नवीन लेखन...

अमेरिकेतील धार्मिकता – भाग ७

Religions in America - Part 7

अमेरिकेच्या पहिल्या तेरा वसाहतींमधे प्रामुख्याने प्रॉटेस्टंट लोकांचा भरणा होता. वर उल्लेखल्याप्रमाणे, या सुरवातीच्या काळात अमेरिकेस जाणार्‍या लोकांमधे, युरोपातील जाचक धार्मिक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी पळ काढणार्‍या लोकांचे प्रमाण मोठे होते. त्यामुळे १७७६ साली अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध सुरू होईपर्यंत अमेरिका हा प्रामुख्याने प्रॉटेस्टंट पंथीय देश होता. यात प्रामुख्याने इंग्लंड आणि उत्तर युरोपीयन देशातल्या लोकांचा समावेश होता. यात अ‍ॅंग्लीकन, बॅप्टीस्टस, कॅल्व्हीनीस्टस, प्युरीटन्स, प्रेसबीटेरियन, लुथर्न, क्वेकर्स, आमीश, मेथॉडीस्ट, मोरव्हारियन या प्रवाहातील लोकांचा भरणा होता. पुढे आयर्लंडमधल्या भयानक दुष्काळानंतर, तिथल्या गरीबी आणि उपासमारीला कंटाळून मोठ्या प्रमाणावर आयरीश लोक अमेरिकेत येऊ लागले. आयरीश, इटालियन, पोलिश, फ्रेंच, स्पॅनिश, हंगेरियन, जर्मन निर्वासीतांनी त्यांच्या बरोबर त्यांचा रोमन कॅथलिक पंथ अमेरिकेत आणला. पुढे हिस्पॅनिक (मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील स्पॅनिश भाषा बोलणार्‍या देशांतील लोक) लोकांबरोबर, कॅथलिक पंथीयांची भरच अमेरिकेत पडत गेली. ग्रीक, रशियन व इतर पूर्व आणि मध्य युरोपीयन देशांतील लोकांनी अमेरिकेत आपल्याबरोबर ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन पंथाची परंपरा आणली.

गेल्या ५० वर्षांत, एशियन लोकांचे अमेरिकेतील प्रमाण आणि त्याचबरोबर मुस्लिम, हिंदू आदि धर्मियांचा विस्तार, हळू हळू का होईना पण होऊ लागला आहे. अशा प्रकारे एकीकडे अमेरिकेतली लोकसंख्या वाढत चालली आहे तर त्यातील प्रॉटेस्टंट पंथीयांचे प्रमाण कमी होत चालले आहे. अगदी अलीकडे म्हणजे १९७२ ते १९९३ या काळात देखील प्रॉटेस्टंटांचे अमेरिकेतील प्रमाण ६३% होते. ते २००२ साली ५२% झाले. २००६ च्या सुमारास, अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच, प्रॉटेस्टंटांचे प्रमाण एकंदर ख्रिश्चनांमधे ५०% हून कमी झाले असावे असा अंदाज आहे. आज प्रॉटेस्टंटांच्या २०० हून अधिक शाखा-उपशाखा झालेल्या आहेत; त्यातील सदर्न बॅप्टीस्ट्स ही सर्वात मोठी. त्यामानाने कॅथलिकांमधे फारसे फाटे न फुटल्यामुळे, कॅथलीक्स हे आज अमेरिकेतील ख्रिश्चनांमधला सर्वात मोठा एकसंध प्रवाह (२४%) झालेले आहेत.

थोडक्यात ढोबळमानाने अमेरिकेची आजची धार्मिक विभागणी ही अशी आहे :-

कॅथलिक २३.९%
प्रॉटेस्टंट बॅप्टीस्ट (सर्व शाखा मिळून) १७.२%
इतर प्रॉटेस्टंट ३४.१%
इतर धर्मीय / विचार धारा ८.८%
(कुठल्याच धार्मिक संकल्पनेवर विश्वास नसलेले) १६.१%

याचाच अर्थ असा की :-

अमेरिकेतले निम्मे लोक प्रॉटेस्टंट आहेत.
दर सहावा अमेरिकन बॅप्टीस्ट आहे.
दर चौथा अमेरिकन कॅथलिक आहे.
दर चौथा अमेरिकन हा इतर धर्म/पंथाचा किंवा कुठल्याच धर्मसंकल्पनेवर विश्वास न ठेवणारा आहे.

भौगोलिक दृष्ट्या पहायला गेलं, तर अमेरिकेच्या नॉर्थ ईस्टमधे (जिथे आयरीश आणि इटालियन लोकांचे प्राबल्य आहे), सुमारे ४०% लोक रोमन कॅथलिक आहेत. दक्षिणेकडच्या राज्यांमधे प्रॉटेस्टंट लोकांचे प्रमाण खूप आहे आणि त्यात देखील सुमारे ४०% लोक सदर्न बॅप्टीस्ट या विशिष्ट प्रॉटेस्टंट शाखेचे उपासक आहेत. अमेरिकेचा नॉर्थ वेस्ट भाग हा पूर्वापार कमीत कमी धार्मिक असा भाग आहे. तुलनाच करायची झाली तर दक्षिणेकडच्या राज्यांमधले ८६% लोक देवावर विश्वास ठेवणारे आहेत तर पश्चिमेकडे हेच प्रमाण ५९% आहे. त्यामुळेच अमेरिकेतल्या दक्षिणेकडच्या या धार्मिक राज्यांना एकत्रितपणे “बायबल बेल्ट” असे संबोधले जाते.

— डॉ. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..