नवीन लेखन...

लेखक, कवी व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे

आज लेखक, कवी व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला.

अण्णा भाऊ साठे यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई. या दांपत्याने जन्मलेल्या मुलाचे नाव तुकाराम ठेवले असले तरीही सर्वजण प्रेमाने त्याला अण्णा म्हणत. अण्णा भाऊ साठे यांची दोन लग्ने झाली होती. दुसऱ्या पत्नीचे नाव जयवंताबाई. अण्णांप्रमाणेच याही साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या. शांताबाई आणि शकुंतलाबाई या त्यांच्या दोन मुली. आई आणि घरातील मोठे लोक दोर वळण्याच्या कामाला जात. त्यांचे वडील पोटापाण्यासाठीच मुंबईत राहत असत. त्यामुळे लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी तुकारामांवर (अण्णांचे मूळ नाव) म्हणजेच अण्णा भाऊंवर होती. त्यांच्या वडिलांनी मुंबईत उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित समाज पाहिल्याने आपल्या मुलांनी शिकले पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या आग्रहामुळेच वयाच्या १४ व्या वर्षी अण्णांनी प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली. परंतु तत्कालीन मागास जातींतील मुलांसाठी त्या काळी वेगळ्या शाळा होत्या. त्या मुलांशी शिक्षकांचे वर्तनही निर्दयीपणाचे होते. वाढलेले वय, सदोष शिक्षण पद्धती यांमुळे अण्णा फक्त दिड दिवस शाळेत गेले.

लहानपणापासूनच त्यांना विविध छंद होते. मैदानी खेळ खेळण्याचा त्यांचा पिढीजात वारसा असल्याने दांडपट्टा चालविण्यात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हते. याशिवाय जंगलात एकटे भटकणे, पोहणे, मासेमारी, शिकार करणे, विविध पक्षांशी मैत्री करणे, जंगलातील पानाफुलांमधील सूक्ष्म फरक शोधणे असे एक ना अनेक छंद त्यांना होते. या छंदांमध्ये निरागसपणे बागडण्यातच त्यांचे बालपण गेले. मोठे होत असताना त्यांच्या आवडींमध्ये वाढच होत होती. लोकगीते पाठ करून ती टिपेच्या आवाजात म्हणणे, पोवाडे, लावण्या पाठ करणे, इतरांना त्या आत्मीयतेने म्हणून दाखवणे या छंदांमुळे त्यांच्याभोवती नेहमीच मित्र मंडळी जमलेली असत. रेठरे गावच्या जत्रेत त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले. त्याचा परिणाम अण्णा भाऊंवर झाला आणि ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊ लागले.चळवळीत सामील होऊन लोकनाट्यांत छोटी मोठी कामे त्यांनी केली.

याच काळात दुष्काळ पडल्याने अण्णांच्या वडिलांनी आपल्या कुटुंबाला मुंबईत न्यायचे ठरविले. त्याच वेळी अण्णा भाऊंचे बालपण संपले. वयाच्या ११ व्या वर्षी अण्णा आपल्या आई-वडिलांबरोबर मुंबईत आले. हे कुटुंब भायखळ्याच्या चांदबीबी चाळीत राहायला गेले. त्या काळी मुंबईत स्वस्ताई असल्याने सुरुवातीचा काळ सुखाचा गेला. मुंबईत फिरताना दोन गोष्टींकडे ते आकर्षिले गेले, एक म्हणजे विविध राजकीय संघटना आणि दुसरे म्हणजे मूक चित्रपट. विविध राजकीय संघटनांचे ध्येय ब्रिटिशांना हाकलून देणे हेच होते. परंतु प्रत्येकाची विचारसरणी वेगळी होती. यांपैकी कम्युनिस्ट विचारसरणीचे अण्णा अनुयायी बनले. पक्षाच्या सभांचे आयोजन करणे, वॉलपेंटिंग करणे, हॅण्डबिले वाटणे, मोर्चे काढणे, छोट्या-मोठ्या सभेसमोर गोष्टी सांगणे, पोवाडे, लोकगीते म्हणून दाखविणे या सर्व गोष्टींमुळे कम्युनिस्ट वर्तुळात ते सर्वांना एकदम हवेहवेसे झाले. याच वेळी त्यांच्या तुकाराम या नावाचे अण्णा या नावात रूपांतर झाले. मुंबईत पोटासाठी वणवण भटकत असताना अण्णांनी हमाल, बूट पॉलिशवाला, घरगडी, हॉटेल बॉय, कोळसे वाहक, डोअरकीपर, कुत्र्याला सांभाळणारा, मुलांना खेळविणारा, उधारी वसूल करणारा, खाण कामगार, ड्रेसिंगबॉय अशी नाना प्रकारची कामे केली. या काळातच त्यांना सिनेमा पाहण्याचा छंद लागला. या छंदानेच त्यांना साक्षर बनविले. चित्रपटांच्या पाट्या, रस्त्यावरील दुकानांच्या बोर्डवरील अक्षरे जुळवित ते साक्षर झाले. या अक्षर ओळखीनंतरच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.
वयाच्या १७-१८ व्या वर्षी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अण्णांवर आली होती. गिरणी कामगार म्हणून त्यांच्या जीवनाला सुरुवात झाली होती. परंतु कोहिनूर मिलमधील नोकरी सुटल्याने त्यांच्यावर मोठेच संकट आले. या वेळी पुन्हा साठे कुटुंब वटेगावला आले.

मुंबईतील धकाधकीचे जीवन, मोर्चे, सभा, सत्याग्रह, आंदोलने या सर्व गोष्टी पाहिलेल्या अण्णा भाऊंना वटेगावमध्ये राहणे शक्य होत नव्हते. अत्यंत अस्वस्थतेत त्यांनी घर सोडले आणि ते त्यांच्याच नातेवाईकांच्या तमाशाच्या फडात सामील झाले. अण्णा भाऊंचा धारदार आवाज, त्यांचे पाठांतर, पेटी, तबला, ढोलकी, बुलबुल ही वाद्ये वाजवण्याची कला या गुणांमुळे त्यांचे तमाशात स्वागतच झाले. १९५० ते १९६२ हा त्यांचा साहित्य क्षेत्रातील सुवर्णकाळ होता. याच काळात त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्ती निघाल्या. प्रचंड यशस्वी होत असताना त्यांचे स्वतःचे वैयक्तिक जीवन मात्र धकाधकीचे होत होते.

मुंबई सरकारने ’लाल बावटा’ या कला पथकावर बंदी घातली होती. पुढे तमाशावरही बंदी आली. तमाशातील कलाकारांचे संसार देशोधडीला लागले. अण्णांनी तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून तमाशा कलेचा उद्धार केला. तमाशाला लोकनाट्याचे वैभव मिळवून दिल्याने सरकारची बंदी कुचकामी ठरली.

या सुवर्णकाळातच त्यांनी वैजयंता, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, फकिरा अशा अनेक कादंबर्यात लिहिल्या. ३०० च्या वर कथा लिहिल्या. खुळंवाडी, बरबाह्या कंजारी, कृष्णाकाठच्या कथा असे त्यांचे कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. त्यांनी स्टॅलिनग्राडचा पोवाडा, महाराष्ट्राची परंपरा, मुंबईचा कामगार असे पोवाडेही लिहिले. निवडणुकीत घोटाळे, दुष्काळात तेरावा, अकलेची गोष्ट ही त्यांची वगनाट्ये प्रसिद्ध आहेत. दोनशे-अडीचशे गाणी, लावण्या त्यांनी लिहिल्या आहेत. कामगारांमध्ये त्यांची गाणी आणि लावण्या लोकप्रिय आहेत. मराठीतील ग्रामीण, प्रादेशिक, दलित साहित्यावर अण्णा भाऊंचे प्रभुत्व होते. अण्णा भाऊंच्या साहित्याचे हिंदी, गुजराती, उडीया, बंगाली, तमीळ, मल्याळी या भारतीय भाषांबरोबरच रशियन, झेक, पोलिश, इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील २७ भाषांमधे भाषांतर झाले आहे. लेखणीचे हत्यार बनवून त्यांनी पुरोगामी, विज्ञाननिष्ठ, स्त्रीवादी, लढाऊ अविष्काराचा दीपस्तंभ मराठी साहित्याच्या क्षेत्रात उभा केला. एवढ्या मोठ्या कर्तृत्वामुळे त्यांना प्रसिद्धी मिळत होती. अण्णांच्या १२ कथांवर चित्रपट निघाले. एवढे साहित्य प्रसिद्ध झाले तरी त्यांचे दारिद्रय संपले नाही. ते मितभाषी असल्याने व्यावहारिक बाबतीत लोकांनी त्यांचा गैरफायदा घेतला. परंतु चित्रपट सृष्टीतील भालजी पेंढारकर, सूर्यकांत मांढरे, जयश्री गडकर, सुलोचना यांसारख्या दिग्गज कलाकारांनी अण्णांवर खूप प्रेम केले. हिंदी चित्रपट सृष्टीतीलही राज कपूर, शंकर, शैलेंद्र, बलराज सहानी, गुरुदत्त, उत्पल दत्त या कलाकारांचे अण्णांवर प्रेम होते. ऑलेगसारखे रशियन कलावंतही अण्णा भाऊंचे मित्र होते.

