विजय लक्ष्मण मांजरेकर यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३१ रोजी झाला. त्यांच्या घरामध्ये, आजूबाजूला क्रिकेटवरच बोलणे होत असे.त्यांच्या खेळावर प्रभाव पडलं तो विजय हजारे यांचा. वयाच्या १५ व्या वर्षापासूनच ते क्रिकेटमध्ये नाव कमवत होते. विजय मांजरेकर हे भारताकडून खेळलेच परंतु ते आंध्र प्रदेश, बंगाल, महाराष्ट्र, मुंबई, राजस्थान जाणीव उत्तरप्रदेशकडून क्रिकेट खेळले.
त्यांनी पहिला क्रिकेट कसोटी सामना इंग्लंड विरुद्ध कोलकता येथे १९५१ मध्ये खेळला त्यामध्ये त्यांनी ४८ धावा केल्या. त्या सामन्यामध्ये दत्तू फडकर यांनी ११५ धावा केल्या. अर्थात हा सामना अनिर्णित राहिला. विजय मांजरेकर हे द्रुतगती गोलंदाजीवर चांगले खेळायचे. त्यावेळी फ्रेंडी ट्रुमन, वेस हॉल यांच्या गोलंदाजीवर ते खेळले हे अत्यंत महत्वाचे आहे. ते इनस्विंग पेक्षा आउट स्विंग उत्तमपणे खेळायचे. ते आपले खेळणे हे परिपूर्ण होण्यासाठी खूप मेहनत करत जणू काही ते क्रिकेटमधील कलाकार आहेत असे वाटे.
दिल्लीमधील १९५८-५९ च्या कसोटी सामन्यामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना चंदू बोर्डे ह्यांच्या दुसऱ्या डावांमध्येही १०० धावा होत आल्या होत्या आणि परंतु त्यांना साथ देण्यासाठी कोणी उरले नव्हते कारण पॉली उम्रीगर आणि विजय मांजरेकर दोघेही जखमी झालेले होते. परंतु चंदू बोर्डे यांना त्यांच्या ९६ धावा झाल्या असताना विजय मांजरेकर अंगठ्याचे हाड मोडले असताना खेळायला आले. विजय मांजरेकर हे नेहमी आपल्या सहकार्याचे कौतुक करण्यास नेहमी तयार असत.
विजय मांजरेकर खेळताना अक्षरशः चौफेर फटकेबाजी करत असत. कोणतेही फटाके मारताना खऱ्या कसलेल्या फलंदाजाप्रमाणे त्यांच्याजवळ भरपूर वेळ असायचा त्यांची बॅट चेंडूवर कधीच उशीरा यायची नाही. खेळताना वृत्ती एकाग्र असणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांचा भर नेहमी अचूकतेवर असायचा.
विजय हजारे यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या १९५२ सालच्या दौऱ्यामध्ये विजय मांजरेकर इंग्लंडला गेले. लीड्स येथील कसोटी सामन्यामध्ये भारताच्या डावाची सुरवात खराब झालेली होती. भारतीय संघाचे तीन खेळाडू स्वस्तात बाद झालेले होते. तेव्हा विजय हजारे यांच्या जोडीला विजय मांजरेकर खेळण्यास आले. समोर फ्रेंडी ट्रुमन, अलेक बेडसर आणि जिम लेकर होते. विजय मांजरेकर यांनी इतक्या चपळतेने, चित्याप्रमाणे तुटून पडले, त्यांचे स्क्वेअर ड्राईव्ह चे फटाके असे दणक्यात जात की ते बघताना नजर ठरत नसे. त्या सामन्यांमध्ये त्यांनी शतक ठोकले. वास्तविक पहाता विजय मांजरेकर खेळायला आले तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या होती ३ बाद ४२ धावा. विजय हजारे यांच्याबरोबर त्यांनी २२२ धावा करून स्वतःला सिद्ध केले. संकटाच्यावेळी ते समर्थपणे उभे राहून फटके मारत असत जर खेळपट्टी खराब असेल तर त्यावर इतके काळजीपूर्वक आणि कौशल्याने खेळत असत. बघणाऱ्याला त्यांच्या त्यावेळच्या त्यांच्या हालचालीचे आणि बॅटच्या चपळतेने आश्चर्य वाटत असे. त्यांच्या सुरवातीच्या क्रिकेट कारकिर्दीच्यावेळी ते कव्हरपॉइंटला अत्यंत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होते. ते अचूकपणे चेंडू फेकायचे. स्टंपवरचा त्यांचा नेम कधीच चुकला नाही. त्यांच्या क्रिकेट करिअर मधील चांगली खेळी म्हटले तर १९६१-६२ मध्ये त्यांनी ८३.७१ या सरासरीने ५८६ धावा केल्या ती म्हणावी लागेल. विजय मांजरेकर यांना स्थानिक सामन्यांमध्ये बाद करणे म्हणजे ही एक कठीण गोष्ट त्यावेळी होती. १९६० सालानंतर मात्र त्यांच्या फलंदाजीच्या कक्षा अरुंद व्हायला लागल्या. स्टंपपासून चेंडूला दूर ठेवण्याचा त्यांचा कल वाढला. तरीपण त्यांना बाद करणे कठीणच असे.
विजय मांजरेकर यांचा एक वेगळा रेकॉर्ड होता तो म्हणजे ३२०८ धावा ज्या त्यांनी कसोटी सामन्यात केल्या त्यामध्ये एकही षटकार नव्हता. म्हणजे त्यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीमध्ये एकही षटकार मारलेला नव्हता. तो रेकॉर्ड पुढे जोनाथन ट्रॉट ने मोडला.
विजय मांजरेकर यांना कसोटी क्रिकेट सोडावे लागले ते अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये. १९६५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शतक करूनही त्यांना पुढच्या कसोटी सामन्यामधून काढले गेले.
विजय मांजरेकर यांनी ५५ कसोटी सामन्यामध्ये ३२०८ धावा ३९.१२ च्या सरासरीने केल्या. त्यामध्ये त्यांची ७ शतके आणि १५ अर्धशतके होती. त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद १८९. त्याचप्रमाणे त्यांनी १९८ फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यांमध्ये १२, ८३२ धावा केल्या त्या ४९.९२ या सरासरीने. त्यामध्ये त्यांनी ३८ शतके आणि ५६ अर्धशतके केली. त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती २८३.
विजय मांजरेकर यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी १८ ऑक्टोबर १९८३ रोजी चेन्नई येथे निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply