वसंत कृष्णाजी शिंदे यांचा जन्म १४ मे १९१२ रोजी नाशिकजवळच्या भंडारदरा या गावात झाला. त्यांच्या आईचे नाव आनंदीबाई असे होते. ती पाच भावंडे होती. नाशिकला त्यांच्या वडिलांचे घडाळ्याचे दुकान होते. वसंत शिंदे यांच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि त्याबरोबर ते घडाळ्याचे दुकानही बंद झाले. त्यामुळे त्यांचे कुटूंब उघड्यावर पडले. वसंत शिंदे यांचे शिक्षण चौथीपर्यंतच झाले. त्यांनी त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षी ‘ हिंदुस्थान फिल्म कंपनी ‘ मध्ये कामाला सुरवात केली. त्या कंपनीमध्ये दादासाहेब फाळके होते. दादासाहेब फाळके हे १९२५ साली ‘ चतुर्थीचा चंद्र ‘ हा मूकपट तयार करत होते. वसंत शिंदे यांचा विनोदी स्वभाव आणि अंगकाठी बघूं त्यांनी त्यांना त्या चित्रपटात गणपतीची भूमिका देऊ केली. त्यानंतर वसंत शिंदे यांनी गोकर्ण महाबळेश्वर , वाली सुग्रीव , संत जनाबाई , भक्त प्रल्हाद , बोलकी तपेली अशा सुमारे १९ मूकपटात कामे केली. दादासाहेब फाळके हे त्या सर्व चित्रपटाचे दिग्दर्शक होते.
वसंत शिंदे यांनी हिंदुस्थान फिल्म कंपनीच्या सर्व खात्यात म्हणजे सुतारखाते, छायाचित्रण , संकलन , वस्तुभांडार, छपाई , पेन्टिंग , कपडेपट, रंगभूषा खात्यात कामे केली. पुढल्या काळात मात्र त्यांनी जी ही सर्व कामे केली त्याचा खूप फायदा झाला. त्या कंपनीमध्ये वसंत शिंदे यांनी पाच वर्षे काम केल्यानंतर त्यांनी ते काम सोडले कारण त्या कामाचा त्यांना कंटाळा आला.
१९२९ साली ते पुण्याच्या ‘ अरुणोदय ‘ या नाटक कंपनीमध्ये गेले. तेथे त्यांना प्रथम ‘ गिरणीवाला ‘ या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. वसंतरावांचा त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षी जळगाव येथील शांताबाई जगताप यांच्याशी विवाह झाला. ते ‘ राजाराम नाटक मंडळी ‘ मध्ये काम करत असताना त्यांचा परिचय चिंतामणराव कोल्हटकरयांच्याशी झाला. त्यावेळी ‘ भावबंधन ‘ या नाटकाच्या तालमी सुरु होत्या , वसंत शिंदे त्या नाटकात ‘ मोरेश्वर ‘ भूमिका ‘ करायचे. परंतु याच नाटकांपासून त्यांना चिंतामणराव कोल्हटकर यांच्याकडून अभिनयाचे शास्त्रोक्त शिक्षण मिळाले. कोल्हटकरांनी त्यांना ‘ मानसपुत्र ‘ म्ह्णून मानले होते. पुढे वसंत शिंदे यांनी प्रेमसंन्यास , भावबंधन , पुण्यप्रभाव , राजसंन्यास, सौभद्र , बेबंदशाही यामधील गाजलेल्या भूमिका चिंतामणराव कोल्हटकर यांनी करवून घेतल्या. चिंतामणराव यांनी पुढे वसंत शिंदे यांना भालजी पेंढारकर यांच्याकडे जाण्यासाठी सुचवले आणि ते योग्यच झाले असेच म्हणावे लागेल कारण भालजी पेंढारकर यांच्या ‘ सासुरवास ‘ या चित्रपटात त्यांनी सुभन्याची भूमिका केली आणि त्या भूमिकेपासून वसंत शिंदे यांच्याकडे खूप चित्रपट येऊ लागले.
वसंत शिंदे यांनी १९४६ पासून १९९६ पर्यंत ४० दिग्दर्शकांकडे कामे केली अगदी दादासाहेब फाळके यांच्यापासून संजय सुरकरपर्यंत जवळ जवळ सर्वच म्हणावे लागतील. त्यांना ‘ सांगत्ये ऐका ‘ या चित्रपटासाठी ‘ दादासाहेब फाळके गौरवचिन्ह ‘ मिळाले, तर नाटक आणि चित्रपट यांच्यामधील भूमिकांसाठी ‘ दिनकर कामण्णा सुवर्णपदक ‘ मिळाले , शांताबाई हुबळीकर पुरस्कार , बालगंधर्व पुरस्कार , चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. लावणी भुलली अभंगाला , प्रेमसंन्यास , गाव बिलंदर बाई कलंदर , भावबंधन या नाटकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या. वसंत शिंदे यांनी ७५ वर्षात ११ मूकपट , १८५ चित्रपट , १०५ नाटके आणि ५७ लोकनाट्ये यातून अभिनय केला. हा इतका मोठा ७५ वर्षाचा प्रवास पाहिला की आपण थक्क होऊन जातो. आणि इतके करूनही अत्यंत साधेपणा , चांगले मन , सर्वांमध्ये मिसळून रहावयाचे यामुळे ते कधी चित्रपटामधला माणूस वाटले नाहीत . मला आठवतंय मुबंईत एका मैदानावर कार्यक्रम चालला होता बऱ्यापैकी थंडी पडली होती, आम्ही मित्र अगदी मागे झाडाखाली शेकोटी करत होतो तितक्यात वसंत शिंदे आणि गणपत पाटील तेथे आले त्यांना आम्ही शेकोटीजवळच्या खुर्च्या दिल्या आणि ते तिथे आमच्यात शकोटी जवळ येऊन बसले . अत्यंत साधेपणाने गप्पा सुरु झाल्या कोण कुठला, काय करतो वगैरे . त्यांच्याशी बोलत असताना त्यांचा चित्रपटामधील ‘ बोला साहेब ‘ हे दोन शब्द डोक्यात होते आणि गणपत पाटलांचे ‘ आत्ता ग बया ‘.
वसंत शिंदे यांच्या सर्वच चित्रपटांची नावे घ्यायची झाली तर यादी खूप मोठी आहे तरीपण सांगायचे झाले तर पेडगावचे शहाणे , गुळाचा गणपती, धाकटी जाऊ , सांगत्ये ऐका , मोहित्यांची मंजुळा, सवाल माझा ऐका , पवनाकाठचा धोंडी , भालू , सतीचं वाण , बोट लावीन तिथे गुदगुल्या , आली अंगावर . १९९९ साली त्यांचे ‘ विनोदवृक्ष ‘ नावाचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले.
अशा ह्या हरहुन्नरी कलाकार आणि खऱ्या अर्थाने मूकपटापासूनचा साक्षीदार असलेले ‘ विनोदवृक्ष ‘ वसंत शिंदे यांचे ४ जुलै १९९९ रोजी निधन झाले.
– सतीश चाफेकर.
Leave a Reply