नवीन लेखन...

‘रेशमी’ गोणपाट…

रात्रीचे अकरा वाजून गेलेले असताना सतरा वर्षांची मुलगी, एका खेड्यातील घरातून बाहेर पडते व पळत जाऊन रेल्वे स्टेशन गाठते. स्टेशनमध्ये उभ्या असलेल्या चेन्नईला जाणाऱ्या गाडीत ती चढते. खिडकी शेजारील एका बाकड्यावर बसल्यावर गाडी स्टेशन सोडते. गाडीच्या लयबद्ध आवाजाने तिचा डोळा कधी लागतो हे तिलाही समजत नाही.
तिच्या डोळ्यासमोर लहानपणापासूनची क्षणचित्रे एकापाठोपाठ एक येऊ लागतात. आंध्रमधील एका गरीब कुटुंबात तिचा जन्म झाला. रामल्लू व सरसम्माच्या पोटी नको असताना जन्माला आलेलं हे अपत्य. घरच्या गरीबीनं तिला चौथीच्या पुढे शिक्षण घेऊ दिलं नाही. शाळा सुटली. ती आईला घरकामात मदत करु लागली. रंगानं सावळी असली तरी नाकी डोळी ती आकर्षक होती. वयात आल्यावर येणारे जाणारे तिला पाहूनच घायाळ होऊ लागले. आई वडिलांना तिची दिवसेंदिवस चिंता वाटू लागल्याने एका बैलगाडीवाल्याशी तिचं लग्न लावून दिल्यावर घरातील एक ‘खाणारं तोंड’ कमी झाल्याचं त्यांना समाधान झालं.
बैलगाडीवाला पती व त्याच्या आई वडिलांच्या अपेक्षा हिच्याकडून पूर्ण न होऊ शकल्याने त्यांनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. शेवटी तिने त्या रात्री पळून जाण्याचा निर्णय घेतला व रेल्वेत बसल्यावर चेन्नईच्या दिशेने तिचा जीवनप्रवास सुरु झाला.
चेन्नईत तिची एक नातेवाईक होती. तिच्याकडे ती पोहोचली. शहरातून रस्त्यावर फिरताना भिंतीवर लावलेली चित्रपटांची रंगेबेरंगी पोस्टर्स ती टक लावून पाहत रहायची. त्यावर दिसणाऱ्या कलाकारांबद्दल तिला कमालीचं औत्सुक्य होतं. कामाच्या शोधात असताना तिला चित्रपटात छोट्या भूमिका करणाऱ्या एका अभिनेत्रीच्या घरी मोलकरणीचं काम मिळालं. तिची कामाबद्दलची निष्ठा पाहून त्या अभिनेत्रीनं स्वतःची मेकअप असिस्टंट म्हणून तिला काम करण्याची संधी दिली.
त्या अभिनेत्रीकडे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कॅमेरामन यांची ये-जा होत असे. एके दिवशी एक नामवंत निर्माता आपल्या आलिशान गाडीतून त्या अभिनेत्रीकडे आला. तेव्हा ही मुलगी त्याचा रूबाब पाहण्यात दंग झाली. त्या अभिनेत्रीने तिला कुत्सितपणे विचारले, ‘काय गं, अशा आलिशान गाडीतून फिरण्याची दिवास्वप्नं तर तू पहात नाहीस ना?’ त्यावर तिनं तिच्या नजरेला नजर देत उत्तर दिलं, ‘अशाच आलिशान गाडीतून एक दिवस मी आपल्याला भेटायला येईन.’ त्या मुलीचं नाव होतं, विजयालक्ष्मी वडलापती!
त्या अभिनेत्रीकडे येणाऱ्या विनु चक्रवर्ती या निर्मात्याने तिला चित्रपटात काम करण्याची संधी दिली. त्यांच्या पत्नीनं तिला इंग्रजी भाषा शिकवली व नृत्याचा क्लास लावला. चित्रपटातील कलाकार म्हणून तिचं पडद्यावर नाव ठेवलं, स्मिता आणि चित्रपटातील तिच्या भूमिकेचं नाव होतं ‘सिल्क’!
