अमेरिकेच्या रेडी टू इट आरटीई खाद्यसंस्कृती बद्दल जेव्हा जेव्हा वाचायचो त्यावेळी वाटायचे की ही वेळ भारतात यायला अजून खूप अवकाश आहे. पण गेल्या सहा महिन्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये भारतामध्ये रेडी टू इट मिल्स बनवणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादनांच्या मागणीमध्ये तब्बल ३० ते ४५ टक्क्याने वाढ झाली आहे!
सहा महिन्यांपूर्वी लॉकडाऊन सुरू झाले तेव्हा प्रत्येकाचे इंस्टाग्राम, फेसबुक हे घरी बनवलेल्या विविध खाद्यपदार्थांच्या फोटोंनी भरून गेले होते. पण नंतरच्या महिन्या दोन महिन्यांमध्ये काही लोकांचा सन्माननीय अपवाद वगळता बहुतेकांचा उत्साह आटलेला दिसला. घरात नवरा आणि बायको दोघेही वर्क फ्रॉम होम, तासंतास चालणाऱ्या ऑनलाइन मिटींग्स, वेबिनारमध्ये व्यस्त असताना कुठल्याही बाहेरील मदती शिवाय आपापल्या घरातील धुणी-भांडी आणि जेवण बनवण्याची कसरत करणे सोपे नाही हे विशेषतः युवावर्गाला पटकन कळून चुकले आणि त्यामुळेच बहुतेकांचा मोर्चा हा रेडी टू मेल्स प्रोडक्स कडे सहाजिकच वळला.
भारताची खाद्यसंस्कृती ही खरेतर जगातल्याइतर अनेक देशांमधल्या खाद्यसंस्कृती पेक्षा विविधतेने नटलेली आहे. त्यामुळे रेडी टू इट मिल्स तयार करणाऱ्या कंपन्यापुढे हे खरे तर आव्हानच आहे. कॉलेजमधील फूड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटशी थोडाफार संबंध आल्यामुळे मी एवढे निश्चित सांगू शकतो की रेडी टू इट मिल्सच्या कॅटेगरी मधले एखादे प्रॉडक्ट मार्केट मध्ये आणायचे तर त्यासाठी अगोदर किती तरी रिसर्च करावा लागतो. एवढे सारे केल्यानंतर जर जास्तीत जास्त लोकांच्या पसंतीला उतरले नाही तर कंपनीची सारी मेहनत आणि पैसा फुकट जाते.
त्यातल्या त्यात पंजाबी ग्रेव्हीमध्ये बनवलेल्या डिशेस आणि पुलाव किंवा बिर्याणी यांच्या लोकप्रियतेमुळे बहुतेक कंपन्यांनीअशाच प्रकारची प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आणलेली दिसतात.
बारा-तेरा वर्षांपूर्वी केरळमध्ये चपात्यां रेडिमेट पाकीट पाहून अप्रूप वाटले होते. आज त्याच केरळमधील मलबारी पराठा (iD Foods कंपनीचे ) मुंबईतील स्टोअर्समध्ये हातोहात खपत आहेत. खरंतर मैदा पासून बनवल्या जाणाऱ्या या पराठ्याची गव्हाच्या पिठाची आवृत्ती बाजारात आलेली आहे सुरुवातीला फक्त मैद्याच्या मिळणाऱ्या ब्रेडला जसे होल व्हीट किंवा मल्टीग्रेन ऑप्शन्स मिळतात त्यातलाच हा एक प्रकार! मॅगीच्या टू मिनिट्स नूडल्स च्या धर्तीवर ‘एमटीआर’ कंपनीने थ्री मिनिट्स ब्रेकफास्ट बाजारात आणलेत. इतकी वर्ष गुलाबजामून मिक्स बनवणारी ‘गिट्स’ कंपनी तसेच मिठाई आणि स्नॅक्स साठी प्रसिद्ध असणारी ‘हल्दीराम’ पण आता या मार्केटमध्ये उतरली आहे.
आता रेस्टॉरंटस् सुरू झाल्यावर आणि जनजीवन सुरळीत झाल्यावर या प्रॉडक्ट्स ची मागणी नक्की कमी होईल पण इतर वेळी या ब्रँड्स ना पाय रोवयाला वर्षानुवर्षे लागली असती पण लॉकडाऊन च्या सहा महिन्यांनी त्यांची सहा वर्षांची मेहनत कमी केली असेल!
तुमच्या मेनू मध्ये यापैकी कुणी शिरकाव केलाय ते नक्की लिहा!
( पोस्ट मध्ये या आरटीई खाद्यपदार्थांचे गुणगान करण्याचा कोणताही उद्देश नाही! घरी बनविलेल्या ताज्या अन्नाची सर कशालाच नाही. अगोदरच कीटकनाशके आणि रासायनिक खतांमुळे प्रदूषित धान्य, भाजीपाला आपण खातोय त्यात Preservatives ची भर पडली तर शरीराचे काय हाल होतील हे सांगायला नको! तेव्हा आरटीई मध्ये अगदी Millet प्रॉडक्ट्स मिळत असली तरी किती आहारी जायचे ते आपण ठरवायचे!)
— श्रीस्वासम
Leave a Reply