नवीन लेखन...

स्वातंत्र्यवीर सावरकर : जयंतीनिमित्तानें

  • २८ मे ही वीर सावरकरांची जयंती. आज त्यांचें स्मरण करून आपण त्यांची स्मृती ताजी ठेवूं या.

आपल्या देशात एक पद्धत आहे – जयंती किंवा पुण्यतिथीच्या दिवशीं आपण त्या थोर व्यक्तीच्या नांवाचा घोष करतो, समारंभ, भाषणें वगैरे करतो, पुतळ्याला हार घालतो. आणि दुसर्‍या दिवसापासून पुन्हां ‘जैसे थे’ ! पण, नुसतीच व्यक्तिपूजा नको, तर त्यांच्या विचारांचें मनन, व पालन करणें हेंच खरें तर आवश्यक आहे

  • २० व्या शतकाच्या पहिल्या दशकात, फ्रान्सच्या मार्सेली बंदरात जहाजातून उडी मारून इंग्रजांच्या कैदेतून पळाल्याबद्दल ( जरी ते बंदरात पुन्हां पकडले गले तरी ), तात्यारावांना ‘वीर’ ही उपाधि उत्स्फूर्तपणें मिळाली. त्यांचे कृत्य हें वीरकृत्य तर नक्कीच होतें.

पुढे, आचार्य अत्रे यांनी समर्पक विचार केला की तात्यारावांचा ‘वीरपणा’ हा, मार्सेलीच्या उडीपेक्षा कैक पटींनी मोठा आहे. त्यांची स्वातंत्र्यलालसा जाज्वल्य होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले, अपार कष्ट झेलले, आणि स्वातंत्र्यज्योत अखंड तेवत ठेवली. मनात निग्रह व विचारांमध्ये धैर्य, शौर्य असल्याखेरीज काळ्या पाण्याचे तीव्र कष्ट भोगणें कठीणच. आणि म्हणून अत्रे यांनी तात्यारावांना अप्रोप्रिएटली ‘स्वातंत्र्यवीर’  हें अभिधान सुचवलें, व जनतेनें तें अमलात आणलें.

  • मला तर असें वाटतें की, तात्यारावांच्या प्रत्येक विचार धारिष्ट्यपूर्ण , व प्रत्येक आचरण युद्धसिद्ध होतें, व त्यामुळे , त्यांना ‘वीर’ हें अभिधान सर्वथैव योग्य आहे , केवळ एकाच घटनेमुळे, ( किंवा,फक्त कांहीं घटनांमुळे), नव्हे.
  • ‘रणावीण स्वातंत्र्य कोणां मिळालें’ ही पंक्ती स्वत: सावरकांची नसली , तरी ती सावरकरी विचारविश्वाशी एकनिष्ठ कवीची आहे, आणि अर्थातच, ती सावरकांच्या विचारांशी सुसंगतच आहे. या पंक्तीमध्ये जरी देशाच्या स्वातंत्र्याचा विचार प्रामुख्यानें आहे ; मात्र हे घ्यानात ठेवणें इष्ट आहे की, प्रत्येक क्षेत्रात विचार-स्वातंत्र्यासाठी ‘रण’ हें करावेंच लागतें, झुंज घ्यावीच लागते.
  • ‘बुद्ध्याच वाण धरिलें करिं हें सतीचें’, हें म्हणणारी सावरकरांसारखी व्यक्ती, जाणीवपूर्वक , मृत्यूची भीती न बाळगतां आपली लढाई  (स्वातंत्र्यासाठी , तसेच अन्य क्षेत्रांमधील) चालवीत होती, हें उघड आहे. विसाव्या शतकातल्या त्या काळात, जेव्हां इंग्रजी साम्राज्यावर सूर्य मावळत नसे,  त्या अजस्त्र सत्तेशी झुंज घ्यायची म्हणजे ‘खायचें काम’ नव्हे. आज, ११० वर्षांनंतर आपल्याला त्याच्या ‘ग्रॅव्हिटी’ची कल्पनासुद्धां करणें महाकठीण !  तर, त्याकाळीं असें धाडस करणार्‍याला ‘वीर’ म्हणून संबोधणें, हें स्वाभाविकच आहे.
  • या रणात, कितीकदा मृत्यूला सामोरें जावें लागलें ! अंदमानात आत्महत्येच्या विचारावर विजय मिळवून आपलें जीवितकार्य निष्ठेनें चालवणें, हें मनाचा निग्रह दाखवतें. तसेंच, १९६०च्या दशकात, आपलें जीवितकार्य आतां पूर्ण झालेलें आहे, म्हणून, प्रायोपवेशन करून मृत्यूला आलिंगणें, ही गोष्ट अत्यधिक दृढ संकल्प व ठाम मनोनिग्रहाशिवाय शक्यच नाहीं. जपानी ‘सेप्पुकु’ काय, जैनांचें ‘संथारा’ काय, किंवा हें प्रायोपवेशन काय, मनाचा ‘वीर’पणा , म्हणजेच, अविचल मनोबल , आणि मृत्यूच्या भीतीवर विजय  प्राप्त

