अग्नीचा शोध लागण्यापूर्वीचा आदिमानव शिकार करून मिळेल ते जनावर किंवा पक्षी फाडून कच्चाच खात असे. एकदा मांसभक्षणाची सवय लागल्याने मग त्याला दुसरे काही आवडत नसणार. आजच्यासारखे मांसाहारी आणि शाकाहारी गट तेव्हा निर्माण व्हायचे काही कारणच नव्हते. कारण अशी निवड करण्याएवढ्या गोष्टींची एकतर उपलब्धता नव्हती आणि माणूसही एवढा प्रगल्भ झाला नव्हता. हा, नाही म्हणायला दिवसचे दिवस फिरूनही जेव्हा त्याला शिकार मिळत नसेल तेव्हा त्याचे लक्ष झाडाकडे जात असणार आणि नाईलाजास्तव झाडाचा पाला, कंदमुळे अथवा फळे खाऊन तो वेळ मारून नेत असणार.
जंगलात वीज पडून लागलेले वणवे त्याने पाहिले होते आणि होरपळून गेलेले प्राणी खाऊन त्याची चव वेगळी आणि बरी लागते हे त्याच्या हळूहळू लक्षात येऊ लागले होते. पण परत वीज पडली तरच वणवा पेटणार तोपर्यंत काय करणार? पण एका बाजूला त्याची खटपट चालू होती आणि एका गारगोटीवर दुसरी गारगोटी घासल्यावर त्यातून ठिणग्या पडतात हे त्याच्या लक्षात आले. पण त्या ठिणग्यातून आपण लाकूड पेटवू शकतो हे तंत्र समजेपर्यंतही खूप काळ लोटला. ठिणगी म्हणजे पलिता नव्हे. लाकूड ज्यांनी पेटवले त्यांना ते पेटवणे किती अवघड आहे ते लक्षात येईल. पण मग ठिणगीने जर परस्पर लाकूड पेटवता येत नाही तर प्रथम ठिणगी पाडून वाळलेला पालापाचोळा पेटवावा आणि त्या आधारे लाकूड पेटवावे हे ज्ञान त्याला झाले त्यासाठी खूप काळ जावा लागला. एकदा माणसाला अग्नी पेटवता येतो हे लक्षात आल्यावर मग सबंध प्राणी त्यात भाजायची कला त्याने अवगत करून घेतली.
मग जाळात संपूर्ण प्राणी टाकला तर तो जळतो. त्यावरून त्याला तीन दगडांची कल्पना सुचली. तीच आपली पहिली चूल. दहा हजार वर्षांपूर्वी माणूस जेव्हा शेती करू लागला तेव्हा मात्र जेवणासंबंधी आणि एकूणच स्वयंपाकासंबंधी बऱ्याच गोष्टी हळूहळू बदलू लागल्या. मोहेंजोदडो संस्कृतीच्या उत्खननातून खापरांच्या भांड्यांचा वापर तेव्हा होत असे हे लक्षात आले. म्हणजे तीन दगड मांडून त्याखाली जाळ पेटवावा आणि त्या तीन दगडांवर मातीचे एखादे भांडे ठेवून त्यात स्वयंपाक करावा एवढी प्रगती झाली.
– अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply