पाच-दहा मिनिटांतच एक उंचीपुरी, गौरवर्णी, तरतरीत मुलगी आत आली. वेळेवर पोचतो की नाही यामुळे येणारा एक प्रकारचा अस्वस्थ भाव तिच्या चेहऱ्यावर उमटला होता. ती घाईने क्लार्ककडे आली आणि तिने विचारलं, “का हो, कुणी केदार देशपांडे आले आहेत का?”
त्याने माझ्याकडे बोट दाखवलं आणि पुन्हा फायलीत डोकं खुपसलं. इतकी सुंदर शिल्पाकृती समोर उभी असूनही तिच्याकडे ढुंकूनही न पाहण्याचा त्याचा तो अलिप्तपणा पाहून हा कुणीतरी पोचलेला महात्मा असावा असं मला वाटलं. माझी दृष्टी तर त्या शिल्पाकृतीने अगदी खिळवून टाकली होती. तिने मान वळवून माझ्याकडे पाहिलं आणि कपाळावर येणाऱ्या केसांच्या बटा अशा काही लाडिक झटक्याने मागे सारल्या की ते पाहून मी मंत्रमुग्ध झालो. माझ्या काळजाचे ते म्हणतात ना तसे हजार तुकडे झाले. माझ्याकडे पाहून तिने एक मंद स्मित केलं आणि मग तर काय ते हजार तुकडे जणू गरागरा फिरायलाच लागले! माझ्याजवळ येऊन ती म्हणाली, ‘आपणच का केदार देशपांडे! आपण शिल्पा जोशी?”
“हो. मीच शिल्पा जोशी, पण तुम्ही मला ते आपण वगैरे नाही म्हणालात तरी चालेल. नुसते शिल्पा म्हणालात तर आवडेल मला.” ती खूप मनमोकळी वाटली. नंतर म्हणाली.”मला थोडा उशीर झाला. या तुमच्या मुंबईची सवय नाही ना झाली अजून, अहो, एक लोकल चुकली आणि दहा-पंधरा मिनिटं उशीर झाला. फार वेळ नाही ना वाट पाहावी लागली? आमच्या वेंधळेपणाचा तुम्हाला मात्र फुकटचा त्रास झाला.”
“छे छे! अहो, त्रास कसला त्यात? माझाही बावळटपणा नाही का झाला? चला, त्या निमित्ताने आपली ओळख तर झाली. बरं, हे राहू द्या. आपण आधी आपल्या बॅगा ताब्यात घेऊ. तुमची कागदपत्रं एकदाची मिळाली म्हणजे बरं. मामांना फारच काळजी वाटते तुमची.”
“का? तुमच्यावर सोपवलीय का काय माझी जबाबदारी?” असं म्हणून तिने पुन्हा कपाळावरच्या बटा सारल्या आणि ती खळखळून हसली. तिच्या विनोदबुद्धीला दाद द्यावीशी वाटली.
“हो, चालेल की, पण तुला उशीर नाही ना व्हायचा?”
“नाही. तसं मी ऑफिसमध्ये सांगून आलोय. नो प्रॉब्लेम!”
आम्ही जवळच प्रीतम हॉटेलमध्ये गेलो. कॉफी मागवली. एकमेकांकडे, आजूबाजूला बघत बसतो. कुणी प्रथम सुरुवात करावी? मग मीच म्हणालो,
“काय? बरं आहे ना हॉटेल?”
“हो छानच आहे. आमच्या नगरला नाहीत अशी हॉटेल्स!”
“तुम्ही नगरला असता?”
“हो. एम. कॉम., एम.बी.ए. केलं. इथे आले होते एका इंटरव्ह्यूसाठी. फोर्ट विभागातच आहे एक कंपनी मेसर्स चावला अँड खावला इंपोर्ट एक्स्पोर्टर्स म्हणून. तिथे आहे एक जॉब.”
“काय? चावला अँड खावला?”
“का हो? काय झालं?”
“अहो, मी पण तिथेच आहे. सीनियर मॅनेजर!”
“अय्या, कम्माल आहे नाही? हौ सरप्राइझिंग!”
“अहो, कमाल कसली? आता माझी पंचाईत होणार!”
“म्हणजे?”
“म्हणजे माझ्यामागे काही नवीन शुक्लकाष्ट तर नाही लागणार?
“इश्श! शुक्लकाष्ट कसलं?”
“अहो, म्हणजे तुमची निवड होणार. मग आपली ओळख झाली म्हणून तुम्ही मामा मामींना घेऊन आमच्या घरी येणार पेढे द्यायला, मग आमच्या मातोश्री विचारणार, ‘अरे केदार, हीच का रेती शिल्पा? तूम्हणत होतास ती? बरी दिसते हा!”
“अच्छा! बरी दिसते काय? पण तू काही घाबरू नकोस केदार.” मी
अहोजाहो केलं तरी तिने अस्तुरे सोडलं नव्हतं. पुढे म्हणाली, “अरे, माझं आधीच ठरलंय. त्याच ऑफिसमध्ये एक मुलगा शोधलाय मामांनी. नोकरीचा कॉल आला ना तेव्हाच. झट मंगनी पट ब्याह!”
“म्हणजे?” माझा चेहरा खर्रकन उतरला. ती हसून मला निरखत होती. आपले टपोरे डोळे माझ्यावर रोखून खट्याळपणे हसत होती. कपाळावरुन बटा पुन्हा मागे सारून म्हणाली, “केदार, तुझी बॅग देतोस मला? ही माझी बॅग तू घेऊन जा.”
“म्हणजे?”
“अरे, म्हणजे ना ही तुझी लकी बॅग मला फार आवडलीय. आपण एकमेकांच्या ‘लकी’ बॅग्ज एक्स्चेंज करूया का?’
“फक्त बॅगाच?” आता तिचा कावा माझ्या लक्षात आला. हृदयात जणू शेकडो गुलाबच फुलले!
“हो, सध्या फक्त बॅगाच. पुढचं मामामामींना विचारावं लागेल. त्यांनापण जावई पसंत पडायला हवा ना?”
आम्ही खूप हसलो. तिने माझी बॅग घेतली. तिच्या बॅगेतली कागदपत्रं काढून त्यात भरली. तिची बॅग मी घेतली आणि कॉफी घेऊन आम्ही जणू तरंगतच बाहेर पडलो.
बॅग घेऊन मी त्याच तंद्रीत घरी आलो. आई म्हणाली,”काय रे, मिळाली का बॅग? चल आता ती देटाकून आणि घेऊन ये एखादी छानशी नवी सुरेख बॅग!”
“हो, आणणारच आहे. अगदी तुला आवडेल अशी.” असं म्हणून मी हातातली बॅग जास्तच प्रेमाने कुरवाळू लागलो. शिल्पाची होती ना ती? आई माझ्याकडे पाहून पुटपुटली, “काय तरी बाई एकेक खूळ याचं?”
मला कसलं खूळ लागलंय हे तिला कुठे ठाऊक होतं?
– -विनायक अत्रे
Leave a Reply