केलेला असल्याशिवाय आचरणें अशक्य आहे.

  • आजही दलितांवर अत्याचाराच्या अनेक घटनांबद्दल आपण रोजच वाचत असतो. तर, १०० वर्षांपूर्वी त्याची तीव्रता किती असेल, याची कल्पनाच केलेली बरी. अशा काळात ज्या ज्या थोर व्यक्तींनी त्या समाजाच्या उत्थानासाठी प्रयत्न केले, त्यांत सावरकारंचें नांव अग्रेसर आहे. ( ज्येष्ठ व श्रेष्ठ समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे यांनी या संदर्भात सावरकरांची केलेली तारीफ सर्वविदित आहे). सावरकरांनी केलेलें हें, दलितांना समान वर्तणूक देण्यांचें व त्यांच्या उत्थानासाठी यत्न करण्याचें, आणि तसेंच, जात्युच्छेदनाचें कृत्यही पारंपारिक समाजविचाराच्या विरोधात जाऊन केलेलें कार्य आहे, हें ध्यानात ठेवणें आवश्यक आहे.
  • समाजातील अनिष्ट रूढींवर सावरकारंनी सावरकरांनी घणाघाती प्रहार केले ; जनप्रक्षोभाची तमा न बाळगतां सावरकरांनी अशा ‘दकियानूसी’, बुरसटलेल्या प्रथांचा धि:कार केला. त्यांनी त्यासाठी प्रत्यक्ष लढा तर दिलाच, पण त्याचबरोबर , त्यांनी त्या प्रत्येक बाबीचें वैचारिक विष्लेषणही केलें. त्यांनी उल्लेखलेल्या सात प्रकारच्या ‘बंदी’ हें याचें एक उदाहरण. (त्यांतील ‘बेटीबंदी’ तर अजूनही जातनिहाय चालूंच आहे).

म्हणजेंच, प्रत्येक बाबीला वैचारिक अधिष्ठान देऊन, आपल्या विचारांच्या समर्थनात स्पष्टीकरण देऊन, सावरकरांनी अशा अनेक बाबींमध्ये वैचारिक लढाही दिला, व अनिष्ट परंपरांच्या उच्छेदनाला स्वआचरणाद्वारें पाठिंबा दिला. विचारांचा ठामपणा आणि आचराणाचें धैर्य असल्याखेरीज हें सर्व शक्यच नाहीं.

  • २०च्या शतकाच्या आरंभीच्या दशकांमध्यें, ( किंबहुना आजही) ‘हिंदुधर्म’ ही संकल्पना परमार्थ, तत्वज्ञान, आणि त्याहीपेक्षा अधिक म्हणजे , परंपरा, यांवर आधारलेली होती. अशा वेळी, १९२२-२३ च्या सुमारास ’हिंदुत्व’ ही एक संपूर्णपणें नवीन संकल्पना मांडणें, म्हणजेच,परंपरेच्या विरुद्ध जाणें. या गोष्टीलाही धाडस लागतें.
  • ‘हिंदुइझम्’ हा शब्द जेव्हां वापरला जात असे ( व जातो), तेव्हां तेव्हां ही वर-उलेखलेली ‘हिंदुधर्मा’ची व्याख्या अभिप्रेत असते. म्हणून, अगदी हेतुत:  सावरकरांनी त्या शब्दाचा उपयोग टाळला, आणि ‘हिंदुत्व’ हा नवीन शब्द निर्माण केला. ( ते शब्दप्रभू होते, त्यामुळें नवीन चपखल शब्दाचें निर्माण त्यांना मुळीच कठीण नव्हते. भाषाशुद्धीच्या चळवळीसाठी त्यांनी निर्माण केलले प्रतिशब्द आज मराठीत पूर्णपणें रूढ झालेले आहेतच की ! ).  जसें मातृत्व, पितृत्व, ममत्व, बंधुत्व,  स्वत्व, दायित्व, त्याचप्रमाणें ‘हिंदुत्व’. हिंदुत्व म्हणजे ‘हिंदुपण’, ‘हिंदु असणें’. आणि , या हिंदुत्वाची व्याख्या करतांना, सावरकरांनी विचारपूर्वक, अध्यात्म, रूढी, परंपरा वगैरे गोष्टी बाजूला ठेवल्या , व ऐहिक , सामाजिक आणि राजनैतिक भूमिकेतून आपली नवीन व्याख्या मांडली.
  • ही व्याख्या खालील शब्दांमध्ये सामावली आहे-

“असिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका

पितृभू: पुण्यभूश्चैव सर्वै हिन्दुरितिस्मृत: ।”

आपल्याला स्पष्ट दिसतेंच की या व्याख्येत, वेदोपनिषद, गीता, इतर कुठलेही धर्मग्रंथ, देवदेवता, यजन-पूजन-अर्चन, रूढी, जातपात, अध्यात्म, मातृभाषा, अशा कोणत्याही गोष्टीचा समावेश नाहीं.

“जी माणसें असें मानतात की, ‘सिन्धु नदीपासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेली जी भूमी, तो माझा भारत देश’ ; या भारत देशात ज्यांचे पूर्वज जन्मले, वावरले ; आणि ज्यांची ‘पुण्यस्थळें’ (अभिमानाची, श्रद्धेची, प्रेमाची, आदराची, ज्यांपुढे झुकावें अशी, स्थानें ) या भारतातच आहेत ; अशा सर्व व्यक्ती ‘हिंदु’ आहेत.”

त्यामुळे, या व्याख्येत, सनातनी,त्यांचे पंथ-उपपंथ, बौद्ध, जैन, सिक्ख (शीख), लिंगायत वगैरे इतर सर्व पंथ, यांचा आपोआपच अंतर्भाव होतो.

भारताच्या संविधानामधील  ‘हिंदु’ची व्याख्या मूलत: याच विचाराशी साम्य दर्शवते (सावरकरांचा नामोल्लेख तिच्यात नसला तरी). यातून, ही व्याख्या किती योग्य आहे, हें दिसून येतें.

  • या व्याख्येवर टीका करणारे असें म्हणतात की, हिच्यात, राष्ट्रीय भावना असणारे पारशी, भारतीय ख्रिस्ती, भारतीय मुस्लिम वगैरेंचा समावेश नाहीं.

मात्र, आपण हें ध्यानात ठेवणें गरजेचें आहे, की हिंदु समाज, जो, जात-पोटजात , रोटीबेटी, पंथ-उपपंथ, अनिष्ट रूढी-परंपरा, विविध देवदेवतांचे भिन्नभिन्न भक्तगण, शैव-वैष्णव, ब्राह्मण-अब्राह्मण, अशाप्रकारें हजारो तुकड्यांमध्यें, गटांमध्ये विभागला गेलेला होता ( आणि, आहे), त्याला एकसंध बनवणें , हेंच या व्याख्येचें उद्दिष्ट होतें,  तो तिचा फोकस होता, तें सावरकरांचें स्वप्न होतें, तें त्यांचें ध्येय होतें.  त्यासाठी ही व्याख्या सर्वथैव योग्य आहे.

पारशी वगैरे वर उल्लेखलेली मंडळी जरी ‘हिंदुत्वा’च्या व्याख्येअंतर्गत सामील होत नसली, तरी, ज्या ज्यांची निष्ठा भारतावर असेल , त्यांचें ‘भारतीयत्व’ सावरकरांना मान्यच होतें,

लखनौच्या शियापंथीयांशी झालेल्या सुसंवादात सावरकरांनी त्यांना सांगितलेंच  होतें, की तुम्ही पक्ष स्थापन करा, तुमच्याशी आम्ही सहकार्य करूंच. इतकेंच नव्हे, तर, १९३७ मध्यें सावरकरवादी हिंदुमहासभा पक्षानें मुस्लिम लीग व इतर पक्षांशी सहकार्य करून सिंध, बंगाल, नॉर्थ-ईस्ट-फ्रंटियर-प्रॉव्हिन्स् या प्रांतांमध्ये  जॉइन्ट-सरकारें स्थापली होतींच.

