नामवंत कथाकार प्रकाश संत यांचा जन्म १६ जून १९३७ रोजी बेळगाव येथे झाला.
प्रकाश नारायण संत हे अत्यंत तरल आणि मनाला भिडणारं लेखन करणारे लेखक म्हणून लोकप्रिय होते. त्यांचे वडील नारायण संत हे उत्तम ललित लेखक होते आणि आई इंदिरा संत या श्रेष्ठ कवयित्री होत्या. घरातील सुसंस्कृत व साहित्यिक वातावरणाचा प्रकाश संतांवर फार मोठा परिणाम झाला. मात्र ते १० वर्षाचे असतांनाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातून भूरचनाशास्त्रात बी.एस्सी. केल्यानंतर प्रकाश संतांनी पुणे विद्यापीठातून याच शास्त्रात एम.एस्सी. व पीएच.डी. केले. यानंतर ते कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून १९६१ साली रुजू झाले.
त्यांनी सत्यकथा मासिकातनं कथा लिहायला सुरुवात केली होती. ते उत्तम चित्रकारही होते. त्यांच्या ‘लंपन’ या पौगंडावास्थेतल्या शाळकरी मुलांचं भावविश्व उलगडून दाखवणाऱ्या (काहीशा आत्मचरित्रपर) कादंबऱ्या न वाचलेला रसिक मराठी वाचक दुर्मीळच! वनवास, शारदा संगीत, पंखा आणि झुंबर या चार कादंबऱ्यांमधून लंपन आणि त्याची मैत्रीण सुमी, इतर मित्रमंडळी, लंपनच्या मनातली सुमीविषयीची हुरहुर, प्रेम हे सर्व संतांनी तपशीलवार, पण सुंदर प्रकारे रेखाटलंय आणि या चारही कादंबऱ्या मराठी साहित्यविश्वात एक वेगळंच स्थान राखून आहेत. स्वतः चित्रकार असल्याने संतांनी स्वतः रेखाटलेली चित्रं त्या कादंबऱ्यांच्या सौंदर्यात भर घालतात.
प्रकाश नारायण संत यांचे १५ जुलै २००३ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply