, मुली, असं अचानक मुक्त जगात पाऊल टाकल्यावर किती भांबावून जात असतील, याची कल्पनाच केलेली बरी. मग हा बाहेरच्या जगाचा अनुभव घेऊन ही मुलं परतली, तर ती कायमची त्या आमीश जगाची होऊन जातात. स्वखुषीने ही मुलं ह्या आजन्म कारावासात रहाणं पसंत करतात. काही थोडी मुलं बाहेरचा वारा लागला की ते स्वतंत्र, मुक्त आयुष्य जगण्यास उत्सुक होतात. एकदा का या मुलांनी बाहेरच्या जगात रहायचा मार्ग स्वीकारला की त्यांच्यासाठी आमीश जगाचे दरवाजे कायमचे बंद! मोठा विचित्र आणि तेवढाच करूण असा हा प्रकार आहे.
हे लोक आपल्या शेतातला ताजा भाजीपाला, दूध, घरी बनवलेले चीज वगैरे वस्तू, आपल्या घोड्यांच्या बग्ग्यांमधे लादून, जवळपासच्या गावांमधे विकण्यासाठी जातात. कधी आठवड्यातून, महिन्यातून काही गरजेच्या गोष्टी घेण्यापुरते ते बाहेरच्या जगात जातात. पुरुषांचे साधे सुधे काळे कपडे, काळ्या टोप्या आणि वाढवलेल्या दाढी मिशा, बायकांचे अगदी जुन्या पद्धतीचे पायघोळ झगे, मुलांचे देखील असेच जुन्या वळणाचे, अजिबात फॅशनचा स्पर्श न झालेले कपडे, यामुळे हे लोक गर्दीतही चटकन लक्षात येतात. बायका मुली अजिबात मेकप करत नाहीत. या मुला मुलींच्या निरागस डोळ्यांत एकाच वेळी भयंकर कुतूहल आणि काहीसं कारुण्य बघून पोटात गलबलायला होतं.
— डॉ. संजीव चौबळ
Leave a Reply