सोलापूरहून अक्कलकोटला चालत जाण्याची कल्पना माझ्या मुलाने, विराजने अमलात आणली. त्याच्या मित्रांनाही तो घेऊन जात असे. मीपण एक शनिवार रविवार असा बेत ठरविला. शुक्रवारी रात्री सिद्धेश्वर एक्स्प्रेसने निघून सोलापूरला पहाटे उतरायचे, नाश्ता करून चालत सुटायचे. जवळपास 40 किमी अंतर पार केल्यावर अक्कलकोटला दर्शन घ्यायचे, रात्री मिळेल तेथे मुक्काम करायचा व रविवारी सकाळी बस-रेल्वेने परतायचे. मला आवडला हा प्रयोग. असा शिरस्ता मी सहा वर्षात 8 वेळा पाळला. बर्याचदा मी एकटा गेलो आहे. आपले मनाशी चाललेले स्वगत हवे तेवढे लांबवता येते. कोणताही व्यत्यय नसतो. पाहिजे तिथे झाडाखाली थांबायचे, जवळचे खायचे व चालू लागायचे. सुस्ती येणार नाही याची मात्र काळजी घ्यायची. मी एक नियम केला होता. वाटेत जेवायचे नाही. बिस्किटे, लाडू खायचे व चहा, कॉफी, ताक प्यायचे. यामुळे कधी त्रास झाला नाही. तीन वेळा पत्नी वसुधा पण बरोबर होती. पहिल्यांदा आली तेव्हा पाय दुखू लागल्याने तिला 30 किमी चालल्यावर बसने पुढे पाठविले. प्रत्येक पदयात्रेमधे काहीतरी शिकायला मिळत होते.
एकदा वसुधा, माझा भाऊ, वहिनी व पुतणी बरोबर होते. त्यावेळचा अनुभव खास होता. सोलापूरला गाडीतून उतरल्यावर सकाळी 7 वाजता इडली, उपमा, ब्रेड बटर, चहा-कॉफी असा नाश्ता करून चालायला सुरुवात केली. कुंभारी, तोगराळी, वळसंग, कर्जळ गावे पार केली. वाटेतील मल्लिकार्जुन ढाबा म्हणजे ताक पीण्याचे ठिकाण. बाटलीतही ताक भरून घतले. दुपार उलटली. अक्कलकोटचा बस स्टँड दिसू लागला. दीड किमी चालणे बाकी होते. मुक्कामाचे ठिकाण जवळ आले की पाय गळपटतात. आता चालू नये असे वाटते. मन पोचलेले असते मठात. पायांकडून दमल्याचे संदेश आल्याचे भासवून मेंदू पुढे जाण्यासाठी पर्यायाचा विचार करावा असे सुचवितो. वसुधाला असेच वाटले या वेळेस. म्हणाली रिक्षाने जाते. आम्ही बाकीचे चालत जाणार होतो. तिने एक रिक्षा थांबवली. रिक्षावाल्याला विचारले, ‘मठापर्यंत नेणार का?’ रिक्षावाल्याचे उत्तर ऐकून आम्ही चाट पडलो. तो म्हणाला, ‘तुम्ही सोलापूरहून चालत आलात हे मी पाहिले आहे. या रस्त्यावर माझ्या दोन ट्रिपा झाल्या आज. आणखी थोडे चाला, स्वामी काळजी घेतील. मी तुम्हाला नेणार नाही.’ रिक्षावाल्याचा नकार ऐकण्याचा अनुभव सार्वत्रिक आहे. किंचित का होईना, राग येतो. पण या रिक्षावाल्याचा नकार आम्हाला खुश करून गेला. साक्षात स्वामींनीच वसुधाला हा अनुभव दिला. पुढच्या क्षणी तिच्या पायात बळ आले. दुसर्या रिक्षाची वाट बघितली नाही. आम्ही मठात पोचलो, दर्शन घेतले. दुसर्या दिवशी ठाण्याला परत आलो. पुढील वेळी आम्ही दोघे गेलो तेव्हा तिला हे अंतर चालणे सहज जमले. आणखी काही वर्षांनी, पुणे-अक्कलकोट 300 किमी ती 11 दिवसात चालली. अक्कलकोटशी आमची अशीही नाळ जुळलेली आहे.
— रविंद्रनाथ गांगल
अप्रतिम उपक्रम आहे. स्वतः वर विश्वास आहे.
स्वामी समर्थ आहेत.
खुप छान अनुभव…
भिऊ नकोस मी पाठीशी उभा आहे याचा स्वानुभव…
जय स्वामी समर्थ..
नमस्कार सुधीर दीक्षित परिवार