ज्ञानपीठविजेत्या कुसुमाग्रजांचा जन्म पुण्यातील आहे, खुद्द कुसुमाग्रजांनाही माहिती नव्हती. पण त्यांच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या (कै.) निळकंठ बापू गोडबोले यांनी ते शोधून काढले. एवढेच नव्हे तर कुसुमाग्रजांना येथे आणून त्यांचा सत्कारही केला. २२ वर्षांपूर्वीचा हा प्रसंग अद्याप आपल्याला आठवतो आहे,” असे गोडबोले यांचे चिरंजीव अरविंद गोडबोले सांगतात. ते म्हणतात, “”माझे वडील सराफी व्यवसाय करीत होते. बी.ए.पर्यंत शिकलेल्या वडिलांना लेखनाचीही आवड होती. त्यांचे लेखन तपासण्यासाठी ते कुसुमाग्रजांकडे पाठवून देत. त्यातून त्यांचा चांगलाच परिचय झाला होता. कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर छापून आलेल्या बातमीत, त्यांचा जन्म पुण्यात झाल्याचा उल्लेख होता. यातून माझ्या वडिलांना उत्सुकता निर्माण झाली. याबद्दल त्यांनी कुसुमाग्रजांकडेही चौकशी केली. मात्र, त्यांनाही जन्मस्थान नेमके माहिती नव्हते. त्या ठिकाणी राहणाऱ्या जुन्या लोकांची नावे शोधून काढली. त्यांना प्रत्यक्ष भेटून अधिक माहिती घेतली. तेव्हा सदाशिव पेठेतील घर नंबर १२६४ हेच कुसुमाग्रजांचे जन्मस्थान असल्याचे सबळ पुरावे त्यांच्या हाती लागले. पूर्वी तेथे लिमये वाडा होता. नंतर बळवंत सदन झाले. सध्या शुभम नावाची इमारत तेथे उभी आहे. जन्मस्थानाचा शोध लागल्यावर भारावून गेलेल्या माझ्या वडिलांनी कुसुमाग्रजांना याची माहिती देऊन त्यांना येथे बोलावून घेतले. जुलै १९८९ मध्ये कुसुमाग्रज येथे आले. परिसरातील लोकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. ते पाहून कुसुमाग्रजही भारावून गेले होते.”
नाशिकला तात्यासाहेबचे राहते घर दुरुस्तीसाठी पाडण्यात आले तेव्हा त्यांच्या मित्रांनी त्यांना राहायला स्वतंत्र बंगला दिला होता. सोबत एक मोटारगाडीही होती. तात्यासाहेब संध्याकाळी गाडीतून एक फेरफटका मारून येत. मोटारीने प्रवास करणे आवडे ; कारण निसर्गाचे दर्शन घडते. असे ऐकले होते की यशवंतराव चव्हाणांनी तात्यासाहेबांना एकदा दिल्लीचे निमंत्रण दिले विमानाचे तिकीट पाठवणार असल्याचे कळवले. तात्काळ तात्यासाहेबांनी उत्तर दिले, ” विमानाचे तिकीट नको. आम्ही मोटारीने येऊ. ” तात्यासाहेबांनी भारतभर प्रवास केला तो मोटारीतूनच. प्रेक्षणीय स्थळांपेक्षा तेथली माणसे, बाजारहाट, तेथली माती, झाडे, पक्षी यांचे आकर्षण अधिक वाटे. त्यांची वस्ती असायची डाकबंगल्यात. कारण कुणाच्या घरी राहणे म्हणजे बांधिलकी आणि हॉटेलात राहाणे म्हणजे कृत्रिम आतिथ्य व येणा-या जाणा-यांची सतत वर्दळ.
एक गोष्ट कुसुमाग्रजांनी मराठी साहित्याला दिली.
ती म्हणजे अलौकिक भाषासौंदर्य. मराठी भाषेचे इतके सुंदर रूप क्वचित पाहायला मिळते. अशा पातळीला भाषा सांभाळून निसर्गातील कोणतीही सूक्ष्मातिसूक्ष्म वा भव्यातिभव्य घटना सादर करणे हे शक्य असल्याचे त्यांनीच दाखवून दिले.
कुसुमाग्रज हे त्यामुळेच मराठीभाषेच्या साहित्यप्रवासातील एक अद्वितीय हिल स्टेशन म्हणावे लागेल, जेथे पोचल्यावर अथवा जेथून पुढे जाताना आपले मन सुंदर झालेले असते.
हे एका माणसाने एका भाषेला दिलेले दान!
सेवामहर्षी बाबा आमटेंवर मा.कुसुमाग्रजानी केलेली कविता
अरे, आम्ही आहोत असे करंटे
की आमच्या पेठेत लागतात पताका
फक्त मंत्री आले तर
आणि तुझ्यासारखे संत
ऐहिकाच्या प्रपंचातील ईश्वरी अंशाचे रखवालदार
निघून जातात गस्त घालीत
अंधारात
उद्ध्वस्त मनाच्या मोहल्ल्यातून
आसवांच्या दलदलीतून दुःखाने उसवलेल्या दुनियेवर
अमृताचं सिंचन करीत
एकदा मा.पुलं ना वाढदिवसाच्या शुभेच्छा कुसुमाग्रजानी पाठवल्या. ते शब्द असे :
“शत शरदांचे सुभग चांदणे पसरो वाटेवर
लाभो संसारातिल सारे सुखदायी सुंदर II “
संकलन
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ – इंटरनेटवरुन
Leave a Reply