अण्णा भाऊ साठे जेव्हा मुंबईच्या ‘माटुंगा लेबर कॅम्प’ या दलित-शोषितांच्या वस्तीत कम्युनिस्ट चळवळीत कार्य करू लागले तेव्हा खर्याा अर्थाने त्यांचे विचार क्रांतिकारक होऊ लागले. तत्कालीन लेबर कॅम्पमधील प्रमुख कम्युनिस्ट नेते/कार्यकर्ते आर.बी. मोरे, के.एम. साळवी, शंकर नारायण पगारे यांच्या सोबत ते कम्युनिस्ट पक्षाचे काम करू लागले. मार्क्ससवादी विचारांच्या अभ्यासवर्गाला हजेरी लावू लागले. याच लेबर कॅम्पमध्ये ते पुन्हा धुळाक्षरे गिरवू लागले व लिहावयास लागले. त्यांनी पहिले गाणे लेबर कॅम्पमधील मच्छरावर लिहिले. याच लेबर कॅम्पमध्ये अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख व शाहीर द.ना. गव्हाणकर या त्रयींनी कम्युनिस्ट पक्षाच्या मार्गदर्शनाखाली लाल बावटा कलापथकाची १९४४ साली स्थापना केली आणि क्रांतिकारक शाहिरीचा बुलंद आवाज महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर पसरला. अण्णा भाऊंसारखा लेखक प्रारंभी कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्रांमधूनच वार्ताहर, कथाकार, गीतकार म्हणून लेखन करू लागला. कम्युनिस्ट पक्षाच्या व विचारांशी संबंधित स.ह.मोडकांच्या लोकसाहित्य प्रकाशनाने व वा.वि. भटांच्या अभिनव प्रकाशनानेच प्रथम अण्णा भाऊंच्या कादंबर्याय, कथासंग्रह, नवे तमाशे आदी नाट्यसंग्रह प्रकाशित करून जनमानसात नेण्याचे भरीव काम केले आहे. अण्णा भाऊंच्या ‘शाहीर’ या पुस्तकास ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते एस. ए. डांगे यांनी विस्तृत प्रस्तावना लिहून त्यांचा गौरव केला आहे.

अण्णा भाऊंच्या ‘इमानदार’ नाटकाचा हिंदी प्रयोग करण्यातही कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित ‘इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन’(इप्टा) या संस्थेचे सुप्रसिद्ध सिनेअभिनेते कॉ. बलराज साहनी यांनी पुढाकार घेतला व त्या नाटकात अभिनेते ए.के. हंगल यांनी महत्त्वाची भूमिका केली होती. नंतर अण्णा भाऊंना ‘इप्टा’चे अखिल भारतीय अध्यक्षपदही मिळाले. ज्यात भारतभरातील सुप्रसिद्ध लेखक-कलावंत, विचारवंत त्यांच्यासोबत कार्यरत होते. अण्णा भाऊंच्या ‘फकिरा’ कादंबरीवरील चित्रपट निर्मितीसही ‘इप्टा’च्या कलावंतांचे मोलाचे सहकार्य लाभले.

अण्णाणाऊ साठे यांचे १८ जुलै १९६९ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..