दुसर्या महायुद्धानंतर, इंग्लंड आणि इतर युरोपियन देश, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलंड या प्रगत आणि प्रामुख्याने ख्रिश्चन देशांमधे धार्मिकतेचा प्रभाव कमी होत गेलेला दिसतो. परंतु अमेरिका मात्र आपल्या धार्मिकतेला सोडायला तयार नाही असे वाटते. आजदेखील एकंदर प्रगत राष्ट्रांचा विचार करता, केवळ आयर्लंड आणि पोलंड या दोन देशांचा अपवाद सोडला, तर अमेरिका हा सर्वाधिक धार्मिक देश आहे. आजच्या आधुनिक प्रगत युगामधे, धार्मिकतेचा प्रभाव कमी होऊन, विज्ञान, तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढावा हे साहजिकच आहे. परंतु अमेरिकेसारख्या अतिप्रगत देशातील धार्मिकतेचा प्रभाव बघून नवल वाटतं. अगदी अलीकडे म्हणजे २००३ साली देखील, एका सर्वेक्षणानुसार ६०% अमेरिकन्सच्या मते धार्मिकतेला त्यांच्या जीवनात अतिशय महत्वाचे स्थान होते. तुलनेने केवळ २८% कॅनेडियन्स आणि अवध्या १७% ब्रिटीशांनी त्यांच्या जीवनात धार्मिकतेला एवढे महत्व दिले होते.
त्यातदेखील विशेष म्हणजे, अमेरिकन धार्मिकता ही जुन्या विचारांना मानणारी अशी आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर २००४ सालच्या एका सर्वेक्षणानुसार, अमेरिकेतल्या ख्रिश्चनांपैकी सुमारे ६०% लोक, पुरातन काळातल्या प्रलयाच्या आणि नोहाने आपल्या बोटीत पशु पक्षांच्या एक एक जोडीला घेऊन वाचवल्याच्या (आपला पुराण काळातील प्रलय आणि मनुची गोष्ट) गोष्टीवर किंवा मोझेसने तांबडा समुद्र दुभागून आपल्या अनुयायांना समुद्रातून चालत जायला मदत केली, अशा गोष्टींवर गाढ विश्वास ठेवून आहेत. २००५ सालच्या अशाच एका सर्वेक्षणात, ५१% अमेरिकनांनी, देवाने माणूस आहे त्याच स्वरूपात निर्माण केला, असं ठामपणे सांगितलं. सुमारे ३०% लोकांनी, माणूस उत्क्रांत होत गेला परंतु देवाने ही उत्क्रांती घडवून आणली, असं मत मांडलं. तर फक्त १५% लोकांनी, मानव हा इतर प्राण्यांप्रमाणेच उत्क्रांत होत गेला आणि यात देवाचा काहीही हस्तक्षेप नाही, असं मत मांडलं.
परंतु या एकेकाळच्या धार्मिक/देवभोळ्या अमेरिकेमधे देखील हळू हळू नवीन विचारांचे वारे वाहू लागले आहेत. आता आता पर्यंत सुमारे ८७% ख्रिश्चन असलेल्या अमेरिकेमधे, २००१ साली हेच प्रमाण ७६% वर आलं होतं. २००७ साली ते आणखी घसरून ७१% वर आलं. ख्रिश्चन लोकसंख्या कमी होण्याचा हा वेग वर्षाला साधारण ०.९% एवढा आहे. या वेगाने साधारणपणे २०४२ सालापर्यंत अमेरिकेत ख्रिश्चन अल्पसंख्यांक होऊन जातील.
२००९ सालच्या एका सर्वेक्षणानुसार आणखीनच धक्कादायक माहिती हाती आली आहे. १९९० साली, कोणत्याही धार्मिक संकल्पनेशी निगडीत नसलेले अमेरिकन्स ७% होते तर २००९ सालापर्यंत त्यांचे प्रमाण वाढून १५% झाले होते. पूर्वीपासून अमेरिकेचा नॉर्थवेस्ट हा भाग कमी धार्मिक म्हणून प्रसिद्धच होता. पण या सर्वेक्षणानुसार, प्रथमच नॉर्थईस्टमधे कोणत्याही धर्माला न मानणार्या लोकांची संख्या वाढली आहे. नॉर्थईस्ट म्हणजे अमेरिकेच्या धार्मिकतेचा पाया. हा धार्मिक पायाच आता ढासळायला लागला आहे, असे या सर्वेक्षणानुसार वाटते.
अमेरिकेच्या धार्मिकतेचा विचार करताना, ख्रिश्चन धर्माव्यतिरिक्त इतर धर्मांचा देखील थोडा विचार करायला हवा. २००७ सालच्या एका अहवालानुसार, अमेरिकेत इतर धर्मियांमधे, १.७% मॉरमन्स, १.७% ज्यू, ०.६% मुस्लिम आणि ०.४% हिंदू होते. २००८ सालच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीमधे रिपब्लीकन पक्षातर्फे उभे राहिलेले, मॅसेच्युसेटस राज्याचे भूतपूर्व गवर्नर मिट रॉमनी हे एक मॉरमन आहेत आणि निवडणूकीमधे, त्यांच्या प्रचारांच्या मुद्द्यांव्यतिरीक्त त्यांची धार्मिक धारणा देखील विचारात घेतली गेली होती, हे ध्यानात घेण्यासारखे आहे.
आज अमेरिकेत सुमारे ३५० हिंदू देवळे आहेत, ज्यातील बहुतेक सारी गेल्या तीन दशकांतली आहेत. यांतली काही, पूर्णपणे अगदी पाया खणण्यापासून बांधली गेलेली आहेत तर काही, जुन्या चर्चेसमधे फेरफार करून देवळांमधे बदलली गेली आहेत. मोठमोठ्या शहरांतली भव्य देवळे, त्यांचे स्थापत्यशास्त्रीय बांधकाम, कलात्मक सजावट, त्यांतील धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहून तर, आपण अमेरिकेत आहोत यावर विश्वास ठेवणंच मुश्कील होउन जातं.
— डॉ. संजीव चौबळ
Leave a Reply