रेषा बोलती कर्माच्या
कर मध्ये विसावल्या
परी कर्म घडती तैसे
प्रारब्ध निर्माण होती
संकट नाश तो तह ठरवीती
दोन्ही हात पुढे येति
पण योग्य ते धर्म निर्मितीसाठी
जगण्यास ते न लगे!!
अर्थ–
एका कादंबरीतले वाक्य मनाला खूप भावले,” कर्म प्रारब्ध ठरवीते, पण त्यासाठी तैसे कर्म घडावे लागते”.
मनाला अगदी पटले हे वाक्य, हातावरच्या रेषा खूप प्रगती, सुख, पैसा दाखवितात, अहो तुमचा मुलगा राजयोग घेऊन आलाय, चिंता नसावी. असे म्हटले की त्या मुलाचे आई वडील जास्त चिंतेत पडतात कारण राजयोग लिहिलाय खरा पण जर तो शिवाजी महाराजां सारखा नसेल तर? जर कुतुबशहा, निजामशहा, आदिलशहा यांच्या सारखा निघाला तर? म्हणजेच नुसता हातावर राजयोग असून काही होत नाही त्यासाठी तसे कार्य, कष्ट करावे लागतात. नारायणाचा जन्मचं मुळी राष्ट्र कार्यासाठी, धर्म वाढविण्यासाठी झाला होता पण घरातल्या बंद खोलीत बसून ‘चिंता करितो विश्वाची’ ऐवजी आज आईने जेवायला काय बरे केले असेल हा विचार केला असता तर खुद्द रामराया ही depression मधे गेले असते. म्हणून कर्म तुमचे भविष्य, नशीब ठरवते हे मानणे महत्वाचे आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंग यांच्याशी पुरंदर येथे तह केला. याचा अर्थ कार्य तडीस नेण्यासाठी माणसाला कधी कधी चार पावले मागे जाणे आवश्यक असते पण तह म्हणजे भ्रष्टाचारास बढावा देणे अजिबात नाही. एखाद्या राजाने आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी केलेली तडजोड म्हणजे तह पण जर तीच तडजोड स्वतःसाठी केवळ आपले काम पूर्ण व्हावे म्हणून काही पैसे देऊन केली तर तो तह ठरत नाही त्याला भ्रष्टाचारास फूस लावणे म्हणावे. स्वार्थ साधण्यासाठी केलेली तडजोड ही भ्रष्टाचार यात मोडते तर धर्मासाठी, राज्य कल्याणासाठी, तसेच जनतेच्या हितासाठी केलेली तडजोड तह ठरते. हो मी 400 वर्षांपूर्वी च्या राजकारणा बद्दल बोलतोय आता च्या काळात होणारे राजकीय तह हे केवळ स्वतः साठी असतात म्हणजे त्यांना काय म्हणावे हे मी वेगळे सांगायला नको. म्हणून स्वतःचे नशीब, प्रारब्ध चांगले करायचे असेल तर त्यासाठी चांगले कर्म घडणे गरजेचे आहे.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply