तुम्ही म्हणाल काय बाई सपाटा लावला हिने…लिखाणाचा ऐकवर एक लिहीतच बसते की काय….दुसरे काही काम आहे की नाही…
पण काय करू व्यक्त व्हावेसे वाटले की मी व्यक्त होते….मग तुम्ही काहीही म्हटले तरीही चालेल…..
आज पुन्हा आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलणारे मन लिहून मोकळे करणार आहे ..माझे माहेर अमरावती जिल्हा त्यातील खेडेगाव सातेगाव…. सधन समृध्द गाव. शेती छान पिकत होती.निसर्गाची साथ होती….
गावात रामदास नावाचे कासार होते ..ते गल्लोगल्ली बांगडी, बिल्लोर म्हणून आवाज द्यायचे …मग त्यांना आवाज दिला की ते घरी येऊन….बांगड्या हातात भरून देत असत.. विविध रंगी बांगड्या काय मन मोहून घ्यायच्या म्हणून सांगू…..रामदास दादांचा स्वभाव खूप मिश्किल होता.सदोदित चेहऱ्यावर हास्य.. पीळदार मिशी,पांढरे धोतर,शर्ट पांढरी टोपी….सडपातळ बांधा असा वेष ,पण बोलण्यात पटाईत…..
आईला काचेच्या बांगड्यांची खूप हौस होती … सण वार कुणी पाहूनी बाई आल्या की त्यांना खास निमंत्रण जायचे….मग भला मोठा त्यांचा लाकडी स्टँड त्यात लटकत असलेल्या,विविध बांगड्या बघून आवडीने हातात भरणे…..अजून आवडल्या तर पेपर मध्ये पॅक करून घेणे…. भारी वाटायचे….
घरात लग्नकार्य असले की काही विचारूच नका …सर्व घरातील बायका मुली आलेल्या पाहुण्या बांगड्या भरण्याचा सोहळा पाट टाकून भोवती रांगोळी काढून…..प्रथम नवरी,म्हणजेच नववधू, हिरवाकंच रेशीम चुडा हातभर खुलून दिसत असे…..नंतर वरमाय,करवली,असे नंबर लागत…..हातात बांगड्या भरून झाल्या…की बांगड्याच्या पाया पडायचे….
खेडेगावात आपुलकी राहायची.गावात बारा बलुतेदार कुंभार ,चांभार,लोहार शिंपी , रंगारी,गुरव,न्हावी,मिस्त्री,सुतार, त्यातीलच कासार असत..सगळी मिळून मिसळून मदत करीत…शेतातील नवीन धान्य आले की थोडा वाटा,यांच्या घरी पोहचता होई….सर्वांना गावातील कामे मिळत….प्रत्येकाला त्याचा त्याला मान दिला जायचा…. कुठेतरी काहीतरी हरवत गेले ह्याचीही मनाला चुटपुट लागते…..हातभर काचेच्या बांगड्या सणवारशिवाय लग्नकार्य शिवाय,आता कुणी घालत नाही.. बदल होत गेले.होतच राहणार….
भरगच्च हातभार बांगड्या प्रत्येकीच्या हातात खुलून दिसत….लहान मुलीपासून बांगड्या भरणे कार्यक्रम होता होता…कधी संध्याकाळ होई कळत नसे….घरात छोटी मुलगी असली की तिचे लग्न होईपर्यंत तशाच म्हणजे तिच्या बांगड्यांचे पैसे घ्यायचेच नाही…मग तिच्या लग्नात…कासार दादा,त्यांची बायको यांना मानाने बोलावून….त्यांचा आहेर म्हणजे सर्व कासार दादा यांना पूर्ण पोशाख टोपी भरजरी उपरणे,ताईना साडी चोळी , त्यांना पण हातभरून बांगड्याचे पैसे, त्यांच्या मुलांना पण नवीन कपडे…किती जाण असायची समाजातील लोकांची…वेगळाच जिव्हाळा,आपुलकी…गावात खेळी मेळीचे वातावरण असायचे.. आपले गाव होते.तुझे माझे शब्द नव्हतेच…
लहानपणापासून आम्ही लग्न होईपर्यंत कासार दादांना बघत आलो….आई आजी,काकू, आत्या सर्वच ह्यांच्या कडून हातात बांगड्या भरून घेत असत.. बांगड्यांची नावे पण अनारकली, डाळींबी, चांदणी, अशी थोडी फार आठवतात…नंतर ही माहेरपणाला गेले की बांगड्या भरणे व्हायचेच…. मग मला मुलगी झाली… तीला पण घेऊन मी माहेरी गेले की दहा बारा वर्षाची होईपर्यंत तिला पण हात भरून बांगड्या आनंदाने भरून देत असत….नंतर बरेच अंतर पडत गेले….काळाच्या ओघात आई,दादा आता राहिले नाहीत….लेकीला चोळी बांगडी रीत रिवाज हळूहळू कमी होत गेले…..कुणी आपल्या घरी दुसऱ्या गावावरून पाहुणी आली की…तिला न्हाऊ माखू घालणे ,गोडाचे जेवण, चोळी बांगडी….हातभार बांगड्या भरून च,पाठवले जायचे आता जास्त जाणे होत नाही सातेगावला ,पण आठवणीत राहिलेली ही काही दिलदार बोलघेवडी माणस प्रेमाची…..आठवणीतील रेशीम गाठी निघतात,आणि असे लिखाण होते…अशी माणसे मनात राहिलेली त्यांची आठवण येत राहते……आणि मी पण बाल होऊन माझ्या बालपणात जाऊन मस्त जगून घेते…..
आशा देशमुख चव्हाण,
पुणे
Leave a Reply