डॉ. काशिनाथ बाळकृष्ण घाणेकर यांचा जन्म १४ सप्टेंबर १९३२ रोजी कोकणातील राजापूर या गावी झाला. त्यांच्या जन्माच्या वेळेस त्यांची आत्या काशीयात्रा करून परत आल्यामुळे त्यांचे नाव ‘ काशिनाथ ‘ ठेवण्यात आले होते. त्यांच्या आईचे नांव यमुनाबाई होते.चिपळूण येथून शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी पुण्याच्या एस. पी. महाविद्यालयात प्रवेश घेतला. एक वर्ष शिक्षण घेतल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी रत्नागिरीला गेले. तेथे खऱ्या अर्थाने त्यांचा नाट्यसृष्टीशी परिचय झाला, त्यांनी महाविद्यालयाच्या अनेक नाटकातून कामे केली. एम. डी. होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी मुबईच्या रुईया महाविद्यालयात इंटर सायन्सला प्रवेश घेतला. खरे तर त्यांना सर्जन व्हायचे होते परंतु थोडे कमी मार्क मिळाल्यामुळे त्यांना सर्जरीला जात आले नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या मोठा भावाच्या सल्ल्यानुसार त्यांनी दंतवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९५७ मध्ये काशिनाथ घाणेकर बी.डी.एस. च्या परिक्षेत मुबई विद्यापीठात पहिले सुवर्णपदाचे मानकरी ठरले. त्यांनी त्यानंतर जे.जे. वैद्यकीय महाविद्यालयात व्याख्याता म्ह्णून नोकरी करण्यास सुरवात केली आणि पुढे वर्षभरात त्यांनी स्वतःचा दवाखाना सुरु केला. परंतु उपजत अभिनयाची आवड असलेल्या डॉक्टर घाणेकरांनी नाटकांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. पूढे त्यांनी चित्रपटातदेखील कामे करावयास सुरवात केली. त्यांचा पहिल्या चित्रपट होता ‘ पाहू रे किती वाट ‘. हा चित्रपट राजा ठाकूर यांनी दिग्दर्शित केलेला होता. या चित्रपटामध्ये अरुण सरनाईक, सीमा यांनी अभिनय केला होता. त्यातल्या नायिकेच्या धाकट्या भावाची भूमिका डॉक्टर घाणेकरांनी केली होती. त्यांची त्या चित्रपटातील नायिका होती ‘ उमा ‘.
त्यानंतर डॉकटर घाणेकरांनी भालजी पेंढारकर यांच्या ‘ मराठा तितुका मेळवावा ‘ या चित्रपटात छोटी भूमिका केली होती. त्यांच्यावर चित्रित झालेले ‘ शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती ‘ हे गाणे आजही रसिकांच्या लक्षात आहे. डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांचा आणखी एक चित्रपट जो गजानन जहागीरदार यांनी दिग्दर्शित केलेला होता त्याचे नांव होते ‘ सुखाची सावली ‘. तसे पाहिले तर हे दोन्ही चित्रपट अपयशी झाल्यावर त्यांची चित्रपटातील कारकीर्द संपुष्टात येते की काय असे वाटतानाच त्यांचा ‘ पाठलाग’ हा चित्रपट आला, हा रहस्य चित्रपट राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेला होता. तो खूप चालला, त्यातील गाणीही उत्तम होती. या चित्रपटातील भूमिकेसाठो डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांना उत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. पुढे त्यांनी काही चित्रपटात भूमिका केल्या. तसेच ‘ अभिलाषा ‘ या हिंदी चित्रपटात भूमिका करण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे त्यांनी हिंदी चित्रपट ‘ दादी मा ‘ या चित्रपटात तनुजा, मुमताज, दिलीप राज ह्यांच्याबरोबर काम केले होते. त्यांनतर राजदत्त यांच्या ‘ मधुचंद्र ‘ या चित्रपटात त्यांनी काम केले. प्रेक्षकांना तो चित्रपट आवडला होता, त्यातील गाणीही आवडली होती. काही कालांतराने त्यांनी देवमाणूस आणि झेप, एकटी, अजब तुझे सरकार या चित्रपटात देखील कामे केली त्यानंतर आलेला ‘ चंद्र आहे साक्षीला ‘ बरा चालला. डॉकटर घाणेकर यांचा ‘ अश्रूंची झाली फुले ‘ मधील ‘ लाल्या ‘ कोणीही विसरू शकणार नाही. नाटकांच्या नावांच्या जाहिरातीत कलाकाराच्या नावाच्या यादीत प्रमुख कलाकाराचे नांव देण्याची ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर ‘ अशा नामावलीची प्रथा त्यांच्याच नावापासून सुरु झाली असे म्हणतात.
त्यांची नाटके मात्र चालली, त्याच्या ‘ इथे ओशाळला मृत्यू ‘ या नाटकांत त्यांनी ‘ संभाजी ‘ ची भूमिका अजरामर केली. ‘ गुंतत हृदय हे ‘ मधील त्याची भूमिकाही अशीच गाजली त्यांचा ‘ गारंबीचा बापू ‘ हे नाटक खूप चालले. डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांनी चित्रपटात कारकीर्द यशस्वी केली असली तरी त्यांचा ओढा मात्र नाटकांकडे होता. मी ‘ गुंतता..’ या नाटकच्यावेळी आशा काळे यांची मुलखात घ्यायला गेलो असताना ते अचानक समोर यायचे, निळे डोळे, काळेभोर केस, गोरा रंग..म्हणायचे मला ओळ्खस का…मी हसून म्हणायचो..’ हो.. आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर ‘…आपल्याच धुंदीत असायचे ते.
डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांची स्टेजवरची एन्ट्रीच जबरदस्त असे आणि त्यांच्या आयुष्याची एक्झिटही सगळ्यांना चटका लावून गेली. ते नाटकाच्या प्रयोगाला गेले आणि तेथेच हॉटेलवर त्यांना हृद्यविकाराचा झटका आला आणि त्याचे त्यातच २ मार्च १९८६ रोजी निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply