भारताची राज्यघटना, नागरिकांचे कर्तव्य, नागरिकांचे अधिकार आणि लोकशाहीसाठीची आपली कटिबद्धता यांची आठवण करून देणारा हा सण म्हणजे एक प्रकारे येणार्या पिढ्यांवर लोकशाहीचे संस्कार करणारा, लोकशाहीमध्ये पार पाडावयाच्या जबाबदारीबद्दल जागरूक करणारा असा उत्सव आहे.
२६ जानेवारी १९५० रोजी देशाचा पहिला प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. पण हा प्रजासत्ताक दिन राजपथावर नव्हे, तर इर्विन स्टेडियम (सध्याचं नॅशनल स्टेडियम) वर झाला. त्याला आज ‘मे. ध्यानचंद स्टेडियम’ म्हणून ओळखले जाते. त्यादिवशी ध्वजाला ३१ तोफांची सलामी दिली गेली होती, त्यानंतर ध्वज फडकवण्यात आला. पहिला समारोह दुपारनंतर साजरा करण्यात आला. या वेळेस पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद ६ घोड्यांच्या बग्गीतून गव्हर्नमेंट हाउसमधून दुपारी २.३० वाजता निघाले. कॅनॉट प्लेस व ल्यूटेन्स झोन याला फेरी मारत, त्यांची फेरी स्टेडियमच्या आत पोहोचली व ३.४५ वाजता सलामी मंचापर्यंत पोहोचली, तेव्हा तिरंग्याला ३१ तोफांची सलामी देण्यात आली. विशेष म्हणजे, १९५० ते १९५४ पर्यंत प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम इर्विन स्टेडियम, किंग्सवे, लाल किल्ला, रामलीला मैदान आदी ठिकाणी झाला. पण १९५५ पासून प्रजासत्ताक दिन राजपथावर साजरा करण्याची परंपरा सुरु झाली. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम राजपथावर मोठ्या उत्साहात होतो. या कार्यक्रमानिमित्त आयोजित करणाऱ्या संचलनाची सुरुवात, रायसीना हिल्सवरुन होते. इथून राजपथ, इंडिया गेट मार्गे लाल किल्ल्यावर येऊन ती संपते. यानिमित्त राजपथावर भारताची ताकद आणि संस्कृतीची झलक पहायला मिळते. या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आशियान शिखर परिषदेच्या नेते हजर राहणार आहेत. या मध्ये सुलतान हसनल बोल्काय (अध्यक्ष, ब्रुनेई), ह्युन सेन (पंतप्रधान, कंबोडिया), जोको विडोडो (राष्ट्राध्यक्ष, इंडोनेशिया), थाँगलून सिसूलिथ (पंतप्रधान, लाओस), नजीब रजाक (पंतप्रधान, मलेशिया), आंग सान सू की (स्टेट कौन्सीलर, म्यानमार), रोड्रिगो रोआ ड्युआर्टे (राष्ट्राध्यक्ष, फिलिपाइन्स), ली ह्यसीन लूंग (पंतप्रधान, सिंगापूर), प्रायुथ चान ओचा (पंतप्रधान, थायलंड), न्ग्युएन झुआन फुक (पंतप्रधान, व्हीएटनाम) समावेश आहे. २०१६ मध्ये देशाच्या इतिहासात पहिल्यांदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय जवानांसह फ्रान्सच्या सैनिकांनीही सहभाग घेतला. तब्बल ६७ वर्षांनी ही ऐतिहासिक घटना घडली. या कार्यक्रमासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रांसवा ओलांदा हे प्रमुख पाहुणे होते.
जगातील विविध देशांच्या प्रमुखांनी आजवर या कार्यक्रमास हजेरी लावलेली आहे. प्रमुख पाहुणे होण्याचा मान इंग्लंड आणि फ्रान्सला पाच वेळा, भूतानला चार वेळा तर रशियाला चार वेळा मिळाला आहे. शेजारील देश, आफ्रिकेतील देश, तसेच युरोपातील देशांच्या राष्ट्रप्रमुखांना ही संधी देण्यात आलेली आहे. २९ जानेवारी रोजी मावळणाऱ्या सूर्याच्या साक्षीने होणाऱ्या कार्यक्रमाने ‘प्रजासत्ताक दिन सोहळा’ अधिकृतरीत्या संपतो. याला बीटिंग द रिट्रिट असे म्हणतात. नॉर्थ आणि साउथ ब्लॉक जवळ होणाऱ्या या कार्यक्रमात विविध बँड्सचा समावेश असतो. या तीन दिवसांमध्ये राष्ट्रपती भवन आणि परिसरास दिव्यांची रोषणाई केली जाते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply