“अग शिल्पा, आवरलं का तुझं? चल आता निघायलाच हवं. नऊ चाळीसची अंधेरी पकडलीच पाहिजे नाहीतर ऑफिसला फार उशीर होईल.”
“हो मामा, मी तर केव्हाची तयार आहे.”
“अग, आज तुला दाखवून ठेवतो. पुढच्या सोमवारी तुझा इंटरव्ह्यू आहे ना? मुंबईची तुला सवय नाही. तू बायकांच्या डब्यात बस. मी शेजारच्याच डब्यात चढतो. चर्चगेटला उतरायचं. ते शेवटचंच स्टेशन आहे. त्यामुळे तूघाई करु नकोस उतरायची. सावकाश उतर. तिथून आपण माझ्या ऑफिसमध्ये जाऊ. मग मी तुला इंटरव्हूला जायचंय ना ते ‘चावला अँड खावला इंपोर्ट एक्स्पोर्टचं’ ऑफिस दाखवीन जवळच आहे. दोन दिवस माझ्याबरोबर आलीस म्हणजे सवय होईल तुला गर्दीची. मग इंटरव्ह्यूच्या दिवशी टेन्शन नाही येणार तुला.
“अहो, किती वेळा तेच तेच सांगणार आहात तिला? ती का आता लहान आहे? चांगली एम.बी.ए. झालीय, पण तुमचं मात्र एखाद्या लहान पोराला सांगावं तसं चाललंय.” मामी.
“अग, ही मुंबई आहे. नगर नाही. इथली गर्दी आणि त्यातही ती ऑफिस टाइमच्या लोकलची. अग, नुसती गर्दी पाहूनच रोज जाणाराही हबकतो तर हिची काय कथा? इंटरव्हूला जाईपर्यंतच चिपाड होईल तिचं!”
“मामा, तू नको काळजी करून. अरे, मी कॉलेजची ट्रेकिंग कॅप्टन होते. चांगली धडधाकट आहे. बघच तू.”
“अग, सोड ते तुझं ट्रेकिंग की फेकिंग. या लोकलने जायचं ना तर असे छप्पन ट्रेकिंगवाले आडवे होतील.”
“हे बघ मामा, आपल्याला आता घाई आहे ना? मग या विषयावर आपण नंतर बोलू, चल, मी तयार आहे. माझी सगळी कागदपत्रे तुझ्या बॅगेत ठेवली आहेत. मी नुसती मोकळ्या हाताने गाडीत चढू का? का देतोस ती बॅग माझ्याकडे?”
“नको नको. तू आपली चर्चगेटला उतरायचं काम कर. बाकी मी सांभाळ तो सगळं.”
“अहो, ती जुनाट बॅग कशाला घेताय? तुमची नवी घ्या ना. ती द्या आता फेकून. फार वापरलीत.”
“अग, मुद्दाम घेतलीय. ऑफिसमध्येच ठेवीन ती. इंटरव्ह्यूच्या दिवशी शिल्पाला देईन माझी नवी बॅग, कागदपत्रंही नीट राहतील ऑफिसमध्ये, शिवाय दोन बॅगा न्यायची कटकटही नाही राहणार.”
शिल्पा आणि मामा चर्चगेटला नीट उतरले. मामांच्या ऑफिसमध्ये पोचले. मामांनी डबा काढून कागदपत्रं नीट कपाटात ठेवावीतम्हणून बॅग उघडली. त्यांना शॉकच बसला! बॅग रिकामी! एक डबा होता जेवणाचा पण तोही रिकामा!
“शिल्पा! अग बॅगेत सामान ठेवलंच नव्हतं का? आणि हा मोकळा डबा? तो पण खरकटा?”
“अरे मामा, हा आपला डबा दिसत नाही.
“नाही? मग कुणाचा? ही बॅगतरी आपलीच आहे ना? अगदी आपल्या बॅगसारखीच दिसतेय. वर नावाची आद्याक्षरं पण माझीच आहेत. के.डी.! कुलकर्णी दिगंबर!”
त्यांचा ओरडा ऐकून ऑफिसमधली मंडळी जमा झाली. काय प्रकार आहे हे कुणालाच कळेना. बॅग तर कुलकर्णीचीच दिसत होती! शिल्पा डबा पाहत म्हणाली, “मामा, हा डबा आपला नाही पण या डब्यावर हे नाव बघ कुणाचं आहे. किशोर देशपांडे!”
जी “हे कोण बुवा देशपांडे? अजबच प्रकार दिसतोय!?”
मामांचं तर डोकंच सुन्न झालं. शिल्पाच्या इंटरव्हूची सर्व कागदपत्रं त्या बॅगेत होती. ती फार नर्व्हस झाली. आता इंटरव्हूचं कसं होणार? सगळाच घोळ झाला होता.
“अरे कुलकर्णी, असं डोक्याला हात लावून बसून राहून कसं चालेल? अरे, सोपी गोष्ट आहे. तुझ्या बॅगसारखीच त्या देशपांड्याची बॅग असणार. वर नावही के.डी.च असणार. आपली बॅग समजून त्याने तुझी उचलली असणार.” जोश्याने शेरलॉक होम्सप्रमाणे तर्क केला. पण तो पटण्यासारखा होता खरा.
“अरे पण शहाण्या, तो आपला डबा काय ऑफिसला जायच्या आधीच खाऊनघेईल का?” सावंत.
“अरे, एखादा रात्रपाळीचा असेल. अंधेरी लोकलने आला. लोकल पुन्हा मागे जाणार तेव्हा गर्दी आत शिरल्यावर तो बॅग घेऊन उतरला. घाईत त्याच्याच बॅगसारखी दिसणारी बॅग उचलली. दोन्ही बॅगा सारख्याच दिसत असणार त्यामुळे कुलकर्णीनाही त्या गर्दीत ही अदलाबदल लक्षात आली नसणार. आता असं करू.या किशोर देशपांडे नावाचे काही टेलिफोन नंबर आहेत का पाहू.” जोशी.
“हो हो. छान आयडिया आहे.” सावंतने लगेचच डिरेक्टरीवरुन दोन नंबर काढले आणि पहिलाच नंबर लागला. त्याने फोन कुलकर्णीला दिला.
“हॅलो,हॅलो, कोण? देशपांडे का?”
“हो. मी देशपांडेसाहेब, मी दिगंबर कुलकर्णी बोलतोय.”
“बोला. कोण आपण? काय काम आहे?”
“माफ करा साहेब. थोडा त्रास देतोय. अहो, आज सकाळी अंधेरी
लोकलमध्ये माझ्या बॅगची अदलाबदल झाली.”
“मग मी काय करू? रेल्वेत तक्रार करा!”
“साहेब, असं करू नका. फार महत्त्वाचे पेपर्स होते त्या बॅगेत.”
“कुलकर्णी, मी राहतो ठाण्याला. अंधेरीचा आणि माझा काय संबंध?”
“देशपांडे साहेब, कृपा करून मस्करी करू नका हो. माझी हात जोडून विनंती आहे. माझ्या भाचीचं फार मोठं नुकसान होईल बॅग नाही मिळाली तर. बॅग नाही मिळाली तर मलाच ठाण्याला जायची वेळ येईल हो.”
“तुमची भाची? कुलकर्णीसाहेब, तुमचा काहीतरी घोटाळा होतोय. जरा नीट सांगता का काय झालं ते?”
— विनायक अत्रे
Leave a Reply