या सर्वांचा अर्थ स्पष्ट आहे की, ‘हिंदु’ याच्या सावरकरांनी केलेल्या व्याख्येनें, भारतीयत्वाशी कुठल्याही प्रकारें क्लॅश येत नाहीं.,आणि म्हणुनच, ‘चुनावी’ राजकारणात, त्यांचा पक्ष अन्य पक्षांशी सहज सहकार्य करूं शकला.

म्हणजेच, या व्याख्येवरील टीका अयोग्य, इनअप्रोप्रिएट अशी आहे. अशा टीकेनें, त्या व्याख्येमागील सुयोग्य विचार व हेतू यांना यत्किंचितही बाधा पोंचत नाहीं. ही व्याख्या केवळ त्या काळातच योग्य होती असें नसून, ती आजही तेवढीच योग्य, तितकीच रेलिव्हंट  आहे.

मी स्वत: राजकारणी नाहीं. तसेंच, मी धर्म-जात वगैरे भेदभाव मानीत नाहीं, मी अमुक बायसमुळे अमुक पक्ष  घेतो आहे असें मुळीच नाहीं. मात्र, जें योग्य आहे, त्याला योग्य म्हटलेंच पाहिजे, असें मला ठामपणें वाटतें.

त्यामुळेंच, ‘सेक्युलर’ , (म्हणजे ‘सर्वधर्मसमावेशक’ नव्हे तर ‘निधर्मी’ म्हणवणारी) मंडळी ,  जसें की कम्युनिस्ट, सोशालिस्ट, काँग्रेसिस्ट इ. , यांच्याबद्दल आदर बाळगूनही  असें म्हणावें लागतें की, अशी मंडळी एक तर सावरकरांच्या व्याख्येचा खरा अर्थ समजून तरी घेत नाहींत, किंवा समजूनही राजकारणासाठी तिचा विपर्यास करतात. मात्र, ही व्याख्या सामाजिक व राजकीय आहे, आणि सावरकरांचा स्वत:चा दृष्टिकोन  विज्ञाननिष्ठ होता, या बाबीकडे ते सोयीस्कर दुर्लक्ष करतात ; ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे समाजाला त्याचा निर्भेळ फायदा मिळत नाहीं.

 

  • समारोप – या गोष्टींचा आजच्या दिवशीं उहापोह करण्यामागचें खास कारण हें आहे की, आज  तर जातीपातींचें राजकारण अधिक वाढलेलें आहे.  नवबौद्ध, एस्. सी.- एस्. टी., ओ.बी.सी. , लिंगायत-वीरशैव हे व असे भेद कुठल्याही प्रकारें कमी न होतां, उलट, गेल्या तीनएक दशकांमध्ये वाढलेलेच आहेत. जैनांना मायनॉरिटी स्टेटस  हवें होतें व आहे, व त्यादृष्टीनें त्यांनी प्रगतीही केलेली आहेर. आतां त भाषा-भाषांमध्येही राजकारणामुळे वैमनस्य येत आहे, तुकडे-तुकडे वाढताहेत, एकसंधता कमीकमी होत जात आहे. ‘खप’ पंचायतीद्वारें जातीअंतर्गत ढवळाढवळ, जातीबाहेर प्रेम किंवा विवाह केल्यास त्यांना व कुटुंबीयांना खप पंचायत देत असलेली शिक्षा, ‘आम्ही कोर्टाचा निर्णयही मानणार नाही’ ही गुर्मीची भाषा, इतरत्रही ‘लव्ह-जिहाद’  चें भूत, अशा अनेक घटनांबद्दल आपण रोज वृत्तपत्रांमध्ये बातम्या वाचतो, टीव्ही चॅनल्स् वर पाहतो.  या सर्वांवरून , देशाची सामाजिक प्रगती होत आहे की अवनती, हें स्पष्ट आहे.

 

अशा वेळी, सावरकरांची व्याख्या ध्यानांत ठेऊन आपण, आपल्यातील तुकडेतुकडे नाहींसे करून, एकसंध झालो, तर भारतीय म्हणून आपण पुढेंच जाऊं, उत्थानच करूं.

 

तेव्हां, मित्रहो, डोळे उघडा, मनें उघडा.  उत्तिष्ठ, जाग्रत्. उठा, जागे व्हा .

 

– – –

 

– सुभाष स. नाईक   Subhash S. Naik  .   Mumbai, Pune ( India)

M- 9869002126.      Email :  vistainfin@yahoo.co.in

Website : www.subhashsnaik.com, snehalatanaik.com.

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 294 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..