राजकुमारी ‘ म्हणजे राजकुमारी दुबे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९२४ साली बनारस मधील वाराणसी मध्ये झाला. त्यांना लहानपणी गाणे शिकण्याची संधी मिळाली नाही परंतु घरच्यांनी मात्र तिला कधी आडकाठी केली नाही , तर गाण्यासाठी उत्तेजनच दिले. त्यानी पहिले गाणे वयाच्या १० व्या वर्षी गायले . त्यांनी आपले करिअर स्टेजपासून सुरु केले. प्रकाश पिक्स्चर्सचे विजय भट आणि प्रकाश भट यांनी त्याना एका स्टेज शोजमध्ये पाहिले. तेव्हा त्यांनी सांगितले तू स्टेजचे काम सोड तुझा आवाज खराब होईल कारण त्यावेळी माईक सिस्टीम नव्हती. त्यानंतर त्या प्रकाश पिक्चर्स मध्ये कामाला लागल्या. राजकुमारी यांचा पहिला चित्रपट ‘ संसार लीला नयी दुनिया ‘ हा होता. पुढे त्यांना १९३३ मध्ये’ आँख का तारा ‘ आणि ‘ तुर्की शेर ‘ या दोन चित्रपटात महत्वाच्या भूमिका मिळाल्या.
१९३४ साली निघालेल्या ‘ भक्ती के भगवान ‘ आणि ‘ इन्साफ की टोपी ‘ या दोन चित्रपटात त्यांनी नायिकेच्या भूमिका केल्या. त्या दिवसात त्यांनी झकारिया खान यांच्याबरोबर बरोबर काम केले. हे झकारिया खान म्हणजे अभिनेता अमजाद खान यांचे वडील , जे चित्रपट सृष्टीत ‘ जयंत ‘ नावाने ओळखले जायचे. त्यावेळच्या सुप्रसिद्ध संगीतकार लल्लुभाई यांच्याकडे त्यांनी गाणी गायली. त्यावेळी १९३५ पर्यंत त्यांनी नई दुनिया , रेड लेटर , बॉम्बे मेल , बम्बई की सेठानी , शमशेर-ए-अरब या चित्रपटातून कामे केली. परंतु त्यांनी चित्रपटात कामे करणे सोडून दिले कारण खाण्या-पिण्यावर बंधने येत , तब्येत जपावी लागे , नायिका म्हटल्यावर तब्येत संभाळावी लागे. त्याचा त्यांना कंटाळा आला. मग त्यानी रत्नमाला , शोभना समर्थ यांना आपला आवाज दिला.
त्यांनी खूप गुजराथी आणि पंजाबी गाणी गायली. त्यावेळी शमशाद बेगम , जोहराबाई अंबालेवाली , ज्युथिका रॉय , झीनत बेगम या सुप्रसिद्ध गायिका होत्या . शमशाद बेगम आणि जोहराबाई अंबालेवाली ह्याचा आवाज वरच्या पट्टीतला होता तर राजकुमारीचा मृदू होता आणि गोड होता. राजकुमारी यांनी मुकेश बरोबर गाणी गायली , त्यांनी के. सी. डे बरोबर गाणी नाही गायली परंतु त्यांनी कंपोज केलेली गाणी गायली. त्यांनी नूरजहाँबरोबर १९४३ साली ‘ नौकर ‘ या चित्रपटात गाणे गायले. त्यावेळी लता मंगेशकर यांचा उदय होत होता. राजकुमारी यांनी उशीरा व्ही . के. दुबे यांच्याशी लग्न केले , ते उत्तर प्रदेश मधील बनारस येथे रहात , तेथे त्यांचे दुकान होते. पुढे ते मुंबईला आले. राजकुमारी यांनी राजकपूर आणि मधुबाला याच्या ‘ नील कमल ‘ चित्रपटात गाणे गायले त्याचप्रमाणे बावरे नैन , हलचल या चित्रपटात गाणी गायली. महल या चित्रपटातील ‘ घबराकर हम सर को टकराए ‘ हे गाणे गाजले ‘ हाये मेर दिल ‘ हे पण त्यांचे महल मधले गाणे गाजले. त्यावेळी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचा वेगाने उदय होत होता त्यामुळे हळूहळू आधीच्या गायिका मागे पडू लागल्या.
त्याचवेळी १९५२ मध्ये ओ. पी. नय्यर यांचा पहिलाच चित्रपट ‘ आसमान ‘ . या चित्रपटात ‘ गाण्याच्या वेळी नय्यर साहेब आणि लता मंगेशकर यांच्यात गैरसमज निर्माण झाले आणि मग ते गाणे नय्यर साहेबानी राजकुमारी कडून गाऊन घेतले. त्यानंतर नय्यरसाहेबांनी लता मंगेशकरडून एकही गाणे गाऊन घेतले नाही. ते गाणे गाजले त्या गाण्याचे शब्द होते , ‘ जब से पी संग नैना लागे ‘ , गाणे लिहिले होते गीतकार प्रेम धवन यांनी .
त्यांनतर राजकुमारी जास्त कुठे दिसल्या नाहीत कारण प्रत्येकजण लता मंगेशकर , आशा भोसले यांच्याकडून जास्त गाणी गाऊन घेऊ लागला कारण त्यांचा झपाटा विलक्षण होता त्यामुळे अनेक गायिका मागे पडल्या. १९७२ साली नौशाद ‘ पाकिजा ‘ चित्रपट करत होते. गाण्याचे रेकॉर्डिंग चालू होते , कोरस गाणाऱ्या काहीजणी उभ्या होत्या. अचानक त्यांचे कोरस गाणाऱ्यांच्या मागच्या चेहऱ्याने लक्ष वेधले , आपला चेहरा नीट दिसणार नाही असा एकजण प्रयत्न करत होती . नौशादने तो चेहरा ओळखला ती होती राजकुमारी. काळाच्या विळख्यात ती पार होलपटलेली होती. नौशादने तिला सन्मानाने बोलवले इतक्या वर्षात काय घडले ते त्यांना कळले त्यांनी तिला त्याच पाकिजा चित्रपटात मोठे गाणे गाऊन घेतले, ते गाणे होते ‘ हर दिन तो बीता ‘ . राजकुमारीने ‘ ‘किताब ‘ या चित्रपटात शेवटचे गाणे गायले , त्या चित्रपटाला संगीत दिले होते आर.डी.बर्मन यांनी. ह्या चित्रपटात ह्या गाण्यावर अभिनय केला होता दिना पाठक यांनी .मधून मधून ती काही टी.व्ही. चॅनेलच्या कार्यक्रमातून दिसली होती.
मी राजकुमारीला एका कार्यक्रमात मुंबईला पाहिले होते . त्यावेळी त्यांची स्वाक्षरी घेतली होती. तिने ‘ महल ‘ मधले गाणे त्यावेळी म्हटले होते. आणखी एक-दोन गाणी म्हटली होती. भारतीय सिनेमात पाहिले पाश्वगायन करणारी पहिली स्त्री गायिका असे म्हटले जाते , किंवा सुरवातीची स्त्री गायिका असे म्हटले जाते ती कुठे गेली हे कुणालाच कळले नाही. कुणी म्हणत ती कुठेतरी आश्रम किंवा वृद्धाश्रमात रहात होती. तिचे अत्यंत गरिबीत निधन झाले , ते कधी झाले त्याची नीट तारीखही सापडत नाही , साल मात्र सापडले ते होते २०००. आजही तिचे काही विडिओ यू ट्यूब वर बघण्यास मिळतात .
— सतीश चाफेकर.
Leave a Reply