त्या चित्रपटात तिनं दारु विकणाऱ्या बिनधास्त मुलीची भूमिका केलेली होती. तिला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आणि एका नशिल्या झंजावाताची सुरुवात झाली. १९७९ च्या या चित्रपटानंतर तिच्याकडे निर्मात्यांच्या रांगा लागू लागल्या. प्रत्येक निर्मात्याला आपल्या चित्रपटात तिचे किमान एखादे तरी नृत्य असावे असे वाटू लागले. कित्येक निर्मात्यांनी आपले डब्यात पडलेल्या चित्रपटात तिचे नृत्य घालून पुन्हा प्रदर्शित केले व तुफान पैसे कमविले. ७९ ते ८३ या चार वर्षांत तिने २०० चित्रपटात काम केले. तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड व हिंदी अशा पाचही भाषेतील चित्रपटात आपल्या बिनधास्त अभिनयाने तिने रसिकांवर ‘न भूतो न भविष्यती’ अधिराज्य गाजवले.
पाचही भाषेतील मातब्बर कलाकारांसोबत तिने काम केले. नाव, प्रसिद्धी, पैसा आल्यावर त्या पाठोपाठ अहंकारही आला. पंधरा वर्षांच्या कारकिर्दीनंतर तिने दुसऱ्यांदा एका डाॅक्टरशी लग्नाचा जुगार खेळून पाहिला. त्या डाॅक्टरला तिच्या संपत्तीचा हव्यास होता. त्याने तिला चित्रपट निर्मिती करण्याचा सल्ला दिला.
चित्रपट निर्मिती पूर्ण झाली, मात्र तोपर्यंत तिच्याबद्दलचं प्रेक्षकांचं आकर्षण कमी झालेलं होतं. चित्रपट प्रदर्शित झाला आणि तिकीट खिडकीवर आपटला. मोठं नुकसान झालं. ती कर्जबाजारी झाली. देणेकऱ्यांचे फोन येऊ लागले. तिला नैराश्याने ग्रासले.
चित्रपट सृष्टीतून एकदा बाहेर पडल्यावर कोणीही दखल घेत नाही असं दिसल्यावर कित्येक कलाकार व्यसनाच्या आहारी जातातच. सिल्कच्या बाबतीतही तेच घडलं. ती रात्रंदिवस नशेच्या आहारी गेली. शेवटी १९९६ साली वयाच्या छत्तीसाव्या वर्षी तिनं राहत्या घरी पंख्याला लटकवून घेऊन आत्महत्या केली.
सतरा वर्षांच्या सिने कारकीर्दीत सिल्क स्मिताने ४५० चित्रपट केले. त्यातील २०० चित्रपट हे पहिल्या चारच वर्षातील आहेत. आजही कमल हसन व श्रीदेवी यांच्या ‘सदमा’ चित्रपटातील काम पाहिले की, तिला प्रेक्षकांनी एवढा अभूतपूर्व प्रतिसाद का दिला ते जाणवतं. तिच्या ‘कैदी’ या हिंदी चित्रपटातील ‘बांगोऽ बांगोऽ बांगोऽऽ’ या गाण्याने दरवर्षी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत अबालवृद्धांना थिरकायला लावलेले आहे. एका ‘बी ग्रेड’च्या अभिनेत्रीने सलग सतरा वर्षं पाचही भाषेतील चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली…
२०११ साली सिल्क स्मिताच्याच जीवनावर आधारित ‘दि डर्टी पिक्चर’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. तिची भूमिका विद्या बालनने साकारली. या तिच्या भूमिकेबद्दल तिला फिल्मफेअर व राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. चित्रपटाने १०० कोटींहून अधिक व्यवसाय केला…
‘दि डर्टी पिक्चर’चे अफाट यश पाहून तेलुगू व मल्याळम भाषेत देखील ‘सिल्क स्मिता’च्या जीवनावर चित्रपट निघाले व त्यांनीही भरपूर व्यवसाय केला…
अशाप्रकारे एका ओबडधोबड गोणपाटाचे चंदेरी मायानगरीने ‘सिल्क’मध्ये रुपांतर केले व काळाच्या ओघात ते वाहून दिसेनासे झाले…
– सुरेश नावडकर ११-१२-२०
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..